भारतीय हँडलूमला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी एका फॉरेनरला यावं लागलं

फॅब इंडिया म्हणजे साधेपणात सौंदर्य दाखवणारा ब्रँड. हातमागावर पारंपरिक पद्धतीनं विणलेल कापडं आणि त्यावर केलेलं अस्सल भारतीय डिझाइन. त्यामुळे या कपड्यांवर अगदी मातीत रुजलेल्या कलेची छाप दिसून येते. त्यासोबतचं पारंपरिक आर्टिफिशल ज्वेलरी, ऑर्गॅनिक फूड, बॉडी केअर अश्या सगळ्या भारतीय वस्तुंसाठी फॅब इंडिया ओळखलं जातं.

असा हा भारताच्या मातीची आणि परंपरांची आठवण जपणारा ब्रँड उभा केलाय तो मात्र एका परदेशी माणसानं. पण त्याचा उद्देश हा ग्रामीण भागातील व्यावसायिकांना व्यासपीठ मिळवून देणं हाच होता.

जॉन बिसेल

असं या उद्योजकाचे नांव.

बिसेल हे ६० च्या दशकात अमेरिकेत तिथल्या ‘फोर्ड फाऊंडेशन’ या कल्याणकारी संस्थेसाठी काम करत होते. याच संस्थेच्या माध्यमातून ते १९५८ साली ग्रामीण लघुउद्योग विकास कार्यक्रमांतर्गत भारत सरकारचे साहाय्यक सल्लागार म्हणून भारतात आले.

पुढचे दोन वर्ष सल्लागार म्हणून काम करत असताना त्यांचं भारतातील बऱ्याच ग्रामीण भागाशी संबंध आला. त्यावेळी त्यांचा ग्रामीण भागातला हातमाग व्यवसाय, हस्तकला, कशिदाकारी हे सगळं जवळून बघायला मिळालं.

या दरम्यान जॉन यांना इथल्या प्रत्येक भागात बनणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं वैशिट्य असतं. एवढंच नाही तर एक गोष्टी असली तरी देखील प्रत्येक भागात तिचं वेगळं वैशिष्ट्य असतं हे यांच्या लक्षात आलं.

यात मग साधं सुती कापडाचं उदाहरण जरी घेतलं तरी, राजस्थानपासून ते अगदी इकडे दक्षिणेत कर्नाटकापर्यंत किंवा आसामपासून आंध्रपर्यंत ते हातमागावर विणलेल असल्यामुळे त्या कपड्यांची स्वत:ची अशी एक खासियत आहे त्यांनी ताडलं. 

पहिली दोन वर्षे या कापड कारागिरांसोबत काम करताना त्या ग्रामीण कारागिरांना अनुदान देत त्यांना आपला माल निर्यात कसा करायचा याचं प्रशिक्षण त्यांनी दिलं.

त्यानंतर १९६० मध्ये याच ग्रामीण व्यावसायिकांना स्वतःचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वत:चा पुढाकार घेत ब्रॅण्ड सुरू केला.

नाव दिलं फॅब इंडिया!

सुरुवातीच्या काळात दिल्लीमधल्या राहत्या दोन खोल्यांच्या घरात या स्टार्टअपला सुरुवात झाली. कपड्यांच्या आधी इंडियन मेड होम फर्निशिंगचा व्यवसाय जॉन यांनी सुरू केला. या दरम्यान एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरशी त्यांची गाठभेट झाली आणि फॅब इंडियाने वस्त्रोद्योग क्षेत्रात अधिकृतरित्या प्रवेश केला.

आपल्या आजारी आजीकडून वारसा हक्कानं मिळालेले २० हजार डॉलर्स जॉन यांनी या स्टार्टअपसाठी वापरले.

फोर्ड फाउंडेशनसाठी भारतात काम करत असताना त्यांचा कारागिरांशी उत्तम संपर्क होताच. सोबतचं विविध राज्यांतील विणकरांना भेटत गुणवत्ता, सातत्य आणि उत्तम फिनिशिंग याबद्दलचे काही निकष त्यांनी घालून दिले, आणि त्यांच्याकडून काम करवून घ्यायला सुरुवात केली.

यामध्ये जॉन यांनी पारंपरिक कलाकारांना जास्तीत जास्त चालना दिली. कारण त्यांचा उद्धेशच मुळात तो होता. व्यवसाय चांगला चालत होता. १९६५ पर्यंत २० लाखांचा टर्नओव्हर झाला.

पुढे १९७५ मध्ये आणीबाणी काळात घरातून व्यवसाय चालवण्यावर आलेल्या निर्बधांमुळे जॉन यांनी स्वतंत्र ऑफिस सुरु केलं. १९७६ मध्ये दिल्लीच्या खान मार्केटमध्ये फॅब इंडियाचं पहिलं आउटलेट सुरू झालं.

मात्र त्याच वर्षी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेनं परदेशी नागरिकांच्या भारतीय व्यवसायातील समभागांवर ४० टक्क्यांचं बंधनं घातल्यामुळे जॉन बिसेल यांना त्यांचे खास मित्र मधुकर खेरा यांना व्यवसायात काही टक्क्यात पार्टनशीप द्यावी लागली. पण त्याचा व्यवसायावर मात्र काही परिणाम झाला नाही.

जॉन यांचं हे स्टार्टअप म्हणजे विविध राज्यांतील हातमाग आधारित वस्त्रोद्योगाला नव्या स्परुपातील एक आव्हानचं होतं. ते परदेशात जावून फिरुन आपल्या मालाचं मार्केटिंग करत असतं.

हळू हळू जॉन यांचा पसारा वाढत होता. निर्यातीचा व्यापार वाढतं होता. पण त्यांना खरा धक्का बसला १९९२ मध्ये. इंग्लंडमधील ‘हॅबिटॅट’ या सर्वात मोठ्या ग्राहकसंस्थेनं आपला स्वतःचा खरेदी एजंट नेमल्यामुळे फॅब इंडियाला हा ग्राहक गमवावा लागला. मात्र खचून न जाता त्यांनी पुन्हा सुरुवात केली.

१९९८ मध्ये स्ट्रोकमुळे ६६ व्या वर्षी जॉन बिसेल यांच्या निधन झालं.

त्यानंतर त्यांचे पुत्र विल्यम बिसेल यांनी व्यवसाय हाती घेतला. त्यांनी देखील बराच काळ राजस्थानमधील कारागिर आणि कलाकारांसोबत घालवला होता. त्यामुळे त्यांना व्यवसायाची चांगील जाण होती.

जॉन बिसेल यांनी भारतीय बाजारात तितकसं लक्ष घातलं नव्हतं असं म्हंटल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण १९९८ पर्यंत दिल्लीत केवळ दोन आटऊलेट होती. मात्र पुढे विल्यम यांनी भारतीय बाजारात लक्ष केंद्रीत केलं. व्यवसायाचा विस्तार केला.

२००० नंतरच्या वर्षांमध्ये जवळपास १११ आऊटलेट सुरु झाली.

२००४ मध्ये फॅबइंडियानं चाकोरी सोडतं कपड्यांशिवाय इतर उत्पादनांची सुरुवात केली. यात पहिलं होतं ऑर्गॅनिक फुड. २००६ मध्ये वैयक्तिक कारणांसाठी लागणारी प्रोडक्ट चालू केली. आणि अखेरीस २००८ मध्ये हॅन्डक्राफ्ट ज्वेलरीची सुरुवात केली.

जॉन यांनी स्थापन केलेल्या फॅबइंडियाला विल्मय यांनी वाढवतं नेलं. आज तब्बल २१ राज्यांतील जवळपास ४०,००० कारागिरांना त्यांनी सामावून घेतलं आहे. दोन खोल्यांच्या घरात सुरू झालेला व्यवसाय भारतात ३२७ आउटलेट्समधून आणि भारताबाहेर १४ आऊटलेट्समधून विस्तारत गेला आहे.

दुबई, बहारीन, दोहा, रोम, इटली, चीन अशा विविध देशांमधल्या शहरात हा ब्रॅण्ड भारतीय हातमाग कलेचा वारसा घेऊन पोहोचलेला आहे.

फॅब इंडियची दोन खास वैशिष्टय़े कायम जाणवत असतात.

पहिलं म्हणजे अशा कोठल्याही व्यवसायात हातमागावर विणलेल्या कपड्यांच्या प्रत्यक्ष किमतीमधील फक्त ५% रक्कम त्या विणकराला मिळते, पण कारागिरांची समभागधारक पद्धती राबवत हेच प्रमाण फॅब इंडियानं २६% इतकं केलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय ग्रामीण कारागिरांना योग्य रोजगार यातून प्राप्त होत .

आणि दुसरं वैशिष्टय़ म्हणजे टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रांतून जाहिरातबाजी न करता केवळ आणि केवळ गुणवत्ता तसंच तोंडी प्रसिद्धीच्या जोरावर मागची ६० वर्षे हा ब्रॅण्ड यशस्वी ठरला आहे. असं उदाहरण एखादचं!

एकुणचं भारतीय नसून देखील तळागाळातील भारतीय कारागिरांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता उभा केलाला हा ब्रॅन्ड विशेष आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.