जश्न-ए-रिवाजचा मॅटर संपला पण आता फॅब इंडियाच्या डोक्याला नवा ताप होऊ शकतो…
काही दिवसांपूर्वी फॅब इंडियाच्या jashn-e-riwaz या कॅम्पेनवरून वाद सुरु झाला होता. कंपनीने दिवाळीच्या वेळी आपले खास कलेक्शन लॉन्च केले होते. ज्याच्या जाहिरातीसाठी कॅम्पेन चालवले आणि त्याला जश्न-ए-रिवाज असं नाव दिलं. यावरून मोठा गोंधळ उडाला, ज्यामुळे कंपनीला ट्रोल केलं होतं. ट्रोलर्सच्या म्हणण्यानुसार, हिंदू सणांना उर्दू नाव देऊन कंपनी हिंदूंच्या सणांचा अपमान करत आहे.
हा वाद इतका पेटला होता कि, कित्येक दिवस #boycottfabindia हा हॅशटॅग ट्रेंड होत होतं. ज्यानंतर कंपनीने हे नाव मागे घेतलं होत. हा वाद संपत नाही तर कंपनी पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झालीये.
यामागचं कारण म्हणजे फॅब इंडियाचं बन्ना आणि रजवाडा कलेक्शन. कारण कंपनीच्या या कलेक्शनची नाव फक्त नावं नाहीत तर त्यांचा जातीय संदर्भ देखील आहे.
आता तुम्ही म्हणाल ते कसं, तर एका वृत्तसंस्थेलच्या अहवालानुसार, राजस्थानात राजपूत समाजाचं वर्चस्व आहे आणि असं म्हणतात की, राजपूत समाजात बऱ्याच ठिकाणी पुरुषांना त्यांच्या नावाऐवजी बन्ना असं म्हणायची एक प्रथा आहे. बन्ना म्हणजे राजपूत माणूस. त्यामुळे बाकीच्या कुठल्याही जातीतील पुरुषांना बन्ना म्हंटलं जात नाही.
असं म्हणतात कि, बन्ना म्हणणे हा त्यांचा हक्क मानला जातो. एवढंच नाही तर तिथल्या भागात ‘बन्ना बॉईज’ नावानं पोरंटोरं गँगसुद्धा चालवतात आणि बाकीच्यांवर दादागिरी करतात. राजस्थानमधला हा ट्रेंड फार जुना आहे पण अजूनही तो पाहायला मिळतो.
आता यात फॅब इंडियाचा संबंध म्हंटल तर, त्यांचे अनेक कुर्ते आहेत ज्यांना ‘बन्ना’ असे लेबल दिलेले आहे. ‘कॉटन बन्ना लाँग कुर्ता’ आणि ‘कॉटन बन्ना शॉर्ट कुर्ता’ सारखे अशी काही. आणि कंपनीच्या या कॅटॅगरीच्या कपडे आणि दागिन्यांसह वापरण्यात येणारी टॅगलाइन म्हणजे ‘आपका राजसी अंदाज निखारने वाला एक बेमिसाल कलेक्शन.’
आता तसं पाहायचं झालं तर पारंपारिक पोशाख आणि दागिन्यांच्या स्टोअरची चेन असणाऱ्या फॅबइंडिया या ब्रँडने गेल्या वीस वर्षात भरपूर फेम मिळवलय. त्याचे कुर्ते, कॉटन जॅकेट, साड्या यांच काम उत्कृष्ट तर असतंच पण त्यांच्या किमतीही परवडणाऱ्या असतात. महत्वाचं म्हणजे कंपनी वेळेनुसार एका विशिष्ट वर्गाला फोकस करून आपलं कलेक्शन तयार करते आणि विकते. फॅबइंडिया शहरांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
आता वाद होण्यामागचं कारण म्हणजे रजवाडा आणि बन्ना हे विशेषाधिकार असलेल्या उच्च जातींचे प्रतीक आहेत. त्यामुळे जे बाकीचे जे ग्राहक आहेत. जे वंचित किंवा तुलनेने कमी समजल्या जाणार्या जातीतील आहेत, त्यांना वेगळाच संदेश दिला जातोय.
महत्वाचा म्हणजे फॅबइंडियाचा दावा आहे की ‘भारतातील विशाल आणि समृद्ध कारागिरी लोकांपर्यंत नेण्याचा हा एक मार्ग आहे’ जेणेकरून कारागिरांचे फायदे लक्षात घेऊन देशी हस्तकला आणि कलांचे जतन आणि विक्री करता येईल.
त्यांचे बहुतेक कपडे किंवा दागिने राजस्थानमधील जोधपूरच्या आसपासच्या सलावाससारख्या गावांमधून येतात. त्यामुळे कंपनीने ड्रेस आणि दागिन्यांचे मार्केटिंग करण्यासाठी रजवाडा आणि बन्ना सारखे जातीवादी शब्द निवडणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.
आता कोणतही उप्तादन विकताना आपण ग्राहकवर्गाच्या आवडीनिवडी, बाजारपेठ या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यावर अभ्यास करून ते मार्केटमध्ये लॉन्च करतो. एवढंच नाही तर त्यामुळे कोणता वाद निर्माण होणार नाही ना हे देखील पाहतो. पण फॅब इंडियामध्ये संवेदनशीलतेचा प्रचंड अभाव असल्याचं अनेकांचं मत आहे.
असं म्हंटल जातंय कि, फॅब इंडिया एकीकडे राजस्थानातील स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देते, पण त्याचे मार्केटिंग करताना रजवाडा/बन्ना अशी वेगळी ओळख देऊन त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती आणि सामाजिक भेदभाव याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतेय कि काय असा सवाल उपस्थित केला जातोय.
हे ही वाच भिडू:
- एका जाहिरातींमुळं आमिर खानचे दिवाळीच्या आधीचं फटाके फुटलेत
- शेवटी दबावामुळे डाबर कंपनीला ती समलैंगिक जाहिरात मागं घ्यायला लागली..
- लोकांना गंडवणाऱ्या आधुनिक शिक्षण सम्राटाची जाहिरात शाहरुखला महागात पडली होती..