ते वयाच्या ४८ व्या वर्षी व्यवसायात उतरले, आज त्यांचा एवरेस्ट पाईप्सचा ब्रॅण्ड आहे.

एवरेस्ट सिमेंटच्या टाक्या, पायपांच नाव तुम्ही ऐकलं असेल. तसही सिमेंटच्या टाक्यांच नाव पाहण्याचा योग आपल्याला खूप कमी वेळा येतो. घराच काम काढलं की सिमेंटची टाकी पाहीजे इतकाच काय तो संबंध. त्यातही यात देखील ब्रॅण्ड असतो हे आपल्याला कुणीतरी सांगायला पाहीजे. 

अशाच एका सिमेंटच्या टाक्यांच्या ब्रॅण्डची ही गोष्ट.

एवरेस्ट पाईप्स.

पुण्याशेजारी दहा एकरावर या कंपनीचा प्लॅन्ट आहे. १०० च्या पुढं कामगार इथे काम करतात आणि कंपनीचा टर्नओव्हर आठ ते दहा कोटींच्या दरम्यान आहे. आपल्या सारख्या किरकोळ ग्राहकांपासून ते महाराष्ट्रातील जवळपास सर्व महानगरपालिका, नगरपालिका, महिंद्रा, सहारा, GM मोटर्स, IRB, शहापूरजी पालमजी, परांजपे बिल्डर्स, सहारा, टेल्को असे अनेकजण या एवरेस्टचे हक्काचे ग्राहक आहेत. या कंपनीचा कारभार चालवतात ते नामदेवराव जगताप. नामदेवराव जगताप यांच वय आज पंच्याऐंशीच्या घरात आहे. त्यांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच वय होतं ४८ वर्ष. 

वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. तिथून पुढं जे घडत गेलं आणि घडवलं ते आपल्या बोलभिडू वाचकांना समजावं म्हणूनच त्यांची हि गोष्ट. 

नामदेवराव जगताप यांचा जन्म १९३३ चा. सुप्यातल्या एका दलितवस्तीत त्यांचा जन्म झाला. गावात वीस-तीस कुटूंबाची दलितवस्ती. लहानपणापासून जातीचे चटके त्यांना मिळालेच होते. दलितांच्या पोरांनी शिकलं पाहीजे हे सांगणाऱ्यांचा तो काळ होता. नामदेवराव जगताप जुनी सातवी झाले. शहरांकडे चला हा नारा ऐकून ते शहरात आले आणि छोटीमोठी कामे करु लागले. 

Screenshot 2019 05 13 at 12.36.16 PM

असच काम करत असताना ते आपल्याहून अधिक वयाच्या मुलीच्या प्रेमात पडले. शारदा अस त्यांच नाव. त्या नामदेवराव यांच्यापेक्षा एका वर्षाने मोठ्या होत्या. त्या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. नामदेवरावांनी लग्नाचा प्रस्ताव आपल्या घरी मांडला पण प्रेमविवाह मान्य नसणाऱ्या घरातून यास विरोध झाला. घरातल्यांच्या विरोधात जावून लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी लग्न केलं. शारदा पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत शिकवू लागल्या तर नामदेवराव पडेल ते काम करु लागले. संसार सुरू झाला. नामदेवराव जगताप यांनी तीन मुले आणि तीन मुली झाल्या. सोबत शारदा यांचे आई, तीन बहिणी आणि भाऊ असं मोठं कुटूंब होतं. सर्वजण एकत्र राहत होते व कुटूंबाचा गाडा पडेल ती कामे करुन नामदेवराव जगताप चालवत होते. 

नामदेवराव नक्की काय काम करायचे तर रतन टॉकिजसमोर पुस्तकं विकायचे, गणपतीच्या काळात पाट विकायचे, दूसऱ्यांची घरे चुन्याने रंगवून द्यायचे. याच दरम्यान त्यांनी इलेक्ट्रीशन आणि मोटार रिपेरिंगचा कोर्स केला. काहीही करुन घरात चार पैसे आणणं आणि इतक्या मोठ्या कुटूंबाचा दिवस पार पाडणं एवढं एकच ध्येय त्यांच्या समोर असायचा. 

याच दरम्यान त्यांची तुरळीच्या मनीभाई देसाई यांच्यासोबत ओळख झाली. मनीभाई देसाई हे उपसा सिंचनासाठी काम करत. त्यासाठी त्यांना सिमेंटचे पाईप लागत. सिमेंटच्या पाईपसाठी तेव्हा सांगली प्रसिद्ध होते. पुण्यासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या पाईप ते सांगलीवरुन आणत. पण वहातूक खर्च ही न परवडणारी गोष्ट होती. 

या कामासाठी शेतकऱ्यांना अवजारे लागत असत. मनीभाईशी ओळख झाल्यानंतर आपल्या मोटार रिपेरिंग व इलेक्टिशनच्या कोर्सच्या बळावर त्यांनी  असु इंजिनिरींग नावाने वर्कशॉप सुरू केले. शेतकऱ्यांना लागणारी छोटीमोठी अवजारे ते इथे तयार करु लागले. शेतकऱ्यांसाठी लागणारी अवजारे हाताने बनवली जात पण नामदेव जगताप यांनी थोडे पैसे हातात येताच मशीनचा वापर करुन अवजारे बनवण्यास सुरवात केली. याच काळात शेतकऱ्यांना सिमेंटच्या टाक्या लागत असल्याची माहिती त्यांना मिळत गेली.

त्यासाठी आपणच सिमेंटच्या टाक्यांच्या व्यवसायात उतराव अस त्यांना वाटलं पण मुख्य प्रश्न होता तो, भांडवलाचा. 

नामदेवराव जगताप यांनी गावाकडची चार एकर जागा विकून ९० हजार रुपयांची सोय केली. बॅंकेच लोन केलं. आणि दोन अडीच लाख उभा करून पुणे सोलापूर रोडवर कुंजीरवाडी येथे सिमेंटच्या टाक्यांच पहिलं युनिट सुरू केलं. त्याच नाव होतं, एवरेस्ट स्पन पाईप इंडस्ट्री. 

ते साल होतं १९७९ चं. आणि तेव्हा नामदेवराव जगताप यांच वय होतं ४८ वर्ष. या वयात त्यांनी नव्या व्यवसायात पाऊल टाकलं होतं. 

हळुहळु धंदा जोर पकडत गेला. याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे काम वेळेत करणं. स्वत: नामदेवराव दिवसभर बसून कामाकडे लक्ष देत. त्याच निर्व्यसनी असणं देखील धंदा मोठा करण्यासाठी कारणीभूत ठरत गेलं. इंडस्ट्रियल आरसीसी पाईप्स, वॉटर टॅक, सेप्टिक टॅंक अशा प्रकारचे उत्पादन सुरू करण्यात आलं. सन १९९३ साली याच प्लॅनच्या शेजारची चार एकर जागा घेवून त्यावर शारदा सिमेंट वस्तुनिर्मिती,  २००३ साली असू कॉन्क्रिट प्रॉडक्स सुरू करण्यात आलं. 

संदर्भ : प्रमोद सावंत (युक्ती मिडीया संस्थापक संचालक)  

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.