ही गोष्ट आहे एसबीआयच्या माजी अध्यक्षांच्या गुलीगत घोटाळ्याची.

तुम्हाला गोष्टी आणि किस्से ऐकायला आवडतात का ? सहाजिकच कोणाला पण किस्से गोष्टी आवडतातच. पण आज तुम्हाला मी एक अशा घोटाळ्याची गोष्ट सांगणार आहे, ज्याला बातमीमुल्य तर आहे पण त्याची कुठं चर्चाच नाहीये.

तर गोष्ट आहे प्रतिप चौधरी नामक एसबीआयच्या माजी अध्यक्षांच्या गुलीगत घोटाळ्याची.

तर ही गोष्ट सुरू होते २००७ मध्ये. गोदावन नावाचा एक समूह आहे. या समूहाचे मालक होते दिलीप सिंह राठोड. ज्यांनी गढ राजवाडा हा हॉटेलचा प्रोजेक्ट करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एसबीआय कडून २४ करोड रुपयांच लोन घेतलं. २०१० मध्ये दिलीप सिंह राठोड यांचा मृत्यू झाला. आता प्रोजेक्ट पण अर्धाच राहिला. कंपनीने लोन बुडवल, म्हणून कंपनी कथितरित्या लोन डिफाल्टर बनली.

आता हे लोन देणारे एसबीआयचे प्रतिप चौधरी आहेत ना त्यांनी अल्केमिस्ट एसेट रिकंस्ट्रक्शन नावाच्या कंपनी सोबत साटलोट केलं. आणि भारतीय रिजर्व बँकेच्या नियमांचं उल्लंघन करीत राठोडांच्या त्या अर्धवट प्रोजेक्टला गैर निष्पादित संपत्ति म्हणजेच एनपीए घोषित केलं. आणि २०० करोडची कंपनी २५ करोडला विकून टाकली.

पुढं हे महाशय २०१३ मधून एसबीआयच्या अध्यक्षपदा वरून रिटायर्ड झाले. आणि २०१४ ला ते अल्केमिस्ट एसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीच्या बोर्डावर गेले.

आता त्यांनी आपल्या बापाची संपत्ती अशी कवडीमोल पैशाने विकली म्हणून राठोडच्या मुलाने हरेंद्र राठोडने राजस्थान मध्ये गुन्हा नोंद केला. पण पोलीस पण मॅनेज झाले. त्यांनी २०१५ च्या प्रथमिक अहवालात क्लोजर रिपोर्ट देत म्हंटल की, काही व्यक्तींचा हा सिविल विषय होता. आणि त्या राजस्थान पोलिसांनी चौधरीच्या विरोधात काही ऍक्शन घेतलीच नाही.

पण हा हरेंद्र राठोड काही ऐकला नाही. त्यानं २०१६ मध्ये गोदावन एक निषेध याचिका दाखल केली. यात त्यानं या प्रकरणातील पोलिस कारवाई आणि तपासाला आव्हान दिलं. पुढं एसबीआयच्या या चौधरीलास्थानिक न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.

आता हा आदेश १२ फेब्रुवारी २०२० ला जारी करण्यात आला होता, पण कोविड महामारीमुळे त्याची अंमलबजावणी थांबविण्यात आली होती.

कोर्टानं आपल्या दिलेल्या निकालात म्हंटल की,

आरोपींनी मालमत्तेचा लिलाव करताना योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही. लिलाव करताना घाई गडबड करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया एसबीआयचे माजी अध्यक्ष, एसबीआयच्या इतर अधिकार्‍यांच्या संगनमताने ‘मालमत्ता मिळवण्यासाठी’ रचलेली ‘षडयंत्र’ असल्याच दिसतय. या एसबीआयच्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर केला.

त्यामुळे या चौधरीवर भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०९ आणि १२० ब अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तर यात सहआरोपी असणारे अल्केमिस्ट एआरसीचे आलोक धीर यांना ट्रांजिट अग्रिम जामीन मिळालाय.

अशाप्रकारे घोटाळा झाला होता, तो उघडकीस आला आहे. एसबीआयच्या अध्यक्षाला अशाप्रकारे अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.