शिंदे-फडणवीस सरकार आलं अन् काही लोकांच्या चौकश्या थांबल्या तर कुणाला दिलासा मिळाला

सध्या ईडी, सीबीआय, सीएनबी आणि एसआयडी या सगळ्या तपास यंत्रणा कायम चर्चेत असतात. सत्ताधारी भाजपकडून नेहमी तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतो, विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्यासाठी किंवा त्यांना भाजपमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले जातात असा आरोप नेहमी विरोधी पक्षांकडून केला जातो.

त्यातल्या त्यात राज्यात नवे सरकार आल्यापासून किरीट सोमय्या, समीर वानखेडे, नवनीत राणा, रश्मी शुक्ला या सगळ्यांना दिलासा मिळत असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे विरोधी पक्षात असलेली शिवसेना सध्या शिंदे सरकारवर घोटाळेबाजांना क्लीन चिट दिली जात असल्याची टीका करत आहे.

बरं यात कुणाचा समावेश आहे ?

महाविकास आघाडीचे सरकार असतांना किरीट सोमय्या यांच्यावर आय.एन.एस विक्रांतच्या निधीत घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले होते. तर रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचं प्रकरण चालू होतं.

नवनीत राणा यांच्यावर कथित डी गँगशी संबंध ठेऊन युसूफ लकडावाला यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होता तर समीर वानखेडे यांच जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा खटला चालू होता.

या चारही जणांवर वेगवेगळ्या तपास यंत्रणांद्वारे चौकश्या सुरु होत्या मात्र नवीन शिंदे सरकार आल्यापासून सगळ्यांना तपास यंत्रणांच्या चौकश्यापासून सुटका मिळत आहे. त्यामुळे नवे सरकार भाजपच्या घोटाळेबाजांना दिलासा देऊन त्यांचे अपराध झाकत आहे असा आरोप शिवसेनेने केलाय.

सोमय्या, वानखेडे, शुक्ला, राणा यांच्यावर नेमके कोणते खटले चालू आहेत आणि त्यात कशा प्रकारे दिलासा मिळालाय.

१. किरीट सोमय्या आणि निल सोमय्या 

दोघं पिता-पुत्रांवर आय.एन.एस विक्रांतच्या निधीत घोटाळा केल्याबद्दल ईडीची कारवाई चालू होती.

२०१४ मध्ये आय.एन.एस विक्रांत या युद्धनौकेला भंगारात काढलं जात होतं. तेव्हा किरीट सोमय्या यांनी विक्रांतला वाचवण्यासाठी निधी गोळा करण्याची मोहीम चालू केली होती. त्यात अनेकांनी पैसे दान केले होते. परंतु जमा झालेला निधी राजभवनात जमा करण्यात आला नाही असं राजभवनाकडून सांगण्यात आलं होतं. 

तेंव्हा किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर ५७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. रक्कम १० कोटी रुपयांच्या वरची असल्यामुळे सोमय्या यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. 

आत्ताचं स्टेट्स काय आहे ?

मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही असे कोर्टात सांगितले आहे त्यामुळे न्यायालायने सोमय्यांना या प्रकरणात दिलासा दिला आहे. त्यांची चौकशी सुरु राहील मात्र त्यांना अटक करायची झाल्यास ७२ तासांआधी त्यांना कळवण्यात येईल असे यात सांगितले आहे. 

२. समीर वानखेडे 

नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे आर्यन खान ड्रग्ज केसमुळे चर्चेत आले होते. आर्यन खानची केस चालू असताना काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जात प्रमाणपत्रावर प्रश्न निर्माण केला होता.

समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले जे खोटे असून समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, त्यांनी ओळख लपवली असा आरोप करण्यात आला होता. तेव्हा हे प्रकरण जात प्रमाणपतर पडताळणी समितीकडे गेले होते.

त्यांच्या या केस वर आत्ताचं स्टेट्स काय आहे ?

समीर वानखेडे यांना खोट्या जात प्रमाणपत्राच्या केसमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलासा दिलाय.

समीर वानखेडे यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. समीर वानखेडे हे अनुसूचित जातीमधील महार या जातीचे असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलाय. त्यामुळे समीर वानखेडे यांना दिलासा मिळालाय.

३.रश्मी शुक्ला 

रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी चालू होती, त्यांना अटक होण्याची शक्यता होती मात्र त्यांना अटक करण्यात आली नाही. इतकंच नाही तर त्यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाकरे सरकारने एसआयटी स्थापन केली होती आणि एसआयटीकडे हा टॉप्स सोपवला होता. त्या चौकशीचं पुढं काही झालं नाही मात्र उलट शिंदे सरकारने एसआयटीच बरखास्त केली.

मुंबईच्या डीआयजी रश्मी शुक्ला यांनी अवैध रीतीने काही जणांचे फोन टॅप केले होते. त्यामुळे रश्मी शुक्लावर पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात केस दाखल करण्यात आली होती. त्या केसची सुनावणी मुंबई हायकोर्टात चालू होती. 

त्यांच्या या केसबाबत आत्ताचं स्टेट्स काय आहे ?

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एसआयडीकडे ही केस दिली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार गेल्यांनतर, शिंदे-फडणवीस सरकारने ती एसआयटी बरखास्त केली केली आणि हा खटला सीबीआयकडे देण्यात आला आहे. 

परंतु रश्मी शुक्ला यांच्या सारख्याच फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक करण्यात आली तर रश्मी शुक्ला यांना मात्र अटक करण्यात आली नाही.

४.नवनीत राणा 

यांच्यावर युसूफ लकडावाला याच्या २०० कोटीच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप होता मात्र या प्रकरणात राणा यांची साधी चौकशी सुद्धा झाली नाही. 

डी गँगचा सदस्य असलेल्या युसूफ लकडावाला याचे अंडरवर्ल्डशी संबंध होते. त्याने केलेल्या २०० कोटीच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात नवनीत राणा या सुद्धा सहभागी असल्याचे आरोप संजय राऊत यांनी केले होते. 

त्यांनी याबाबत पुरावा दिला होता. त्यात युसूफ लकडावाला याने नवनीत राणा यांना ८० लाख रुपये दिल्याचा आरोप लावला होता. युसूफ लकडावाला याची मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून चौकशी चालू होती. ईडीची चौकशी चालू असतांनाच लकडावाला याचा कारागृहात मृत्यू झाला. 

स्टेट्स काय आहे ?

लकडावाला याच्याशी संबंध असल्याचा आरोप झाल्यावर सुद्धा नवनीत राणा यांची ईडीकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही.

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलीस आणि मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय, समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दिलासा मिळालाय, रश्मी शुक्ला यांच्या तपासासाठी स्थापन केलेली एसआयटी रद्द करण्यात आली तर नवनीत रांना यांची ईडीने साधी चौकशी सुद्धा केली नाही. 

या चौघांसोबतच शिंदे गटाच्या प्रतोद भावना गवळी यांच्या निकटवर्तीयांवर चालू असलेल्या ईडीच्या कारवाईमध्ये सुद्धा न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. त्यामुळे शिंदे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप शिवसेना करत आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.