बच्चनसुद्धा चांदीची खरेदी बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधूनच करतो

दागिन्यांबद्दल आणि सोनं चांदी याबद्दल आपल्याकडे भारी क्रेझ आहे. इतकंच काय तर सोन्या चांदीचे चढते उतरते भावसुद्धा आपण लक्ष देऊन बघत असतो. जगात कुठल्या भागात किती सोनं आहे, अजून कुठे जास्त दागिन्यांची रेलचेल आहे असं आपण सहजपणे बघत असतो. पण आपल्या महाराष्ट्रातल्या एका गावात चांदी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर विकली जाते याबद्दल आपल्याला काय माहिती नाही. तर या गावाबद्दलचा आजचा किस्सा.

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या गावाला सिल्व्हर सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. खामगाव हे भारताचं चांदीचं केंद्रसुद्धा आहे.

खामगावच्या ज्वेलर्स लोकांनी जवळपास भारतातील ८०% चांदीची मंदिरं तयार केलेली आहे. खामगाव हे देशभरात चांदी पाठवत असतं. अनेक लोकांना याबद्दल माहिती नसेल पण दर महिन्याला जवळपास २५ हजार किलो चांदी हि खामगावातून वितरित केली जाते. 

या गावाची लोकप्रियता इतकी आहे कि खुद्द सुपरस्टार अमिताभ बच्चनसुद्धा या गावाचे फॅन आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी नवसाचा भाग म्हणून सिद्धिविनायक मंदिरात अर्पण होणाऱ्या गणपतीचं वाहन उंदराची चांदीची मूर्ती खामगावातून बनवून घेतली. जी तब्बल साडे तीन किलो वजनाची होती.

पण या गावातल्या ज्वेलर्स लोकांना सेलिब्रिटी लोकांबद्दल जास्त विशेष काही वाटत नाही. बिग बी भलेही मोठा हिरो असला तरी त्याच्याही आधीपासून अनेक मोठी मंडळी इथून चांदीच्या मूर्ती बनवून घेऊन जातात. इथल्या बऱ्याच ज्वेलर लोकांची कुटुंब बऱ्याच वर्षांपासून या व्यवसायात आहेत. व्हीआयपी लोकांचे उंदीर क्राफ्टिंगचे करणाऱ्या ज्वेलरी दुकानाचे मालक १२५ वर्षांपासून पिढीजात या व्यवसायात आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कॉर्पोरेट घराण्यातील लोकं आणि टायकून्स इथूनच मूर्ती खरेदी करतात. सोनिया गांधींपासून ते विलासराव देशमुख आणि चंद्राबाबू नायडू अशा वेगवेगळ्या काळातील मोठमोठ्या व्यक्ती मुर्त्यांसाठी खामगावची निवड करतात. 

लाख लाख रुपयांच्या आगाऊ ऑर्डर खामगावच्या ज्वेलर्स लोकांकडे आलेल्या असतात. राजस्थान आणि बनारसमधील कारागिरांची हि हस्तकला आहे. दक्षिणेत या डिझाईनवर काम केलं जातं. खामगावची स्पेशालिटी हि आहे कि छोट्यातल्या छोट्या तुकड्याचं स्वरूप हे शुद्ध चांदीचं असतं.

मोठमोठ्या शहरांची लोकप्रियता म्हणजे मंदिरे किंवा शिल्पकला बनवण्यासाठी वापरली जाणारी चांदीची शुद्धता हि खामगावातून निवडली जाते. हैदराबादमधील तिरुपती मंदिराची प्रतिकृति बनवण्यासाठी जवळपास ४०० किलो चांदी वापरण्यात आली होती. २५ हजार किलो चांदी वितरित केली जाणे हे खामगावच्या इतिहासातील भूषणावह गोष्ट आहे.

खामगावात हा चांदीचा व्यवसाय वाढत चालला आहे. अनेक आधुनिक टेक्निक आणि नवीन तरुण या व्यवसायात येत आहे. इसरोच्या उपग्रह कार्यक्रमासाठीसुद्धा सरकारी ग्राहकांना औद्योगिक चांदीचा पुरवठा खामगावातून केला जातो. चित्ररंजन लोकोमोटिव्हज, रेल्वे उत्पादक इंजिन यामध्येसुद्धा खामगावच्या चांदीचा वापर केला जातो.

चांदीची खाण असलेलं खामगाव प्रसिद्धीच्या फंदात न पडता शांतपणे आपलं काम करत असते. भारताला चांदी पुरवून मोठी उलाढाल खामगाव करत असतं. महाराष्ट्रातील हे गाव देशभरातील चांदीच्या मुर्त्यसुद्धा बनवतं आणि चांदी सुद्धा वितरित करतं. सिल्व्हर सिटी म्हणून देशभरात खामगावचं नाव ओळखलं जातं, महाराष्ट्राच्या दृष्टीने हि मोठी गर्वाची बाब आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.