आज घराघरात दिसत असलेल्या एव्हरेस्टची सुरुवात २०० चौरस फुटांच्या दुकानातुन झाली आहे

साधारण १९६० च्या दशका दरम्यानचा काळ. मुंबईत कामाच्या शोधात रोज हजारो जण येत असतं. त्याकाळी पण इथं आलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळतं ही मुंबईची ओळख होती. अशाच हजारोंच्या गर्दीतुन गुजरातमधून २४-२५ वर्षांचे वाडीलाल शहा कामासाठी दाखलं झाले.

सुरुवातीला वाडीलाल आपल्या वडिलांसोबत एका मसाल्याच्या दुकानात काम करु लागले. काही दिवस गेल्यानंतर त्यांनी बघितलं की, हा मसाला खरेदी केल्यानंतर देखील लोकं त्याची चव वाढवण्यासाठी बाकीच्या गोष्टी मिसळत आहेत. खरेदी केलेल्या मसाल्याच्या चवीवर त्यांचं समाधान होतं नाहीये.

मग यावर उपाय म्हणून आपण स्वतःचा आणि सोबतच लोकांना परिपूर्ण वाटेल असा मसाला तयार केला तर?  

वाडीलाल यांना ज्यावेळी हा विचार मनात आला त्यावेळी भारतासारख्या देशात मसाल्यांचा व्यापार प्रत्येक प्रांतागणिक होतं असायचा. त्यात पण एक तर वर्षभराचा मसाला घरगुती पद्धतीनचं तयार व्हायचा. मुंबईकरांना पण मसाला गावाकडूनच पोहच केला जायचा.

‘रेडीमेड’ मसाला युग अजून अवतरलेलचं नव्हतं. आणि जे मिळायचे ते मसाले बाहेरून विकत आणणं ही कल्पना सामान्य माणसाच्या पचनी पडणारी नव्हती आणि परवडणारी तर आजिबातचं नव्हती.

अशा काळात वाडीलाल यांनी प्रमाणित मसाला बनवण्याचं स्वप्न पाहण्याच धाडस केलं होतं. त्यासाठी त्यांनी १९६६ मध्ये एक ब्रँड रजिस्टर केला, आणि नाव दिलं

एव्हरेस्ट!

जवळपास पुढचे दोन वर्ष त्यांनी अतिशय कष्ट घेऊन, विविध पदार्थांचा अभ्यास करुन मसाल्यातील घटकांचं प्रमाण निश्चित केलं, त्यानंतरच हा ब्रॅण्ड बाजारात आणला होता.

१९६८ साली केसरी मिल्क मसाला हे पहिलं उत्पादन लॉन्च केलं. त्यानंतरच्या काळात चहा मसाला, गरम मसाला लॉन्च केला. सुरुवातीला मुंबईत अगदी छोटंसं म्हणजे २०० चौरस फुटाचं दुकान होतं.

त्या तिन्ही मसाल्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातून आणखी शिकत, ग्राहकांचे अभिप्राय घेत विविध मसाले जसं की, सांबार मसाला, छोले मसाला, सब्जी मसाला, पुलाव बिर्याणी मसाला, चिकन मसाला असे विविध स्वाद वाढत गेले. १९८१ साली अधिकृतरित्या एव्हरेस्टची पहिली फॅक्टरी उभी राहिली. त्यामुळे हेच खरं सुरुवात वर्ष म्हणून गणलं जावू लागलं.

यामागे वाडीलाल यांनी एक नियम मात्र आवर्जून पाळला. ज्या प्रांतातील मसाला असेल त्याच प्रांतातून गोळा केलेले घटक मसाल्यासाठी वापरायचे. यामुळे त्या प्रांताचा स्वाद त्या पदार्थात उतरतो. याशिवाय साधारणपणे भारतात सर्वत्र असणारे लाल मिरचीचे तीन स्वाद मानले जातात. हे तिन्ही स्वाद एव्हरेस्टने आणले.

त्यापैकी एक काश्मिरी लाल, दुसरा तिखालाल आणि तिसरा कुटीलाल.

याचा उपयोग झाला तो वर्षभराचं चटणी, तिखट ज्या गृहीणी साठवून ठेवायच्या त्यांच्यासाठी. हॉटेल चालकांच्या चवीत कमालीचा बदल झाला.

हिच गृहीणींची गरज लक्षात घेत छोट्या पाकिटात मसाला पॅक करुन तो विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा पहिला मान निशंकपणे एव्हरेस्टला जातो. ही गोष्ट वरकरणी दिसायला छोटी वाटतं असली तरी त्यामुळे भारतीय स्वयंपाकघर कायमचं बदललं.

दुसऱ्या प्रांतातील पदार्थाचा प्रयोग करून पाहण्यासाठी लागणारे मसाले छोट्या पाकिटात आल्यामुळे सहजपणाणं भारतात पंजाबी घरात इडली बनू लागली आणि सोबतीला सांबार मसाला आणून अस्सल दाक्षिणात्य सांबर बनवलं जावू लागलं. दाक्षिणात्य घरात छोले भटुरा बनवण्यासाठी छोले मसाला आणला जावू लागला.

त्यामुळेच आज एव्हरेस्ट हा भारतातील क्रमांक एकचा मसाला ब्रॅण्ड मानला जातो. या मसाल्याचे ४५ विविध स्वाद २० लाखांपेक्षा जास्त भारतीय घरात पोहोचले आहेत. आणि फक्त भारतातच नाही तर मध्य पूर्व देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पूर्व आफ्रिका, अमेरिकेतही हे मसाले पोहोचले आहेत.

२००३/२००६/२००९/२०१५ अशा विविध वर्षांत हा ब्रॅण्ड सुपरब्रॅण्ड म्हणून नावाजला गेला आहे.

मात्र या सगळ्या गोष्टींपेक्षा स्वयंपाकघरात एवरेस्टचं अढळ स्थान दखल घेण्याजोगं आहे. चवीसाठी फुटाफुटवर बदलत जाणाऱ्या अनेक भारतीय घरात एव्हरेस्ट मसाल्याचं एखादं तरी पाकीट तर असतंच. अनेक यशस्वी डिशच्या मागे ती बनवणाऱ्या हातांना एव्हरेस्टनं हात दिला आहे हे ओपन सिक्रेट आहे.

म्हणूनच कदाचित टेस्ट में बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट.’ असं काहीसं असावं. आणि हेच या ब्रॅण्डच्या यशस्वी असण्याचं उदाहरण म्हणता येईल.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.