मोदींचे भाऊ अब्जाधीश- लक्षाधीश असल्याचा व्हॉट्सॲप मॅसेज फिरतोय..पण खरं-खोटं काय ?

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप जास्त फॉरवर्ड केला जातोय. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली आहे. मोदी नेहमी म्हणतात त्यांच्यामध्ये घराणेशाही नाही आणि ते खूप सध्या कुटुंबातून आले आहेत. नेमकं याच मुद्याला मेसेजमध्ये चॅलेंज करण्यात आलं आहे. मोदींचे भाऊ गडगंज श्रीमंत आहेत, असा दावा यात करण्यात आला आहे.

एकदा बघा…

WhatsApp Image 2022 08 02 at 5.34.24 PM

हा मेसेज खूप विचार करायला लावणारा आहे. अनेकांनी यावर टीका केली आहे तर काहींनी या मेसेजच्या आधारे मोदींना धारेवर धरल्याचं देखील दिसलं आहे. 

हे वाद-प्रतिवाद बाजूला ठेऊन एक मुद्दा इथे आपल्यासाठी महत्वाचा ठरतोय, तो म्हणजे… 

या मेसेजमध्ये तथ्य किती आहे? म्हणूनच फॅक्ट चेक करण्याचं आम्ही ठरवलं. 

हा मेसेज नक्की कधी आणि कुठून फॉरवर्ड व्हायला सुरुवात झाली? याचा शोध घेतला तेव्हा माहिती मिळाली ती म्हणजे हा मॅसेज काही आजचा नाही. सगळ्यात पहिले हा मॅसेज माध्यमांमध्ये फिरला तो २०१७ साली. २०१७ सालची एक फेसबुक पोस्ट आजही गुगल केली तर मिळू शकते.

‘मोदी नामा’ नावाच्या मोदीसमर्थक फेसबुक पेजवर ही पोस्ट लिहिली गेली होती. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींच्या कुटुंबातील आठ सदस्यांची यादी आहे. तेव्हापासून ही पोस्ट व्हायरल होतीये. मूळ इंग्लिश भाषेत लिहिली गेलेली ही पोस्ट मराठी, हिंदी भाषेत नंतर भाषांतरित करण्यात आली.

हे ट्रान्सलेशन असं केलं गेलंय की, पोस्ट तीन वर्षांपूर्वीची आहे आणि आजही मेसेजमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचं वय सारखंच ठेवण्यात आलं आहे. त्यात बदल झालेला नाही. मात्र मूळ मेसेजमध्ये ८ भावांची नावं आहेत तर मराठीतील मेसेजमध्ये अजून नावं जोडली गेली आहे आणि संख्या झाली आहे १२.

अल्ट न्यूज (alt news) या वृत्तसंस्थेने यातील ८ जणांचे फॅक्ट चेक केले आहेत. त्यानुसार लिस्टमधील एका एका व्यक्तीबद्दल फॅक्ट चेक बघूया…

१. सोमाभाई मोदी

सोमाभाई मोदी हे पंतप्रधान मोदींचे सख्खे ज्येष्ठ बंधू आहेत. व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, सोमाभाई मोदी सेवानिवृत्त  आरोग्य अधिकारी असून सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत. मेसेज वाचताच एक गोष्ट खटकते ती म्हणजे यात फक्त ‘रिक्रूटमेंट बोर्ड’ असं म्हटलं आहे मात्र कोणत्या क्षेत्रातील रिक्रूटमेंट बोर्डाचे अध्यक्ष हे नमूद करण्यात आलं नाहीये.

कोणत्याही राज्य सरकारांकडे वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र रिक्रूटमेंट बोर्ड असतात. सर्वांचा एकच अध्यक्ष असू शकत नाही.  गुगलच्या अॅडव्हान्स सर्चमध्ये बघितलं तेव्हा दिसून आलं की, रेल्वे, पोलिस (लोकरक्षक) आणि शिक्षण विभागात रिक्रूटमेंट बोर्ड आहेत.

या प्रत्येक रिक्रूटमेंट बोर्डचे अध्यक्ष कोण आहेत?  याची माहिती संबंधित खात्याच्या वेबसाइटवर असतेच. यामध्ये कुठेच सोमाभाई मोदींचं नाव नाहीये. 

२. अमृतभाई मोदी

अमृतभाई मोदी हे नरेंद्र मोदींचे दुसरे सख्खे ज्येष्ठ बंधू आहेत. यांच्याबद्दल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, ते पूर्वी खाजगी फॅक्टरीत नोकरी करत होते आणि आज ते अहमदाबाद आणि गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती आहेत. 

रिअल इस्टेट वेबसाइट प्रॉपटिगरच्या म्हणण्यानुसार, अहमदाबाद आणि गांधीनगरमधील मोठमोठ्या एकूण गृहनिर्माण प्रकल्पांचं नेतृत्व गोदरेज प्रॉपर्टीज (१२८ प्रकल्प) आणि शोभा लिमिटेड (१५४ प्रकल्प) हे समूह करतात.

गोदरेज प्रॉपर्टीज स्थापना आदि गोदरेज आणि शोभा लिमिटेडची स्थापना पुथन नुवक्कट चेंथामराक्ष मेनन यांनी केली आहे. जर अमृतभाई अहमदाबाद आणि गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट व्यावसायिक असते, तर त्यांचेचं नाव शोधता आलं असतं. मात्र, कोणत्याही मीडिया रिपोर्ट्स किंवा रिअल इस्टेट वेबसाइट्सवर त्यांच्या नावाची कुठेच माहिती मिळत नाही. 

३. प्रल्हाद मोदी 

सोमाभाई आणि अमृतभाई नंतर नंबर लागतो नरेंद्र मोदी यांचा आणि त्यांच्या पाठचे भाऊ आहेत प्रह्लाद मोदी.  व्हायरल मेसेजमध्ये नमुद केल्यानुसार, प्रल्हाद मोदी यांचं रेशन दुकान होतं आणि सध्या त्यांचे अहमदाबाद, वडोदरा इथे Hyundai, Maruti आणि Honda च्या फोर व्हीलरचे शो-रूम आहेत.

अहमदाबादस्थित मारुती शोरूमचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद नागर यांनी माध्यमांना सांगितल्यानुसार,

वरील पैकी एकही शोरूम प्रल्हाद मोदी यांच्या किंव्हा त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा नाही.

प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्त भाव धान्य फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. सध्या  फेडरेशनच्या वतीने जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट अखिल भारतीय रास्त भाव धान्य फेडरेशनचे सदस्य भेट घेणार आहेत.

या आंदोलना दरम्यान प्रल्हाद मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात प्रश्न उपस्थित करत, ‘माझा भाऊ पंतप्रधान असला म्हणून काय झालं? मी काय उपाशी मरू का?  म्हणत जंतरमंतरवर आंदोलन सुरु केलं आहे.  प्रल्हाद मोदी हे गुजरातमध्ये रेशन दुकान चालवितात.

४. पंकज मोदी

प्रल्हाद भाई यांच्या नंतर मोदींना वसंतीबेन नावाच्या बहीण आहेत आणि त्यांच्या पाठचे सगळ्यात धाकटे बंधू आहेत पंकज मोदी. पंकज मोदींबाबत व्हायरल मेसेजमध्ये सांगितलंय की, ते पूर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी होते आणि आज रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमाभाई यांच्या सोबत असतात.

बस्स, हा मुद्दा तर इथेच खोटा ठरतो. कारण जर सोमाभाई यांच्याच व्यवसायाबद्दल चुकीची माहिती आहे तर त्यांच्यासोबत पंकज मोदी देखील तिथे कार्यरत असल्याचा हा दावा खोटाच पडतो. 

५. भोगीलाल मोदी

नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास यांच्या पाठचे बंधू नरसिंहदास होते. त्यांच्या मुलांबद्दल देखील माहिती व्हायरल पोस्टमध्ये देण्यात आली आहे. नरसिंहदास यांचे ज्येष्ठ पुत्र आणि नरेंद्र मोदींचे चुलत भाऊ म्हणजे भोगीलाल मोदी. 

भोगीलाल मोदी यांच्याबद्दल व्हायरल मेसेजमध्ये सांगितलं आहे की ते किराणा दुकानाचे मालक होते आणि आज अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा इथल्या रिलायन्स मॉलचे मालक आहेत.

मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकाऱ्याने पुष्टी केली की रिलायन्स मॉल्स कोणत्याही व्यक्तीच्या मालकीचं असू शकत नाहीत कारण कंपनीत फ्रँचायझी सिस्टम असते.

आता कंपनी फ्रँचायझी देत नाही म्हटल्यावर भोगीलालभाई मोदी किंवा इतर कोणीही रिलायन्स मॉलचं मालक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

६. अरविंद मोदी 

भोगिलाल यांच्या पाठचे बंधू अरविंद मोदी. मेसेजनुसार ते आधी भंगार व्यापारी होते आणि आता रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. 

पहिला मुद्दा म्हणजे त्यांचा व्यवसाय सांगताना त्यांच्या स्टील कंपनीचं नाव नमूद करण्यात आलेलं नाहीये. इथेच पहिला संशय येतो. दुसरं म्हणजे गुजरातचे मोठे स्टीलचे कंत्राटदार बघितल्यास समजतं की, अशा नावाचा कोणताच व्यक्ती कंपनीचा मालक नाही. 

७. भारत मोदी

अरविंद मोदी यांच्यानंतर मोदींना चंपाबेन नावाच्या चुलत बहीण आहेत. चंपाबेन यांच्यानंतर भारत मोदी यांचा नंबर लागतो. मेसेजमध्ये सांगण्यात आलंय की ते आधी पेट्रोल पंपावर काम करत होते आणि आता अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप त्यांचा आहे. 

गुगल मॅपवर ‘अगियारस पेट्रोल पंप’ शोधला तर त्याचं अस्तित्त्वात नसल्याचं आढळतं. गुगल मॅपवर पेट्रोल पंपाची नोंद झालेली नाही म्हणून मीडिया रिपोर्ट्सअभावी हा दावा खोटा असल्याचंही सूचित होतं. 

८. अशोक मोदी 

भारत मोदी यांच्यानंतर रामीला नावाच्या बहीण आहेत आणि त्यानंतर अशोक भाई येतात. व्हायरल मेसेजनुसार यांचा व्यवसाय आधी पतंग आणि किराणा दुकान असा होता आणि आता ते रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार आहेत. 

इथेही तेच… भोगीलाल मोदी यांचाच व्यवसाय चूक आहे तर अशोक मोदी त्यात भागीदार असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

९. चंद्रकांत मोदी

अशोक मोदींचे धाकटे बंधू म्हणजे चंद्रकांत मोदी. व्हायरल मेसेजनुसार त्यांचा व्यवसाय गौशालेचा होता आणि आज ते अहमदाबाद, गांधीनगर इथे त्यांची नऊ दुग्ध उत्पादन केंद्रं आहेत. 

गौशालेला जोडून दुग्ध उत्पादनाचा संदर्भ देण्यात आल्याचं पहिल्यांदा बघताच समजतं. तर दुसरा मुद्दा नऊ दुग्ध उत्पादन केंद्र सांगण्यात आली आहेत मात्र एकाही केंद्राचं नाव देखील नमूद करण्यात आलेलं नाहीये. तेंव्हा गुगलवर शोधायचं म्हटलं तर नक्की त्यांच्या मालकीचं केंद्र कोणतं आहे याची माहितीच  मिळत नाही. 

१०.  रमेश मोदी

रमेश मोदी देखील नरेंद्र मोदींचे चुलत भाऊ. मोदींचे काका जगजीवन दास यांचे ते पुत्र. व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात आलंय की, ते अशी शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज त्यांच्याकडे पाच शाळा, ३ अभियांत्रिकी महाविद्यालये, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

इथेच तोच तो मुद्दा… त्यांच्या मालकीच्या एकाही महाविद्यायाचं नाव मिळत नाहीये. 

११. भार्गव मोदी 

नरेंद्र मोदी यांचे काका कांतीलाल यांचे पुत्र भार्गव मोदी. व्हायरल मेसेजमध्ये सांगितलंय की ते रमेश मोदी यांच्या संस्थांमध्ये भागीदार आहेत. जर रमेश मोदींबद्दल माहिती मिळत नाही तर भार्गव मोदी यांच्यावर संशय येण्याआधीच ‘हे चूक आहे’ असं समजतं. 

१२.  बिपिन मोदी

बिपिन हे नरेंद्र मोदींचे सर्वात लहान काका जयंतीलाल मोदी यांचे पुत्र आहेत. मेसेजमधील व्यवसायानुसार ते अहमदाबादच्या लायब्ररीत काम करायचे. आज K.G ते बारावीपर्यंत शालेय पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कंपनीत भागीदार आहेत.

वरील सर्व भावांच्या व्यवसायाची पडताळणी केली आणि त्याचा काय निष्कर्ष निघाला हे सांगितलं आहे. तेव्हा आता बिपीन मोदींच्या व्यवसायाबद्दल निष्कर्ष तुम्हीच ठरवा. तसंच..

वरील सर्व मुद्दे बघता आता या व्हायरल मॅसेज किती खरा आणि किती खोटा याबाबत तुम्हीच ठरवा…  

बाकी असे मेसेज व्हाट्सअप, फेसबुकवर फिरत असतात. या व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटीवर किती विश्वास ठेवायचा हे देखील ठरवणं महत्वाचं आहे. कोणताही मॅसेज फॉरवर्ड करण्याआधी फॅक्ट चेक करणं गरजेचं असतंय भिडू..

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.