मुख्यमंत्री पद गेल्यावर ते म्हणाले, “माझ्या नावाच्या मागे कायमचं माजी मुख्यमंत्री तरी लागलं .”
निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी बातमी होती.
ते मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा चुकून त्यांचे नाव निवडले गेले असं लोक म्हणायचे.
इंदिरा गांधीना अभयसिंहराजे भोसलेंना मुख्यमंत्री करायचं होतं पण नावात चूक झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले असं लोक छातीठोकपणे सांगायचे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अजूनही त्यांची ओळख कित्येकांना प्रसिध्द व्याख्याते शिवाजीराव भोसले यांचे बंधू हीच आहे. अर्थात यात लोकांचा दोष नाही. बाबासाहेब भोसल्यांना फार मोठी कारकीर्द मिळाली नाही किंवा जी संधी मिळाली त्याचे सोने करता आले नाही असं म्हणलं जातं.
पण बाबासाहेब भोसलेंची विनोदबुद्धी मात्र आजवरच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सरस होती. त्यांनी कोणते निर्णय घेतले हे कुणी सांगू शकत नाही पण त्यांचे विनोद मात्र आजही जुने लोक चवीने सांगतात.
त्यातलेच काही नमुने.
बाबासाहेब भोसले दिल्लीत असताना त्याकाळचे रेल्वेमंत्री शर्मा त्यांना भेटायला आले. त्यांनी बाबासाहेबांना विचारलं,
‘व्हीच सिटी यु कम फ्रॉम?’
त्यावर बाबासाहेब म्हणाले,
‘आय कम फ्रॉम सिम्पली सिटी.’
पत्रकार अशोक जैन एकदा बाबासाहेबांना दिल्लीत भेटले. बाबासाहेब नुकतेच इंदिरा गांधीना भेटून आले होते. अशोक जैन यांनी त्यांना विचारलं की इंदिरा गांधींशी तुमची पाऊण तास भेट झाली. एवढी कसली चर्चा चालू होती ?
यावर बाळासाहेब म्हणाले,
‘तुम्ही लिहा पाऊण तास, पण त्यातली ४२ मिनिटं मी वेटिंग रूम मधेच होतो. MADAM फक्त तीन मिनिट भेटल्या. पण तुम्ही राज्याच्या व पक्षाच्या संघटनात्मक बाबींविषयी चर्चा झाली असाही नेहमीप्रमाणे लिहून टाका. पण तुम्हाला खरं सांगतो, मी आणि MADAM शी चर्चा? अहो त्यांच्या नजरेला नजर भिडवण सुद्धा शक्य नाही.’
दिल्लीत हायकमांडकडे नेत्यांची खरी परिस्थिती काय होती हे बाबासाहेबांनी दिलखुलासपणे जैनांना सांगितलं.
कॉंग्रेसमध्ये नेते आधी हायकमांडची भेट घेतात आणि मग मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात असा अलिखित नियम असल्यासारखे आहे. पण बाबासाहेबांनी उलट केलं. त्यांनी आधी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि मग इंदिरा गांधीना भेटायला गेले.
पत्रकारांनी विचारलं.
तुम्ही असं उलट का केलं?
तर बाबासाहेब म्हणाले,
‘बाबानो वेळीच शपथ घेऊन टाकलेली बरी. ही कॉंग्रेस आहे. इथे शपथ घेतल्यानंतर राज्यपालांच्या समोर रजिस्टरमध्ये मुख्यमंत्री म्हणून सही करण्याचा मधलं वेळ असतो त्यावेळेतही मागच्या मागे कोट ओढून माघारी बोलवले जाऊ शकते.’
असे मनमोकळे बोलणारे फार कमी नेते आज आहेत. बाबासाहेब भोसले १९८० साली पहिल्यांदा आमदार झाले. आणि १९८२ साली थेट मुख्यमंत्री. स्वप्नात पण कुणाला वाटलं नव्हतं. खरतर बाबासाहेबांना पण वाटलं नसणार. पण या गोष्टीची भविष्यवाणी कुणी केली होती माहितीय ?
बाळासाहेब ठाकरेंनी. १९८० च्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या प्रचाराला बाळासाहेब ठाकरे आले होते. सेनेने तेंव्हा कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. आणि प्रचारसभेत बोलताना बाळसाहेब म्हणाले होते की बाबासाहेब फक्त आमदारच नाहीतर मंत्रीपण होणार.
विनोद म्हणता येणार नाही पण मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यावर बाबासाहेब बोलले होते.
मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून काय झालं. माझ्या नावामागे माजी मुख्यमंत्री हे पद तर आहे. ते कोण काढून घेणार आहे ?
असे अजिबात कटुता न येऊ देता बाबासाहेब सहज पदावरून बाजूला झाले. आज जरी महाराष्ट्र त्यांना विसरला असला तरी त्यांची कारकीर्द सहज विसरता येण्यासारखी नक्कीच नव्हती.
हे ही वाचा.
- महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री ज्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता.
- दादासाहेब कोण होते ?
- विलासराव म्हणाले, आमदारांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच करा.