खरंच पूर्वीच्या काळी युद्धात २०० किलोच्या तलवारी वापरल्या जायच्या का..?

अनेक ऐतिहासिक किस्से ऐकताना कधीतरी आपल्या कानावर पडलेलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे ६२ किलोंची तलवार होती, महाराणा प्रताप २०० किलोचा अंगरखा घालायचे. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की खरंच असं होतं का? इतक्या वजनदार गोष्टी त्यांचा शरीराला पेलवायच्या का? की हे एक मिथक आहे ?

असाच प्रश्न आमच्या मुकेश चौधरी या वाचकाला पडला आणि त्यासंबंधीचं नेमकं खरं-खोटं काय याची विचारणा त्यांनी आमच्याकडे केली. आमचाही रिसर्च सुरु झाला आणि त्यातून जे काही मिळालं तेच तुमच्याशी शेअर करतोय.

इतिहास लेखनात वीर रसाचा भरभरून वापर

भारताच्या इतिहासात अनेक राजे-महाराजे होते. त्यांच्यामध्ये सत्तेसाठी अनेक राजकीय लढाया होत असत. सहाजिकच लढाई म्हंटलं निरनिराळी शस्त्रास्त्रे आलीच. अनेक राजांच्या लढाईतील पराक्रमाचा इतिहास लिहणारे बहुतांश लोक हे राजाच्या दरबारातले आश्रित असत. त्यामुळे बऱ्याचवेळा राजावरील प्रेमाखातर अथवा त्याच्या दबावाखाली ही मंडळी इतिहास प्रचंड वीर रसाने भरत असत. मग त्यात राज्याची व राज्याचा सैनिकांची तुलना दहा हत्तींशी करण्यासारखे प्रकार तर हमखास होत असत.

राजा युद्धाला जायचा त्यावेळी त्याच्या शरीरावर प्रचंड वजनदार कवच लादायचा, हाती भली मोठी तलवार घ्यायचा, अशीही अनेक रसपूर्ण वर्णने आपल्याला ऐतिहासिक किस्स्यांमध्ये वाचायला मिळतात. सध्याच्या सोशल मिडीयाच्या जगात व्हॉटसअँप हे तर इतिहासाचं अघोषित विद्यापीठ झालं आहे. त्यावरून असा खरा खोटा इतिहास एका क्लिकवर फिरवला जातो आणि तळागाळापर्यंत पोहचवला जातो. तो इतिहास खरा की खोटा याची शहानिशा करायला कोणालाच  वेळ नसतो आणि मग त्यालाच प्रमाण मानलं जातं.

शिवाजी महाराज काय किंवा महाराणा प्रताप काय दोघेही पराक्रमी होते, यात कुणालाच काही दुमत असण्याचं कारण नाही, पण  ६२  किलोंची  तलवार एखाद्या माणसाला उचलणं शक्य आहे का ? किंवा एखाद्या पुरुषाच्या सरासरी वजनापेक्षा दुप्पट वजनाचा म्हणजेच २०० किलोचा अंगरखा घालून युद्ध लढलं जाऊ शकतं का..? इतका साधा विचार लोक करत नाहीत आणि या माहितीवर विश्वास ठेवतात.

आता तुम्ही म्हणाल की आम्ही अमुक-तमुक ठिकाणच्या शस्त्रास्त्र  संग्रहालय, किल्ला, राजवाडे याठिकाणी तर असे भले मोठे शस्त्र बघितलेले  आहेत, ती शस्त्रास्त्रे काय खोटी आहेत का..?

तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असं की ही शस्त्रास्त्रे खोटी नाहीत. पूर्वीच्या काळी अशी वजनदार शस्त्रास्त्रे बनवून घेतली जात असत हे अगदी खरं असलं तरी त्यांचा उपयोग युद्धासाठी केला जात नव्हता. ही शस्त्रास्त्रे राजा-महाराजांच्या पराक्रमाची आणि वैभवाची प्रतिक समजली जायची.

राजाच्या शस्त्रागारात ती जपून ठेवलेली असायची. विजयादशमी अर्थात दसऱ्याला राजे महाराजे आपल्या शस्त्र अस्त्रांचे पूजन करायचे. राजाच्या वैभवाचं प्रतिक समजल्या जाणाऱ्या या शस्त्रास्त्रांचं प्रदर्स्षण देखील भरवलं जायचं. आपली जनता आणि आजूबाजूच्या राजांवरील आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजे-महाराजे अशी प्रदर्शने भरवित असत.

या शस्त्रास्त्रांचा वापर युद्धासाठी अगदी क्वचितच अथवा होतच नव्हता. म्हणूनच तर ती शस्त्रास्त्रे  इतक्या प्राचीन काळापासून सुस्थितीत राहू शकली.  आज देखील ती आपल्याला प्रदर्शनात बघायला मिळतात, त्यामागचं कारण हेच. त्यामुळे ही गोष्ट आधी डोक्यात पक्की करून घ्या की युध्दात वापरली गेलेली शस्त्रास्त्रे इतकी वजनदार बिलकुल नसतात.

राष्ट्रीय वास्तू संग्रहालयात बघता येतील युद्धात वापरण्यात आलेली शस्त्रास्त्रे 

प्राचीन काळी प्रत्येक्ष युद्धात वापरण्यात आलेली शस्त्रास्त्रे जर तुम्हाला बघायची असतील तर तुम्ही राष्ट्रीय वास्तू संग्रहलयाला भेट देऊ शकता. या संग्रहालयात युद्धात वापरण्यात आलेली अनेक शस्त्रास्त्रे बघायला मिळतात. या शस्त्रास्त्रांमध्ये आणि शोभेच्या हत्यारांच्या वजनामध्ये जमिन अस्मानचा फरक असल्याचं आपल्या लक्षात येईल. प्रत्येक्ष युद्धात वापरल्या जाणाऱ्या तलवारीचे जास्तीत जास्त वजन हे २ ते ५ किलो दरम्यान असायचे तर अंगावरचे चिलखत २०  किलोंपेक्षा अधिक नसायचे. भाल्याचं वजन १३ किलोपर्यंत असल्याचं आपल्याला बघयला मिळेल.

प्रत्येक्ष युद्धभूमीवर शत्रूशी लढताना चपळतेच्या दृष्टीने कमी वजनाचीच शस्त्रास्त्रे  आणि अंगरखे वापरण्यास राजे-महाराजे प्रधान्य देत असत. ही शस्त्रास्त्रे सोबत बाळगणं देखील सोयीस्कर असायचं. कमी वेगामुळे वेगाने शत्रूवर प्रहार करायला आणि स्वसंरक्षण अधिक चांगल्यारीतीने करायला मदत व्हायची.  कमी वजनाची परंतु अतिशय धारदार असणारी ही शस्त्रे शत्रूला क्षणार्धात घायाळ करायला उपयुक्त ठरायची. प्राचीन राजा-महाराजांचं सोडा एव्हाना इंग्रज देखील अशीच हत्यारं वापरत असत.

आपले पूर्वज आणि राजे महाराजे शूर व बहादूर होते. ते युद्ध कलेत अतिशय पारंगत आणि निपुण देखील होते. त्यामुळेच तर ते युद्धामध्ये पराक्रम गाजवू शकले. परंतु त्यांच्यात दहा हत्तीचे बळ होते आणि ते २०० किलोचा अंगरखा घालून किंवा ६२ किलोची तलवार घेऊन युद्ध लढायचे, हे वर्णन मात्र वीर रसाने भरलेले आहे.  त्याचा वास्तवाशी कसलाही संबंध नाही, एवढं मात्र नक्की सांगता येतं.

तुम्हालाही असे काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला  bolbhidu1@gmail.com या ई-मेलवर कळवा.

हे ही वाच भिडू

 

 

1 Comment
  1. Sudarshan jadhav says

    मला सर्व माहिती खुप आवडली

Leave A Reply

Your email address will not be published.