थरार.. ३६ वर्षांपूर्वीच्या बेळगाव आंदोलनाचा !
आज १ नोव्हेंबर..
१९५६ साली आजच्याच दिवशी आपल्या देशात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. या रचनेत बेळगाव, कारवार बिदर, भालकी, निपाणी, खानापूरसह बहुसंख्य मराठी भाषिक लोक असणारा भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला.
अगदी तंतोतंत आकडेवारीच द्यायची झाली तर त्यावेळी या भागात तब्बल ५२ % मराठी भाषिक तर अवघे २३% कन्नड भाषिक आणि बाकी इतर लोक होते. त्यामुळे साहजिकच बहुसंख्येने मराठी भाषिक असणारा हा भाग महाराष्ट्रातच राहील याविषयी कुणालाच शंका नव्हती.
परंतु अनपेक्षितपणे हा सारा मराठी भाषिक परिसर कर्नाटकात घालण्यात आला आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या मराठी जनतेत एकच हल्लकल्लोळ झाला. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात राहायचे आहे, या मागणीसाठी मराठी जनतेने एल्गार सुरु केला.
त्यानंतर महाजन कमिशन, अनेक समित्या, आंदोलने, कोर्ट कज्जे सुरूच राहिले, परंतु त्या परिसरातील मराठी जनतेची महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची इच्छा काही आज तब्बल ६० वर्षे उलटूनही पूर्ण झालेली नाही.
शिवसेनेने या प्रश्नी सतत आग्रही भूमिका घेतली हे सत्य आहे. परंतु त्यातूनही आजतागायत ठोस काही निष्पन्न झालेले नाही. असो.
१९८६ साली कर्नाटकातील तत्कालीन हेगडे सरकारने जोरजबरदस्तीने या सीमावर्ती मराठी भाषिक भागात कन्नड सक्ती राबवायला सुरुवात केली. त्यावेळी तिथल्या मराठी जनतेने मदतीसाठी महाराष्ट्राकडे आशेने पाहिलं. कर्नाटक सरकारच्या या दंडेलीने साहजिकच महाराष्ट्रातील वातावरणही तापलं.
साथी एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली सीमावर्ती भागात जाऊन कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेना अर्थातच या आंदोलनात सहभागी होती.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या तुकड्या बेळगाव आणि सीमाभागात जाऊन आंदोलनाच्या, सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करणार असे ठरले.
ठाण्यातून तत्कालीन महापौर सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची तुकडी रवाना होणार होती. माझा त्या तुकडीत समावेश व्हावा म्हणून मी तत्कालीन उपजिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामागे लकडा लावला होता. त्यांचे म्हणणे होते कि सगळे ज्येष्ठ शिवसैनिक जाताहेत, तुझे वय लहान आहे (मी त्यावेळी १७-१८ वर्षांचा होतो.), तू नको जाऊस.
परंतु अखेर माझ्या सततच्या आग्रहामुळे त्यांनी माझ्या समावेशाला मान्यता दिली. माजिवडे येथून मी आणि माझा मित्र भालचंद्र भोईर यांचा त्या तुकडीत समावेश झाला.
१९८६ सालचा तो जून महिना होता.
आमची ८० जणांची तुकडी बेळगावकडे रवाना होण्यासाठी सज्ज झाली होती.तिकडे कर्नाटकातील वातावरण मात्र या आंदोलनांमुळे प्रचंड तापले होते. त्यातच आमच्या आधी काही दिवस छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली तिथे झालेल्या आंदोलनात काही हिंसात्मक प्रकार घडले होते. त्यामुळे कानडी सरकार आणि पोलीस अधिकच तापले होते.
महाराष्ट्रातून कोणीही येण्याला त्यांनी बंदी घातली होती. छगन भुजबळांनी वेषांतर करून कानडी पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलन करण्यात यश मिळवल्याने कर्नाटकी शासन यंत्रणा आणि पोलीस अधिकच चौकस झाले होते. सीमावर्ती भागाची त्यांनी पूर्ण नाकेबंदी केली होती.
ही सगळी तिकडच्या परिस्थितीची खबरबात मिळाल्यावर आपण तिकडे कसे पोहचणार या चिंतेत आम्ही होतो. परंतु त्यातून मार्ग काढून आंदोलन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सतीश प्रधान, साबीर शेख आणि सर्व नेतेमंडळी गनिमी काव्याची नीती ठरवत होते.
ठरल्याप्रमाणे कोल्हापूरला जाण्यासाठी ठाणे स्टेशनवर आम्ही सगळे जमलो.
आनंद दिघे स्वतः आम्हा सगळ्यांना निरोप द्यायला तिथे आले होते. त्यांनी सर्वांना फुले देऊन निरोप दिला. ट्रेन सुरु झाली आणि आमच्यासोबत असलेल्या साबीरभाई शेख यांनी आम्हा सगळ्यांनाच त्यांच्या वाणीने अक्षरशः भारून टाकले.
पोवाडे, रामायण, महाभारत, शिवचरित्र आदी सगळ्यातील अनेक प्रसंग त्यांच्या तोंडून ऐकताना आम्ही सगळेच अक्षरशः भान विसरून गेलो होतो. अनेक लोक आमच्या सोबत होते. सगळीच नाही, परंतु काही नावं मला ठळकपणे आठवताहेत. मदन मंत्री होते, वर्तक नगरचे रामदास राव होते, भिवंडीचे सुरेश वैती होते. पनवेल-रोहिंजनचे कृष्णा पाटील होते. फोटोग्राफर संजय देवकरचे वडील होते. अनेक ज्येष्ठ लोक होते. ठाणे ते कोल्हापूर प्रवास असाच गाणी-गप्पागोष्टींमध्ये कधी संपला ते समजलेही नाही.
कोल्हापूरला डोंबिवलीच्या माणिक देसाईंचे मोठे घर होते. तिथे आम्ही पोहचलो. विश्रांती,जेवण वगैरे झाले. तिथून पुढे जंगल भागातून अंधारातून गनिमी काव्याने प्रवास करीत बेळगावच्या राणी चेन्नम्मा चौकात पोहचून आम्हाला सत्याग्रह करायचा होता.
साबीरभाई शेख निपाणीला जाऊन सत्याग्रह करणार होते. त्यामुळे त्यांची तुकडी निपाणीच्या दिशेने तर आमची तुकडी सतीश प्रधानांच्या नेतृत्वाखाली बेळगावकडे रवाना झाली. जंगल भागापर्यंत आम्हाला वेगवेगळ्या वाहनांतून माणिक देसाई यांनी व्यवस्थित पोहचवले. तिथून पुढे बरेच चालायचे होते. आम्ही सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात काहीच कळत नव्हते. थोडे उजाडायला लागल्यावर पायाखालचा रस्ता दिसायला लागला.
जंगल काहीसे विरळ होऊ लागले आणि बेळगाव शहराचे अंधुकसे दर्शन आम्हाला झाले. आता अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे होते. जंगलातून आम्ही जिथे शहरात प्रवेश करणार होतो तिथून आमचा सत्याग्रहाचा चौक चार-पाचशे मीटर अंतरावर होता. त्या चौकात पोहचण्याआधी कानडी पोलिसांच्या हाती आम्ही लागू नये हीच आम्हा सगळ्यांची तीव्र इच्छा होती.
अखेर जंगल संपले आणि आम्ही राणी चेन्नम्मा चौकाच्या दिशेने अक्षरशः धावायला सुरुवात केली. ते सगळे चित्र पाहून कानडी पोलीस प्रचंड भांबावले होते.
हे एवढे लोक अचानक कुठून आले, हेच त्यांना कळले नाही. परंतु काही वेळातच सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी आमच्याभोवती कडे करायला सुरुवात केली. तिथे चौकात आधीच काही पत्रकार पोहचले होते.
काही क्षणात आम्ही सर्व नियोजित जागेवर पोहचलो आणि बेळगाव कारवार महाराष्ट्राचा-नाही कुणाच्या बापाचा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय वगैरे घोषणा बुलंद आवाजात सुरु केल्या. बेळगाववासीयही अवाक होऊ आमच्याकडे पाहत होते. आमचा सत्याग्रह प्रचंड यशस्वी झाला होता.
काही वेळातच कानडी पोलिसांच्या बसेस आल्या. त्यांनी आम्हा सर्वांना बसेसमध्ये चढण्याचे आदेश दिले. अगदी शांतपणे ते आमच्याशी वागताना पाहून आम्ही अवाक झालो होतो. कारण आमच्या आधीच्या सत्याग्रही तुकड्यांमधील कार्यकर्त्यांना कानडी पोलिसांनी प्रचंड मारहाण केल्याचे आम्हाला समजले होते. त्या पार्श्वभूमीवर आमच्याशी त्यांचा हा संयत व्यवहार पाहून आम्ही संभ्रमात पडलो होतो.
परंतु काही वेळातच आमचा तो संभ्रम दूर झाला. शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गांचा वापर करीत सत्याग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कानडी पोलीस बळाचा अतिरेकी वापर करून सत्याग्रहींना प्रचंड मारहाण करीत असल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने कर्नाटक सरकार आणि त्यांच्या पोलीसांची देशभर प्रचंड निर्भत्सना झाली होती.
त्यामुळेच त्यांनी पत्रकारांसमोर आम्हाला अगदी शांततेत ताब्यात घेतले होते. परंतु पुढे बेळगाव पोलीस स्टेशनला पोहचल्यावर मात्र त्यांनी आम्हाला त्यांचा इंगा चांगलाच दाखवला.
पोलीस स्टेशनच्या दोनशे मीटर आधीच त्यांनी आमच्या दोन्ही बस थांबवल्या आणि आम्हाला खाली उतरण्याचे आदेश दिले. आम्ही पाहतोय तर दोन्ही बाजूने कानडी पोलीस हातात काठ्या घेऊन उभे आणि त्यांच्यामधून आम्हाला दोनशे मीटरवर समोर दिसणाऱ्या पोलीस स्टेशनपर्यंत जायचे होते.
इथे कोणीही पत्रकार वगैरे नव्हते. आम्ही काय ते समजून चुकलो. बसमधून उतरून पोलीस स्टेशनपर्यंत पोहचेपर्यंत आणि नंतर तिथेही त्या कानडी पोलिसांनी आम्हाला अक्षरशः धुवून काढले. आमच्यातील अनेकजण रक्तबंबाळ झाले. रामदास राव यांचे नाक फुटले. मदन मंत्री प्रचंड जखमी झाले होते. कानडी पोलिसांच्या त्या क्रूर लाठी हल्ल्यात अनेकजण जखमी झाले होते. मला हात-पाय-पाठीवर प्रचंड मार लागला होता. परंतु त्या मारापेक्षाही आम्हाला अधिक चीड वेगळी होती.
अब बोलो महाराष्ट्र..अब बोलो मराठी..अब बोलो शिवाजी महाराज कि जय..
असे ओरडत ते आम्हाला मारत होते.
महाराष्ट्राविषयीचा प्रचंड द्वेष त्यांच्या त्या कृतीतून दिसत होता.
बऱ्याच वेळाने ते थांबले. आम्ही सर्व एकमेकांची विचारपूस करीत होतो. काही औषधे, मलम वगैरेची मागणी आम्ही केली परंतु अर्थातच ती पूर्ण झाली नाही. आमची सगळ्यांची नोंद करण्यात आली. काय गुन्हे दाखल केले ते काय आम्हाला समजलेच नाही.
काही तासांनी आम्हाला परत बसमध्ये बसवण्यात आले. कुठे नेताहेत काही कळत नव्हते. बराच वेळाने एका बंगल्याबाहेर बस थांबल्या. मग पोलिसांच्या समवेत एक व्यक्ती बसमध्ये आली. त्यांनी सांगितले कि ते जज (न्यायमूर्ती) आहेत. तुमच्यापैकी कुणाला काही त्रास आहे का,असे त्यांनी आम्हाला तोडक्या मोडक्या हिंदीत विचारले.
आमच्यापैकी माझ्यासह अनेकांनी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराविषयी त्यांना सांगितले. जखमाही दाखवल्या. मग ते निघून गेले. आम्हाला वाटले, आता त्यांना दया येईल आणि ते आम्हाला मुक्त करण्याचे आदेश देतील. परंतु प्रत्यक्षात घडले उलटेच. आम्हा सगळ्यांना त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
आम्ही सत्याग्रह केला बेळगावात, आणि आता आमची रवानगी झाली ती कर्नाटक-आंध्र सीमेवरील बेल्लारी कारागृहाकडे.
अवघडलेल्या स्थितीत बराच प्रवास करू अखेर आम्ही त्या बेल्लारी कारागृहात पोहचलो. सगळे सोपस्कार उरकून मग कारागृहातील वेगवेगळ्या बराकींमध्ये आमची रवानगी झाली. इथे मात्र एक सुखद चमत्कार घडला. त्या कारागृहाचा जेलर आंध्रचा आणि कर्नाटक व कानडी लोकांचा तिरस्कार करणारा होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करून जेलमध्ये आलेल्या आम्हा सर्वांविषयी त्याला आपुलकी वाटत होती.
बहुदा त्यामुळेच त्यांनी जेलमध्ये आम्हाला फारसा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली. वैद्यकीय मदत पुरवली. जेवण बऱ्यापैकी दिले. एवढेच नाही तर त्याच काळात शिवसेनेचा वर्धापन दिन कि काही असाच दिवस आला होता त्यानिमित्ताने आमच्या आग्रहाखातर त्याने आम्हाला बुंदीचे लाडूही पुरवले.
जेलमध्ये आमचे दिवस गाणी-गप्पा-गोष्टी असेच व्यतीत होते. बाहेर बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर आणि त्यांचे सहकारी मात्र आमच्या जामिनासाठी प्रयत्न करीत होते. अखेर आठवड्याभरानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आणि आम्हाला कोर्टाने जामीन मंजूर केले. अटक झाल्यापासून आठव्या दिवशी आम्ही जेलबाहेर पडलो. तिथून जवळच असलेले आंध्रातील गुंतगल स्टेशन गाठले. ट्रेन पकडली आणि ठाण्याच्या दिशेने निघालो.
तब्बल ३६ वर्षे झाली आमच्या त्या आंदोलनाला, आज १ नोव्हेंबर..
तमाम सीमावासीय आज आपल्या घरांवर काळे झेंडे लावून,काळा दिवस पाळून आपल्यावरील अन्यायाचा निषेध करताहेत. ते पाहतानाच मला आमचे ते आंदोलन आठवले. त्यातील अनेक शिवसैनिक आज हयात नाहीत. परंतु माझ्या डोळ्यांसमोर त्या आंदोलनाचा सारा थरार अजूनही जिवंत आहे.
खंत फक्त एकच.. सीमाभाग महाराष्ट्रात येण्याची आशा मात्र आता अंधुक होत चाललीय..!
-रवींद्र पोखरकर : फोन नंबर 9967530419
हे ही वाचा –
- छगन भुजबळ की दुबईचा व्यापारी इक्बाल शेख ?
- इंग्रजांपासून ते चिनी लोकं, सर्वांच्या प्रयत्नातून जगातील पहिला शिवरायांचा पुतळा उभारला !
- महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादात “सातबाऱ्यावरुन” गायब झालेलं गाव.