झुक्याचा दणका: फेसबुक आभासी जग निर्माण करतंय

Ready का…..Ready

हं तर सुरु करूया. २०१८ सालात हॉलिवुडवाल्यांनी एक वंटास पिक्चर आणला होता. सायफाय फिक्शन. Ready Player One.. असं त्याच नाव. तो पिक्चर जसा आहे ना शेम टू शेम गेम फेसबूक तयार करतंय.

आता ज्यांनी हा Ready Player One बघितला नाही त्यांनी तो पिक्चर बघाच, पण ज्यांना बघायला वेळ नाही त्यांनी आपली गप पडून स्टोरी वाचा, म्हणजे चटदिशी समजेल फेसबुक काय ढासू विषय करायला लागलाय ते…

तर ही गोष्ट आहे २०४७ सालची. जग विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचलय आणि जगातल्या सगळ्या मशीनी माणसांवर वर्चस्व गाजवायला लागल्यात. अशा परिस्थितीत, वेड वॉट्स नावाचा मुलगा एक खास व्हिडिओ गेम खेळून खऱ्या जगात दहशत निर्माण करतो. पिक्चर मध्ये दाखवलेला तो व्हर्च्युअल गेम प्रत्येक व्यक्तीला जगायला बळ देतो.

हा पिक्चर तुम्हाला मेटाव्हर्सच्या जगात घेऊन जातो. मेटाव्हर्स, म्हणजे असं जग जे रिअल मध्ये नाहीये पण तंत्रज्ञानामुळे डोळ्यांना दिसणार ते जग आहे त्याही पेक्षा जास्त रिअल बनत. आणि असलंच काहीतरी आपले फेसबुकचे सर्वेसर्वा झुक्या साहेब करायला लागलेत.

म्हणजे थोडक्यात तो मेटाव्हर्स बनवायला लागलाय अशा बातम्या यायला लागल्यात. आणि यासाठी झुक्याने फेसबुक मध्ये कामगारांची भरती सुद्धा सुरू केलीय.

पुढच्या ५ वर्षांसाठी फेसबुक मेटावर्स तयार करण्यासाठी युरोपियन युनियनच्या देशांमधून १०,००० लोकांची भरती करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मार्क झुकरबर्ग काय बनवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याला इंटरनेट जगाचा गेम चेंजर म्हटल जातय.

पण भिडू हे Metaverse? काय विषय आहे हे आधी समजून घ्या.

जर सोप्या भाषेत मेटावर्स समजून घ्यायचं झालं तर तुम्ही जो विचार करता त्याच्या पलीकडे घेऊन जाण्याची क्षमता. आपल्या विश्वाच्या पलीकडे जाऊन, आपल्या समजुतीच्या पलीकडे जाण्याची ही बाब आहे. याचा अर्थ असा की, हे सर्व चंद्र-तारे आणि आकाशगंगा त्यापेक्षाही अधिक आहेत. अशी जागा जी कोणीही पाहिली किंवा ऐकली नसेल आणि तीचा फक्त विचार केला की तुम्ही पोचलातच त्या जागेवर. हे केवळ तंत्रज्ञानाद्वारे शक्य झालयं. पूर्वी आपण आपल्या डोक्यात ज्या कल्पना करायचो, त्या तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता.

१९९२ मध्ये अमेरिकन लेखक नील स्टीफनसन यांनी आपल्या सायन्स फिक्शन नोवेल स्नो क्रॅशमध्ये हा मेटावर्स शब्द वापरला. तेव्हा मेटाव्हर्स हा शब्द पहिल्यांदा प्रकाशझोतात आला.

स्टीफन्सनच्या मते, मेटावर्स हे एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्यात कोणीही आपला अवतार बदलू शकतो आणि त्यांना हव्या असलेल्या जगाचा प्रवास करू शकतो.

ही कादंबरी बरीच लोकप्रिय झाली आणि ट्रेंड सुरू झाला. यानंतर, विल्यम गिब्सनने त्याच्या ‘बर्निंग क्रोम’ आणि ‘न्यूरोमॅन्सर’ या लघुकथांमध्ये मेटाव्हर्स उल्लेख केला. मॅट्रिक्स हा प्रसिद्ध चित्रपट नंतर न्यूरोमॅन्सर वर बनला.

आता फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला असलंच आभासी जग निर्माण करायचं आहे. याला मेटावर्स असे नाव दिले जात आहे. त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे तो त्याचा अवतार निवडू शकतो. त्याच पद्धतीने आपलं जग निवडू शकतो.

आता आभासी जगात जायचं तर काहीतरी तयारी करायला हवीच की ?

मेटाव्हर्सच्या जगात जाण्यासाठी आपल्याला काही डिव्हाईस आवश्यकता असणार आहे. यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी हेड सेट. हे हेडफोन एक प्रकारचं आभासी जगात जाण्याचं उपकरण आहे. हे डोळे आणि कान यामध्ये बसवलं जातं. फेसबुकने आपला VR सेट Oculus आधीच लॉन्च केला आहे. Oculus नावाचा हा VR हेडसेट बनवणाऱ्या कंपनीला फेसबुकने २०१४ साली खरेदी केले होते.

यानंतर, २०१९ मध्ये, फेसबुकने होरायझन नावच एक आभासी जग लॉन्च केले जे या हेडसेटशी कनेक्ट होत. या जगात एन्ट्री करण्यासाठी फेसबुककडून विशेष इंविटेशन आवश्यक आहे. ऑकुलस हेडसेट घालून कोणीही या जगात एन्ट्री करू शकतो.

जेव्हा कोरोनाच लॉकडाऊन सुरू होत तेव्हा फेसबुकने ऑगस्ट २०२१ मध्ये होरायझन वर्करुम्स सुरू केले. यामध्ये, व्हीआर हेडसेट घालून काम करणाऱ्या व्यक्तीला अस वाटू लागलं की तो प्रत्यक्षात ऑफिसच्या मिटिंग रूम मध्येच आहे.

आता माहिती घेऊन झाली खरं हे बनणार कधी ?

तर सांगायला गेलं तर फेसबुकने तयारी तर तगडी सूरु केलीय. पुढच्या ५ वर्षात फेसबुक १० हजार इंजिनिअरिंग केलेल्या पोरांना या कामाला लावणार आहे. आणि यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेत आणि करणार देखील आहे. पण आता आभासी जग तयार करणं खाऊच काम नाहीये. हे तयार करायला घाम पण गाळलाच पाहिजे.

असो…ते आभासी जग तयार होईल तेव्हा होईल, तुम्ही ते Ready Player One पिक्चर बघा.. आणि त्यावरच आपलं समाधान माना. ते आभासी जग महाराष्ट्रात येईस्तोवर आपली एक पिढी अजून खपवायला पाहिजे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.