भाजपला सोडचिठ्ठी देणारी शिवसेना, आता केंद्रातही काँग्रेसच्या गोटात जाण्याची शक्यताय…

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. दोन्ही काँग्रेस आधीपासूनच एकत्र आहेत, मात्र अगदी विरुद्ध विचारसरणी असलेली शिवसेना या आघाडीत आली आणि राजकीय पंडितांपासून सामान्य नागरिकांनाही धक्का बसला. राज्यातल्या सरकारनं नुकतीच दोन वर्षही पूर्ण केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौराही नुकताच पार पडला. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर, शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीबद्दल भाष्य केलं होतं. तर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार विरोधात लढण्यासाठी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी तयार करण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.

या सगळ्यात शिवसेनेची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. शिवसेना राज्यात काँग्रेससोबत असली, तरी केंद्रात काँग्रेससोबत जाणार की ममता बॅनर्जी यांना तिसरा पर्याय सुरू करण्यास बळ देणार याबाबत चर्चा सुरू होत्या. आता मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत संयुक्त पुरोगामी आघाडीत म्हणजेच युपीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

याआधी शिवसेना भाजपच्या नेतृत्वातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच एनडीएमध्ये होती. शिवसेनेकडे केंद्रीय मंत्रीपदही होतं. मात्र महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याआधीपासूनच भाजप आणि सेनेत धुसपूस सुरू होतीच.

आता दोन वर्षांत भाजप आणि सेनेतलं अंतर आणखी वाढलं आहे. लोकसभा निवडणुकांना आणखी दोन ते तीन वर्ष बाकी आहेत, तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. भाजपला थेट अंगावर घेणाऱ्या सेनेची भूमिका या निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरू शकते.

म्हणूनच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करता सेनेचा रोख कुठल्या गटाकडे आहे, हे निश्चितच महत्त्वाचं आहे.

राऊत यांच्या भेटीगाठी

या सगळ्या गोष्टी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आधी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मग प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत,अशी सूत्रांची माहिती आहे.

ममता दिदींच्या भेटीनंतरच चर्चेला उधाण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी तयार करण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर, शिवसेनेनं मात्र विरुद्ध भूमिका घेतली होती. संजय राऊत यांनी, ‘भाजपला सत्तेतून घालवायचं असेल, तर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल,’ असं वक्तव्य केलं होतं.

त्यातच गेल्या दोन वर्षांत काँग्रेस आणि सेनेत टीकांच्या बाणांची देवाणघेवाणही झालेली नाही, त्यामुळं त्यांचं सूत पक्कं जमत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच संजय राऊत काँग्रेसच्या बड्या नेत्यांना भेटणार असल्यानं शिवसेना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वातल्या युपीएमध्ये समाविष्ट होणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हे ही वाच भिडू:

English Summary: Shivsena likely to join UPA said by Sources Sanjay Raut will meet Rahul Gandhi and Priyanka Gandhi

 

webtitle: shivsena may join upa ahead elections in five states

Leave A Reply

Your email address will not be published.