एक पाय निकामी झाला असूनही एव्हरेस्ट सर करणारी अरुणीमा सिन्हा

ती निराश झाली. हतबल झाली. परंतु उमेद हरली नाही. तिने एक स्वप्न बघितलं होतं. स्वप्नपूर्तीच्या दिशेने तिने स्वतःचा प्रवास सुरू केला होता. नियतीने तिला इतका जबरदस्त धक्का दिला की, तिच्या जागी दुसरी कोण असती, तर जगण्याची आशा सोडली असती. परंतु सर्व काही विसरून तिने पुन्हा एकदा स्वतःच्या स्वप्नाचा ध्यास घेतला. आणि केवळ अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून एक इतिहास रचला.

ही प्रेरणादायक कहाणी एव्हरेस्ट गर्ल अरुणीमा सिन्हा ची.

अरुणीमा चा जन्म २० जुलै १९८८ रोजी उत्तर प्रदेश येथे झाला. तिचं घर सुक्षिशित होतं. तिचे वडील भारतीय सैन्यात इंजिनियर होते. आणि आई आरोग्य खात्यामध्ये सुपरवायझर होती. अरुणीमा राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू होती. तसेच तिला फुटबॉल खेळण्याची प्रचंड आवड. तिला वडीलांप्रमाणे फोर्स मध्ये जाण्याची इच्छा होती. त्यादृष्टीने तिने प्रयत्न सुद्धा सुरू केले. तिच्या मेहनतीला यश मिळालं आणि तिला CENTRAL INDUSTRIAL SECURITY FORCE (CISF) कडून मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. यासाठी अरुणीमा ला दिल्लीला जावं लागणार होतं. परंतु हा प्रवास अरुणीमा चं आयुष्य बदलवणारा होता, याची कोणालाच कल्पना नव्हती.

आयुष्य बदलवणारा तो रेल्वे प्रवास

१२ एप्रिल २०११ ची घटना. दिल्लीला जाण्यासाठी अरुणीमा लखनऊ येथून पद्मावती एक्सप्रेस मध्ये बसली. अरुणीमा जनरल डब्यातून प्रवास करत होती. रात्रीची वेळ होती. त्याच वेळी ट्रेनमध्ये काही गुंड तरुण घुसले आणि ते त्या डब्यातील लोकांना धमकी देऊ लागले. त्या गुंडांनी प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू घेऊन त्यांना लुटायला सुरुवात केली. अरुणीमा हे सर्व दृश्य पाहत होती.

एकएक जणांना लुटून हे गुंड अरुणीमा जवळ आले. त्यांनी अरुणीमा कडे पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. परंतु अरुणीमा गुंडांना काहीही देण्यास तयार नव्हती. तिने गुंडांना नकार दिला. सर्वांनी निमूटपणे आपल्याला सर्व गोष्टी दिल्या, परंतु या तरुण मुलीचा नकार ऐकून गुंडांना प्रचंड राग आला. त्यांनी तिचा गळा दाबला. अरुणीमा ची घुसमट झाली. गुंडांना हेच हवं होतं. आजूबाजूची माणसं आधीच घाबरली असल्याने कोणीच विरोध करण्यासाठी पुढे येत नव्हते. अखेर गुंडांनी रागाच्या भरात अरुणीमा ला ओढत ओढत बाहेर आणून ट्रेनमधून फेकून दिले.

 जखमी अवस्था आणि असह्य वेदना

गुंडांनी चालत्या ट्रेन मधून अरुणीमाला खाली ढकलून दिले होते. अरुणीमा रेल्वे ट्रॅक वर पडली. प्रचंड जखमी झाली. तिला कोणतीही हालचाल करता येत नव्हती. पायाची हाडं मोडली होती. दुर्दैव म्हणजे दुखापत झालेला पाय रेल्वे ट्रॅक वर गेला होता. तो हलवता सुधा येत नव्हता. त्याच पायावरून काही वेळाने आणखी एक रेल्वे गेली. या आघाताने अरुणीमा बेशुद्ध झाली. जाग आली तेव्हा उंदीर तिचा जखमी पाय कुरतडत होते.

रात्रभर पायावरून रेल्वे जात होत्या. आणि सहन शक्तीच्या पलिकडे जाणाऱ्या वेदना अरुणीमा अनुभवत होती.

ती संपूर्ण रात्र अरुणीमा रेल्वे ट्रॅक वर पडून होती. सकाळ होताच एका माणसाने तिला पाहिले. अरुणीमा ची बिकट अवस्था पाहून त्या माणसाने अधिक वेळ न दवडता जवळच्या उपचार केंद्रात अरुणीमा ला नेले. डॉक्टरांनी अरुणीमा ची अवस्था बघितली आणि पाय कापायचा निर्णय घेतला. वाईट गोष्ट म्हणजे, तिथे पाय कापण्याआधी भुल देण्याची कोणती व्यवस्था नव्हती. उशीर करून चालणार नव्हता. म्हणून भूल न देताच डॉक्टरांनी अरुणीमा चा पाय कापला. आणि पुढच्या उपचारांसाठी अरुणीमा ला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.

 राखेतून मारलेली फिनिक्स भरारी

अरुणीमा ची मानसिक अवस्था यावेळी कशी असावी हा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. इतक्या जखमा सहन करून सुद्धा आपल्या शरीरात प्राण आहे, याचे अरुणीमा ला आश्चर्य वाटले. या मोठ्या आघातामुळे CISF मध्ये भरती होण्याचं आणि व्हॉलीबॉल मध्ये करियर करण्याचं स्वप्न भंग पावलं होतं. अरुणीमा निराश नव्हती. अशा परिस्थितीत काय करता येईल, याचा विचार ती करत होती.

आणि तिला कल्पना सुचली.. एव्हरेस्ट वर जाण्याची.

हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बचेंद्री पाल यांना अरुणीमा भेटायला गेली. १९८४ साली एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिला भारतीय महिला म्हणजे बचेंद्री पाल.

अरुणीमा ची शारीरिक अवस्था बघून त्यांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला. परंतु काहीच दिवसात अरुणीमा च्या जिद्द आणि चिकाटी पुढे त्यांनी मान झुकवली. अरुणीमा ला ट्रेनिंग देण्यासाठी त्या तयार झाल्या. अनेक अडचणींचा सामना करत अरुणीमा ट्रेनिंग पास झाली आणि एव्हरेस्ट वर चढण्यासाठी सज्ज झाली. यासाठी तिला टाटा स्टील कडून मदत मिळाली.

एव्हरेस्ट चे दिवस आणि स्वप्नपूर्ती

आपण एका पाय नसलेल्या व्यक्तीला मदत करणार आहोत, असं समजताच नेपाळ येथील शेर्पा ने अरुणीमा सोबत एव्हरेस्ट चढण्यास नकार दिला. अरुणीमा ने विश्वास आणि विनवणी केल्यानंतर शेर्पा सोबत जाण्यास तयार झाला. स्वप्न समोर दिसत होते. त्यामुळे अरुणीमा उत्साहात एव्हरेस्ट चढण्यास तयार झाली.

अनेक दिवस अरुणीमा चालत होती. शेर्पा मदतीला होता. शिखरावर जाण्यासाठी अरुणीमा ला अनेक संकटांचा सामना करावा लागला. स्वतःचा जीव आणि स्वप्न सांभाळत अरुणीमा नेटाने चालत राहिली.

आणि अखेर तो क्षण जवळ आला. २१ मे २०१३ रोजी सकाळी १०.५५ मिनिटांनी अरुणीमा माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचली.

तिला एव्हरेस्ट सर करण्यासाठी ५२ दिवस लागले. शिखरावर ती आली होती. परंतु परत खाली जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसा ऑक्सिजन नव्हता. परतीच्या प्रवासात आपण कदाचित मृत्यूला क्षरण जाऊ, असा विचार तिच्या मनात आला. त्यामुळे तिने शेर्पा कडे कॅमेरा देऊन स्वतःचे फोटो काढले. बर्फाळ जागेवर तिच्या हातात एक कपडा होता.

“आयुष्यात सतत प्रेरणा देणाऱ्या भगवान शंकर आणि स्वामी विवेकानंद यांचे आभार”, असं त्या कपड्यावर लिहिलं होतं.

परतीच्या प्रवासात एका परदेशी ट्रेकर कडे एक्स्ट्रा ऑक्सिजन होता. तो सोबत बाळगून, परतीच्या प्रवासात सुद्धा अनेक अडचणींचा सामना करून अरुणीमा स्वप्नपूर्तीचा आनंद घेऊन सुखरूप परतली. तिच्या या संपूर्ण प्रवासात सोबत असलेल्या शेर्पा ने तिला वेळोवेळी मदत आणि प्रोत्साहन दिले. या कार्यासाठी २०१५ मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन अरुणीमा चा सन्मान केला.

आपण सर्वजण काही ना काही स्वप्न बघत असतो. परंतु “स्वप्न जगावं कसं”, हे अरुणीमा ने तिच्या कार्याने सांगितलं आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.