खरंच व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का..?

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराजांच्या पराक्रमाच्या आख्यायिका ऐकतच आपण लहानचे मोठे झालेलो असतो. त्यामुळे सहाजिकच आपल्याला महाराजांविषयी प्रचंड अभिमान देखील असतो.

महाराजांचं नाव घेतल्यानंतर ज्याची छाती अभिमानाने ५६ इंच फुगणार नाही, असा माणूस महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही.

पण याच अभिमानातून आपण महाराजांच्या संदर्भातील अनेक अफवांवर देखील विश्वास ठेवतो. आपल्यापर्यंत पोहोचलेल्या माहितीची कुठलीही खातरजमा न करता आंधळेपणाने आपण अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतो.

शिवाजी महाराजांच्या व्हिएतनाममधील पुतळ्याच्या व्हायरल झालेल्या गोष्टीविषयी देखील असंच काहीसं म्हणता येईल.

तर पहिल्यांदा व्हिएतनाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याची गोष्ट डोक्यातून काढून टाका. व्हिएतनाममध्ये शिवाजी महाराजांचा कुठलाही पुतळा नाही. व्हिएतनामी जनतेला महाराजांच्या इतिहासाविषयी जास्ती गोष्टी माहिती नाही. त्यामुळे व्हिएतनाममध्ये महाराजांचा पुतळा असण्याचं कुठलंही कारण नाही.

पण या गोष्टीने आपल्याला काय फरक पडतो..?

महाराजांची महानता सिद्ध करण्यासाठी खरंच व्हिएतनाममध्ये काय किंवा इतर कुठल्या देशात महाराजांचा पुतळा असणं गरजेचं आहे का..?

मग ही अफवा पसरली कशी…?

व्हिएतनामच्या ‘हो ची मिन्ह’ या शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याची अफवा पसरवण्याचं श्रेय सोशल मिडिया आणि काही वेबसाईटसह सोशल मिडीयाच्या जमान्यात गोष्टींच्या खऱ्या-खोट्याची  खातरजमा न करता त्या फॉरवर्ड करणाऱ्या आपल्या सर्वांचं.

हिंदूजागृती आणि वर्ल्ड हिंदू न्यूज या दोन वेबसाईटवर असा दावा करण्यात आलाय की व्हिएतनामची राजधानी ‘हो ची मिन्ह’ या शहरात महाराजांचा पुतळा आहे. व्हिएतनामने अमेरीकेविरोधातील युद्धात विजय मिळवून स्वातंत्र्य मिळवलं.

अमेरीकेविरोधातील हे युद्ध व्हिएतनामने गनिमी काव्याच्या पद्धतीने लढलं आणि त्यासाठीची प्रेरणा त्यांनी महाराजांकडून घेतली. याच गोष्टीच्या सन्मानार्थ व्हिएतनाममध्ये महाराजांचा पुतळा उभारण्यात आला, असंच काहीसं या दोन्हीही वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या स्टोरीमध्ये म्हंटलं गेलंय.

या दोन्ही वेबसाईट व्यतिरिक्त २०१५ साली ट्विटरवरील ‘नत्था’ नामक हँड्लरवरून एक फोटो अपलोड करण्यात आला होता. ज्यात देखील काहीसा असाच दावा करण्यात आला होता. हेच ते तीन मुख्य सोर्स होते, जिथून ही अफवा मोठ्या प्रमाणात पसरवली गेली.

व्हिएतनाम आणि शिवाजी महाराज यांचा खरंच काही संबंध आहे का..? 

महाराजांचा व्हियेतनामशी कसलाही संबंध नाही. व्हिएतनाममध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक महाराष्ट्रीयन लोकांनी देखील ‘हो ची मिन्ह’ शहरात महाराजांचा कुठलाही पुतळा नसल्याची खात्री केली आहे.

व्हिएतनामने गनिमी काव्याने अमेरिकेशी लढून स्वातंत्र्य मिळवलं, ही बाब खरी असली तरी त्याचा महाराजांच्या गनिमी कावा युद्धतंत्राशी कसलाही संबंध नाही. व्हिएतनामने त्यांचं वेगळं ‘गनिमी कावा’ तंत्र विकसित केलं होतं, ज्याच्या आधारे त्यांनी अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळवलं.

tran ngyun han
हो ची मिन्ह येथील त्राण ग्यून हान राजाचा पुतळा

राहिली गोष्ट ‘नत्था’ नामक ट्विटर हँड्लरवरून टाकण्यात आलेल्या पुतळ्याच्या फोटोची, तर हा पुतळा महाराजांचा नसून तो व्हिएतनामी राजा ‘त्राण ग्यून हान’ यांचा आहे. या पुतळ्याच्या जवळून घेतलेला फोटो बघून आपल्याला ही गोष्ट लक्षात येईलच की तो महाराजांचा पुतळा नाही.

तुमच्या डोक्यात देखील अशा काही शंका असतील तर आपले प्रश्न   bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.

हे ही वाच भिडू 

2 Comments
  1. चेतन says

    गोव्यातील माझे पत्रकार मित्र प्रभाकर ढगे यांनी याविषयीचे संशोधन केले आहे. त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत.

  2. नवनाथ says

    बोल भिडू, मी नवनाथ वय अवघे 21 पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सांगली,कोल्हापूर,सातारा,आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये जास्तकरून शेतकरी डाळिंब या फलबागेचे उत्पन्न घेतले जाते आणि जास्त माल असल्या कारणाने इथे मागेल तसा दर मिळत नाही,त्यामुळे डायरेक्ट आपला माल मुंबई च्या मार्केट मध्ये न्यावा अशी इच्छा आहे पण दुर्दयवाने आम्हाला योग्य ती माहिती नाही आणि त्यात फसवणुकीची भीती त्याबद्दल थोडी माहिती द्यावी,आणि तुमच्याकडून काही आयडिया असेल तर आम्हाला नक्की कळवा, बोलण्यात काही चुकलो असल्यास माफी असावी, आपलाच शेतकरी…..😊 मो.7057391734

Leave A Reply

Your email address will not be published.