बंगालच्या स्वारीवरून परतायला उशीर झाला अन् भोसल्यांनी थेट दुसरा गणेशोत्सव सुरु केला

श्रावण संपल्याबरोबर लोकांनी आपापले घर आवरायला घेतले आणि घरात गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी मंडपाची सजावट सुरु झाली होती. कालच आपल्या सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. आपल्या घरातल्या बाप्पासोबतच सार्वजनिक गणपती सुद्धा कालच आपापल्या मंडपात विराजमान झालेत.

भारतातील सगळ्या घरांमध्ये भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला गणपतीचं आगमन होतं. परंतु महाराष्ट्रात एक असा वाडा आहे जिथे आज नाही तर तब्बल १४ दिवसानंतर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे.

तो वाडा म्हणजेच नागपूरकर भोसल्यांचा राजवाडा…!!

आजपासून चौदा दिवसानंतर म्हणजेच पितृपक्षातील चतुर्थीला नागपूरकर भोसल्यांच्या राजवाड्यात ऐतिहासिक हडपक्या गणपतीची स्थापना होणार आहे. या ऐतिहासिक हडपक्या म्हणजेच मस्कऱ्या गणपतीचे यंदा हे २६७ वे वर्ष आहे. 

परंतु भिडूंनो, सगळीकडे भाद्रपदाच्या चतुर्थीला गणपतीची स्थापना होत असतांना, नागपूरकर भोसल्यांनी १५ दिवसांनी गणपती बसवायचं हे काय खुळ काढलं? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण भिडूंनो या गणपतीची स्थापना काही खुळेपणाने झाली नव्हती तर त्याच्या मागे सुद्धा लय मोठा इतिहास आहे.

तो इतिहास आहे नागपूरकर भोसल्यांच्या पराक्रमाचा.

मराठा साम्राज्याची सीमा अटके पासून कटकेपर्यंत पसरली होती असे आपण गर्वाने सांगतो. त्याच अटक ते कटक मधील कटक जिंकणारे पराक्रमी घराणे म्हणजे नागपूरचे भोसले. नागपूरकर भोसल्यांनी आपल्या पराक्रमाने महाराष्ट्रातील वऱ्हाडापासून पश्चिम बंगाल आणि ओडिशापासून उत्तर प्रदेशापर्यंत आपले साम्राज्य विस्तारले होते.

हे एवढं मोठं विस्तीर्ण राज्य जिंकण्यासाठी नागपूरच्या शासकांनी अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा. अशाच एका पराक्रमी लढाईमुळे या हडपोक्या गणपतीची सुरुवात झालीय.

१७३९ मध्ये पहिले रघुजी भोसले यांनी नागपूरला भोसल्यांच्या राज्याची स्थापना केली. पहिल्या रघुजी भोसल्यांबरोबरच भोसले घराण्याची वंशावळही अतिशय पराक्रमी होती. त्या पराक्रमी सासस्यांपैकीच एक होते खंडोजी भोसले उर्फ चिमबापू.

जेव्हा नागपूरला भोसल्यांच्या राजगादीची स्थापना झाली त्याच काळात मराठ्यांनी बंगालवर विजय मिळवण्यासाठी चढाई केली होती. मात्र काही कारणास्तव मराठ्यांना त्यात यश मिळाले नव्हते. मराठ्यांच्या या आक्रमणांमुळे मराठे बंगालपर्यंत पोहोचल्यामुळे बंगालचा नवाब अली वर्दी खान मराठ्यांवर चांगलाच खार खाऊन होता. त्यामुळे बंगावर विजय मिळवणे मराठ्यांसाठी बरेच कठीण झाले होते.

परंतु खंडोजी भोसले यांनी कोणत्याही कठीण प्रसंगाला भीक न घालता १७५५ मध्ये बंगालवर कूच केली.

खंडोजी भोसले यांनी कटकेपार असलेल्या बंगाल प्रांतावर आक्रमण केलं. खंडोजी भोसले यांच्या नेतृत्वात मराठा सैनिकांनी बंगालचा नवाब अलिवर्दि खान याच्या फौजेला धूळ चारली आणि निम्मा बंगाल प्रांत आपल्या ताब्यात घेतला.

खंडोजी भोसले यांनी बंगालवर विजय मिळवला आणि नागपूरला परत यायला लागले. बंगालपासून शेकडो मैलांचा प्रवास करून खंडोजी भोसले नागपूरला परतले. परंतु जेव्हा ते नागपूरला पोहोचले तोपर्यंत घरातील कुळाच्या गणपतींचं विसर्जन झालं होतं.

दरवर्षी राजवाड्यावर उत्साहात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या खंडोजी भोसल्यांना त्या वर्षीचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांमुळे साजरा करता आला नव्हता. त्याचबरोबर मराठ्यांनी बंगालवर मिळवलेला विजय अभूतपूर्व असल्यामुळे त्याचा सोहळा सुद्धा साजरा करायचा होता. 

खंडोजी भोसल्यांनी उत्सव साजरा करण्याची आपली इच्छा दरबारात बोलून दाखवली. त्यावर दरबारातील पंडितांनी चर्चा करून पितृ पक्षातील चतुर्थीला पुन्हा एकदा गणपती बसवण्याचा उपाय सांगितला. 

पंडितांनी उपाय सांगितल्यानंतर नागपूरकर भोसल्यांच्या राजवाड्यात गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली. नागपूरच्या राजवाड्यात गणपती बसणार आहे म्हटल्यावर भव्यता तर आलीच. उत्सवासाठी २१ फूट उंच आणि तब्बल बारा हात असलेल्या भव्य गणपतीच्या मूर्ती बनवण्यात आली.

पितृ पक्षातील भाद्रपद कृष्ण चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. गणेशउत्सवाबरोबरच बंगालवर मिळालेल्या विजयाचा सोहळा सुद्धा साजरा करण्यात आला. त्या गणेशोत्सवात लावण्या, खाडी गंमत, नकला, गंमती जमती आणि मौज मजेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.अशा प्रकारे भाद्रपद महिन्यातील दुसऱ्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली.

हा ऐतिहासिक गणेशोत्सव पितृपक्षात साजरा करण्यात येतो. पितृपक्षाला वऱ्हाडी भाषेत हाडोक किंवा हडपोक म्हणतात म्हणून या गणपतीला हडपक्या गणपती म्हटले जाते. तसेच या गणपती उत्सवात मोठ्या प्रमाणात मस्करी करण्यात येत होती. त्यामुळे या गणपतीला मस्कऱ्या गणपती सुद्धा म्हटलं जातं.

१७५५ सालात सुरु झालेला हा गणेशोत्सव गेल्या २६७ वर्षांपासून नागपूर आणि पूर्व विदर्भात साजरा केला जातो. २००५ पासून नागपूरच्या सिनिअर भोसला पॅलेसमध्ये या गणपती स्थापना केली जातेय. आता स्थापन करण्यात येणारी मूर्ती २१ फुटांऐवजी ३.५ फुटांची आणि १२ हातांची असते.  

नागपूरच्या शासकांनी सुरु केलेल्या बाकी उत्सवांप्रमाणेच या गणेशोत्सवाला सुद्धा पूर्व विदर्भातील लोकांनी आपलंस केलंय. नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली जाते आणि थाटामाटात हा गणेशोत्सव साजरा केला जातो. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.