EWS आरक्षण मिळालं तर १ लाख पोरांपैकी फक्त १०० जणांनाच फायदा होईल…

मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाल्यानंतर आता ठाकरे सरकारनं मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना आता ‘EWS’ कोटा अंतर्गत १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्य सरकरकडून नुकतेच जारी करण्यात आले आहेत.

मात्र सरकारच्या या निर्णयाचं मराठा समाजातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. समाजातील काही प्रमुख नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला असून आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे, तर काहींनी या निर्णयाचं स्वागत देखील केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला काहींनी हे आरक्षण आधीपासूनच केंद्राने देऊ केलं आहे, यात राज्य सरकारनं वेगळं काहीही केलेलं नाही.

त्यामुळे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे ते बघणं महत्वाचं ठरत.

EWS आरक्षण म्हणजे काय आहे?

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. बेसिकली ज्या समाजाला SC, ST, OBC यांपैकी कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतो, अशांसाठी १०% आरक्षणाची तरतूद आहे.

केंद्र सरकारकडून २०१९ मध्ये हे आरक्षण देण्यात आलं आहे.

या कायद्यांमध्ये आरक्षणाच्या यादीत ज्या जातींचा समावेश नाही, त्याच जातीतील व्यक्तींना आर्थिक दुर्बलांसाठीचे १० टक्के आरक्षण लागू करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

त्यानुसार महाराष्ट्रात त्यावेळी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व ओबीसी आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) प्रवर्ग अशांसाठी आरक्षणाची तरतूद होती. त्यानुसार ‘एसईबीसी’मध्ये मराठा समाजाचा समावेश होत असल्याने त्यांना राज्यात १० टक्के आरक्षणाचा लाभ नाकारण्यात आला होता.

पण, आता मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला EWS आरक्षणाचे लाभ देण्यात येणार आहेत.

EWS आरक्षणाचे अनेक नियम आणि अटी आहेत, यातील काही नियम आणि अटी बघायचे झाल्यास,  

१. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकतं नाही.

२. EWS आरक्षणासाठी पात्र व्यक्तींच्या कुटुंबाची शेती ५ एकरापेक्षा जास्त नसावी.

३. सोबतच घरच्या बाबतीत देखील काही अटी आहेत. यानुसार ग्रामीण भागासाठी ६०० स्केवर फुट आणि शहरी भागासाठी ३०० स्केवर फूटची अट आहे.

याआधी देखील असं आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता 

सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळे तेव्हा तात्पुरता तोडगा म्हणून २२ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार एका वर्षांसाठी मराठा समाजाला EWS अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं घेतला होता.

परंतु हा निर्णय मराठा आरक्षण आंदोलनातील नेत्यांनी फेटाळून लावला होता… 

खा. संभाजीराजे त्यावेळी या निर्णयावर बोलताना म्हणाले होते की,

 “EWS नुसार मिळणारे आरक्षण हे जातीला देता येत नाही. अनुसुचित जाती आणि जमातींना आधीचं आरक्षण देण्यात आलं असल्याने त्यांना १० टक्के आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचं सिद्ध केलं आहे. मराठा समाज सामाजिक मागास आहे तर मग तो वर्ग खुल्या वर्गात येत नाही.

अशावेळी सरकारने तात्पुरते १० टक्के आरक्षण घेण्याचा मार्ग दिला मात्र त्यालाही मराठा समाज तयार नाही. कारण जेव्हा न्यायालयात मराठा समाजाच्या बाजूने निकाल लागेल त्यावेळी हे १० टक्के आरक्षण सोडता येणं शक्य नाही. तसंच त्यावेळी SEBC नुसार मराठा समाज आरक्षणासाठी पात्र राहणार नाही. जर १० टक्के आरक्षण घ्यायचं असतं तर हा संपूर्ण लढा उभा केलाचं नसता.

तसेच, छावा संघटनेचे धनंजय जाधव याबद्दल ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,

त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण कायद्याला केवळ स्थगिती होती. त्यामुळे जर EWS आरक्षणाचा लाभ घेतला असता तर कदाचित आरक्षणाला विरोध करणारे न्यायालयात म्हंटले असते कि या आरक्षणाचा लाभ मिळतं आहे, मग SCBC आरक्षणाचा कशासाठी? त्यामुळे त्यावेळी आम्ही हे आरक्षण नको म्हणून सांगितले होते.

मात्र जाधव यांनी आजच्या निर्णयाचे एक प्रकारे स्वागतच केलं आहे. पण त्यांनी या निर्णयाचं क्रेडिट राज्य सरकारने घेऊ नये, यात त्यांचा काहीही वेगळा निर्णय नाही असं म्हंटलं आहे.

ते म्हणतात, 

मराठा समाजाला सध्या कोणतंही आरक्षण नसल्यामुळे घटनात्मक दृष्ट्या मराठा समाजाला हे आरक्षण मिळणं क्रमप्राप्तचं होतं. यात राज्य सरकारने कोणतीही वेगळी तरतूद केलेली नाही. आणि आता जो पर्यंत इतर दुसरं कोणतं आरक्षण मिळतं नाही तो पर्यंत मराठा समाजानं या आरक्षणाचा लाभ घ्यावा.

तर मराठा आरक्षणाचे समर्थक याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दल मत व्यक्त केलं आहे. 

https://www.facebook.com/watch/?v=490733412250810

या आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा होईल कि तोटा?

दुसऱ्या बाजूला या आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा होईल कि तोटा असा देखील एक प्रश्न विचारला जात आहे.

याबद्दल मराठा आरक्षण प्रश्नाच्या अभ्यासकांच्या मते काही मुद्दे लक्षात घ्यायला हवे. यात जर अटी बघितल्या तर त्या अत्यंत जाचक अशा स्वरूपाच्या आहेत. 

महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाची आर्थिक स्थिती वेगळी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण भागात गेलं तर घराच्या पुढचं आंगणच ६०० स्केवर फुटापेक्षा जास्त असतं, आणि त्याहून मोठं घर असतं. मात्र याचा अर्थ ते कुटुंब सधन असते असं बिलकुल म्हणता येत नाही. त्यामुळे या नुसार बराचसा मराठा समाज EWS आरक्षणासाठी अपात्र ठरु शकतो. 

१० टक्के आरक्षणाचा ३२ टक्के समाजाला कितपत लाभ मिळणार?

आणखी एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात साधारण ३२ टक्के मराठा समाज आहे. तर EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण जाहीर झालं आहे. परंतु या १० टक्केमध्ये आधीपासूनच काही जाती समाविष्ट आहेत. त्यामुळे या १० टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला कितपत लाभ मिळेल असा देखील एक सवाल विचारला जातं आहे.

याबद्दल बोलताना धनंजय जाधव म्हणतात,

हे बरोबर आहे कि ३२ टक्के समाजाला १० टक्के आरक्षण त्यातही आधी पासूनच जाती समाविष्ट असलेल्या प्रवर्गातून आरक्षण दिलं आहे. हे आरक्षण पुरेसं होणारच नाही. पण काहीच नसण्यापेक्षा काही तरी असणं कधीही चांगलं.

यात आता १ लाख पैकी अवघ्या शेकडो किंवा हजारो मुलांनाच लाभ मिळेल पण सध्या ते घेणं गरजेचं आहे.

तर जेष्ठ वकील दिलीप तौर यांनी मागच्या वेळी हा निर्णय घेतलेला तेव्हाच एका माध्यमाशी या बद्दल बोलताना सांगितले होते कि,  

महाराष्ट्रात एकूण ३२ टक्के मराठा समाज आहे. EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे खुल्या प्रवार्गातील इतर समाज पकडून अंदाजे ४ ते ५ टक्के आरक्षण मराठ्यांना मिळू शकते.

आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे आरक्षण न्यायालयात टिकेल का?

कायदे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एक गोष्ट बारकाईनं बघितल्यास एक गोष्ट लक्षात येऊ शकेल, ती म्हणजे हे आरक्षण केंद्राचे आहे, आणि याबाबत आधीपासूनच एक याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

सोबतच हे आरक्षण जातीनुसार दिलं जात नाही, त्यामुळे मराठा समाजाला देखील हे आरक्षण जातीनुसार मिळालेल नाही. केवळ SEBC हा प्रवर्ग रद्द झाल्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ घेण्यापासून असलेले निर्बंध मागे घेतले आहेत.

फक्त यात आता जर राज्य सरकारने १० टक्क्यांचा १२ टक्के केलं असतं तर हा निर्णय न्यायालयात टिकला नसता. राज्याने १० टक्क्यांमध्येच मराठा समाजाचा समावेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.