काँग्रेसमध्ये राहून त्यांनी मुस्लिमांशिवाय निवडणुका जिंकू शकतो असं सांगायचं धाडस केलं होतं

देशातला बाबरी मशिदीचं  विध्वंस प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला माहितेय. यानंतर हिंदू-मुस्लिम सुरु झालेला वाद सामान्यांबरोबरच नेतेमंडळींसाठीही मोठा प्रश्न होता. त्यावेळी हिंदुत्ववादी पक्षांनी आपला सॉफ्टकॉर्नर मिळवला होता. पण यामुळं अल्पसंख्य समुदायाचे संरक्षण करण्याच्या काँग्रेसच्या निर्धारावरच प्रश्नचिन्ह उभं राहील.

काँग्रेसबद्दल अविश्वास पसरायला सुरुवात झाली. बाकीचे तर बोलतच होते पण पक्षातलाच एक गट धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येचा आणि तत्वज्ञानाचा काँग्रेसने पुनर्विचार करावा, अशी मागणी करू लागला.  तेव्हा नरसिंहरावांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस बहुसंख्यांक वादाला उत्तेजन  देत असल्याचा आरोप मुस्लिम नेते आणि मुल्ला मौलवींनी सुरु केला. 

नरसिंहराव आणि सीताराम केसरीच्या कारकिर्दीत पुण्याचे विठ्ठलराव गाडगीळ काँग्रेसचे जेष्ठ पक्षप्रवक्ते होते. इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी मोठी मंत्रीपदे सांभाळली होती. त्यांचे वडील देखील नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले होते. नेहरू गांधी घराण्याचे समर्थक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. काँग्रेसचे अनुभवी अभ्यासू व जेष्ठ नेते म्हणून विठ्ठलराव गाडगीळांना मान होता.

या दरम्यान  महाराष्ट्रात काँग्रेसचं सात दिवसाच शिबीर आयोजित केलं होत. काँग्रेसचे भविष्यातील नेते घडवण्यासाठी मुंबईतल्या कुर्ल्यात हे शिबीर आयोजित केलं होत.  याच शिबिराला  मार्गदर्शन करताना गाडगीळ म्हणाले होते,

‘मुस्लिमांचा अनुनय करणारे काँग्रेसचे धोरण मला अजिबात आवडत नाही. ‘ 

काँगेसच्या रणनीतीकरांवर जोरदार हल्ला चढवत गाडगीळ म्हणले, “शाही इमामांचा फतवा कधीही जारी झाला कि, जणू काही परमेश्वर स्वतःच बोलतो,  अश्या पद्धतीने काँग्रेस पक्षाचे नेते  त्याकडं पाहतात.  देशात अल्पसंख्यांक म्हणजे काय फक्त मुस्लिमच आहे काय ? मग बौद्ध शीख इतरांचे काय?  काश्मिरात ३६ शिखांची निर्घृण हत्या झाली, तेव्हा त्यांच्याविषयी आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी एकही काँग्रेसजन पुढे आला नाही, कि कोणी साधा शोकही व्यक्त केला नाही. ”

गाडगीळ पुढे म्हणाले, “जम्मू – काश्मीरच्या सचिवालयात एकही बौद्ध सरकारी नोकरीला नाही.  राज्यातल्या लोकसेवा आयोगाने एकमेव बौद्ध उमेदवाराची निवड केली तर आपली सरकारी नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी, धर्मांतर करून त्याला इस्लाम धर्म स्वीकारावा लागला. या घटनेबद्दल काँग्रेस का म्ह्णून शांत बसलंय?”

मुस्लिमांचा अनुनय करताना देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना काँगेसला विसरता येईल? असा सवाल उपस्थित करत एका मासिकातला लेख गाडगीळांनी वाचून दाखवला.  ज्यात म्हंटल होत. इस्लाम आणि लोकशाही कधीही परस्परांसोबत जाऊ शकत नाही.  चीनमधल्या  एक प्रांतात  जिथं मुस्लिमांची संख्या जास्त आहे, ते लोक चीनमधून फुटून नवा देश तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.  

हे सगळं ऐकत असताना शिबिरातल्या एकानं उठून  त्यांना प्रश्न विसरला.  तुम्ही हे कशासाठी बोलताय? यावर गाडगीळ म्हणाले.

मी काय हे आज नाही बोलत,  याआधीही बोललोय. देशात फक्त १८% मुस्लिम आहेत. या सगळ्यांनी जरी काँग्रेसला मतदान केलं तरी पक्ष सत्तेवर नाही येऊ शकत.  उरलेल्या ८२% लोकांच्या भावना दुखवून आपल्याला चालेल  काय?

गाडगीळांच्या या शब्दांवर कोणालाही प्रश्न पडेल कि, गाडगीळ काँग्रेस सोडायच्या तर विचारात नाही ना? कारण आजकाल पक्षातला एखादा निर्णय पटला नाही कि, नेतेमंडळी लगेचच दुसऱ्या पक्षाची वाट धरतात. आणि इथं तर थेट मोठ्या  मुद्द्याला हात घातला होता. असो,  तर गाडगीळांना सुद्धा विचारलं गेलं कि, तुम्ही काँग्रेसचा त्याग करण्याच्या वविचारात आहेत काय?

यावर गाडगीळ म्हणाले, “नाही अजिबात नाही.   काँग्रेसजन म्हणून मी जन्मलोय आणि अखेरपर्यंत काँग्रेसजन म्ह्णूनच राहील. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला सगळ्यात आधी  माझ्या वडिलांनीच ओळखलं होत.  यानंतरच्या दंगलीत हजारी मुस्लिम होरपळून जाऊ नयेत, यासाठी दंगली रोखण्याचे काम त्यांनी केलं. मी धर्मनिरपेक्षच आहे,  आणि यासाठी मला कोणता पुरावा देण्याची गरज नाही. मतदानाचं अंकगणित डोळ्यासमोर ठेवून फक्त मुस्लिम समुदायाला अल्पसंख्यांक समजण्याची चूक मात्र काँग्रेसने करू नये, पक्षाला यासाठी वेळीच सावध करण्याचा मी प्रयत्न करतोय, इतकचं.”

दरम्यान, गाडगीळांच्या या बोलण्यानंतर सुद्धा विचलित न होता सोनिया गांधी शांत राहिल्या. पण एका मुद्द्यावर त्या ठाम होत्या. तो म्हणजे बाबरी विध्वंसानंतर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशी आणि आपल्या कर्तव्याशी तडजोड केल्याचा जो आरोप होत होता, तो पक्षाने गांभीर्याने घेण्याची गरज  आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.