एका मताने फडणवीसांनी सगळं गणित फिरवलं ; अशी होती फडणवीस स्ट्रेटेजी..

विधानपरिषदेचा निकाल लागला, या निकालाच्या पहिल्या फेरीत भाजपच्या प्रविण दरेकरांना 29, श्रीकांत भारतीय यांना 30, राम शिंदे यांना 30, उमा खापरे यांना 27 मते मिळाली. पहिल्या फेरीत भाजपच्या 4 उमेदवारांचा विजय झाला. तर भाजपच्या प्रसाद लाड यांना पहिल्या फेरीत17 मते मिळाली.

दूसरीकडे महाविकास आघाडीला पहिल्या फेरीत एकूण 150 मते मिळाली. यात राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर यांना 28, एकनाथ खडसेंना 29, शिवसेनेच्या सचिन अहिर यांना 26, आमश्या पाडवी यांना 26 तर कॉंग्रेसच्या चंद्रकांत हंडोरें यांना 22, भाई जगताप यांना 19 मते मिळाली.

भाजपला पहिल्या क्रमांकाची एकूण 133 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पहिल्या क्रमांकाची एकूण 57 मते मिळालीत. शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या क्रमांकाची 52 मते मिळाली. तर कॉंग्रेसच्या उमेदवारांना पहिल्या क्रमांकाची एकूण 41 मते मिळाली…

या मतमोजणीत दोन मतांची मोजणी मागे ठेवण्यात आली. यातलं एक मत भाजपच्या उमा खापरे आणि एक मत रामराजे निंबाळकर यांना होतं.

कॉंग्रेसचा गेम नक्की कोणी केला, फडणवीसांची रणनिती काय होती व भाजपणे पुन्हा महाविकास आघाडीला कसं अस्मान दाखवलं..

पहिला मुद्दा म्हणजे कोणाचे किती आमदार होते, व किती मते अधिकची मिळाली व किती मते वजा झाली..

भाजपचे एकूण 106 आमदार आहेत तर एकूण 7 अपक्ष व लहान पक्षांचे आमदार भाजपच्या बाजूचे आहेत. त्यामुळे भाजपच्या एकूण मतांची संख्या होते 113. विधानपरिषदेच्या निवडणूकीत भाजपला पहिल्या पसंतीची मते मिळाली ती 133. यात भाजपच्या बाजूचं एक मत मोजण्यात आलं नाही, म्हणजेच भाजपने 20 अधिक 1 अशी एकूण 21 मते आपल्याकडे ओढली.

शिवसेनेच्या आमदारांची संख्या आहे 55, पैकी त्यांच्या उमेदवारांना पहिल्या क्रमांकाची मते मिळाली 52. म्हणजेच सेनेच्या पहिल्या क्रमांकाची तीन मते दूसरीकडे वळवली गेली.

तर राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या आहे 53 पैकी मतदान करणारे आमदार होते 51. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पहिल्या क्रमांकाची एकूण मते मिळाली 57. यात रामराजेंच एक मत बाजूला ठेवण्यात आलं. म्हणजेच राष्ट्रवादीला अतिरिक्त 6 अधिक 1 अशी एकूण 7 मते मिळाली आहेत.

तर कॉंग्रेसच्या उमेदवारांना पहिल्या क्रमांकाची मते मिळाली ती 41. कॉंग्रेसच्या मतदारांची संख्या आहे 44. अर्थात कॉंग्रेसची 3 मते वजा झाली.

एकूण सांगायचं झालं तर विधानपरिषदेच्या निवडणूकीत भाजपला 20 अधिक 1 अशी 21, राष्ट्रवादीला अतिरिक्त 6 अधिक 1 अशी 7 मतं अधिकची मिळाली तर शिवसेनेची 3 मते आणि कॉंग्रेसची 3 मते वजा झाली..

राज्यसभेच्या निवडणूकीत फडणवीसांनी गेम केलेला तो दूसऱ्या फेरीला. आजही फडणवीसांनी दूसऱ्या फेरीची गेम यशस्वी खेळी करून दाखवली.

कॉंग्रेसच्या हंडोरे यांना 22 मते मिळाली. त्यांना निवडून येण्यासाठी 26 मतांची आवश्यकता होती. म्हणजे हंडोरे यांची 4 मतं कमी मिळाली. भाई जगताप यांची 19 आणि हंडोरे यांना पडलेली 22 मते मिळून 41 मते होतात. याचा अर्थ कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 3 मते कमी मिळाली आहेत. तर एका उमेदवाराला कोटा पुर्ण करण्यासाठी 4 मते कमी मिळाली आहेत.

त्यामुळे मुद्दा येतो तो त्या एका मताचा.

कारण भाई जगताप यांना जे 1 मत अधिकचं मिळालं ते कॉंग्रेसच्या उमेदवारांने टाकलं की अपक्षांनी टाकलं. हा प्रश्न उपस्थित होतो. समजा हे कॉंग्रेसचं 1 मत भाई जगतापांना गेलं असेल तर कोटा न पुर्ण करता एक मत कॉंग्रेसने आपल्याचं दूसऱ्या उमेदवाराकडे कसकाय फिरवलं, हे शक्य आहे का? तर नाही असच उत्तर मिळेल.

याच एका मतामुळे काही प्रश्न पडतात..

पहिला प्रश्न म्हणजे, भाई जगतापांना मिळालेलं 1 मत हे कॉंग्रेसच्या उमेदवारांच की अपक्षाचं. जर अपक्षाच असेल तर कॉंग्रेसचं ते अधिकचं एक मत देखील फुटलं अस म्हणता येईल.
दूसरा प्रश्न म्हणजे, राष्ट्रवादीच्या अतिरिक्त 6 मतात हे मत गेलं नसेल कशावरून…
तिसरा प्रश्न म्हणजे, क्रॉसव्होटिंग करायला लावून फडणवीसांनीच दोन्ही उमेदवारांना दुसऱ्या फेरीपर्यन्त ठेवलं आणि आपला उमेदवार निवडून आणला नसेल हे देखील कशावरून..

आत्ता येवूया शिवसेनेकडे.

शिवसेनेच्या आमदारांची संख्या आहे 55. पैकी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या क्रमांकाची मते मिळाली आहेत ती 52. मग शिवसेनेची 3 अतिरिक्त मतं कुठं गेली? सचिन अहिर यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं की 26 चा कोटा पुर्ण करून अतिरिक्त 3 मतं आम्ही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडे फिरवली.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना 6 मत अधिकची मिळाली आहेत. त्यामुळे या 6 मतात 3 मते शिवसेनेची असतील अस म्हणता येईल. मात्र ही अधिकची 3 मते आम्ही कॉंग्रेसकडे फिरवली अस सेनेचे मत असेल तर एकतर कॉंग्रेसची एकूण 7 मते फुटली अस म्हणावं लागेल किंवा सेनेची 3 मते फुटली अस समजून जावं लागेल.

आत्ता मुद्दा उपस्थित होतो तो राष्ट्रवादी बाबत.

राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या आहे 51, राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना 6 मत अतिरिक्त मिळाली. मतमोजणी दरम्यान एक मत बाजूला ठेवण्यात आलं. जे रामराजेंना होतं. म्हणजे राष्ट्रवादीला अतिरिक्त 7 मतं मिळाली आहेत. मुळात कोटा 26 चा असताना व त्याचं पालन शिवसेनेनं केलेलं असताना रामराजे निंबाळकर यांना 2 अधिक बाजूला ठेवलेलं एक अशी कोट्यापेक्षा 3 मते व खडसेंना कोट्यापेक्षा अधिकची 3 मते मिळाली.

ठरलेल्या कोट्यापेक्षा 6 अधिकची मते मिळालेली आहेत. ही मते राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेसचे उमेदवार जगताप किंवा हंडोरे यांच्याकडे फिरवू शकली असती? पण तो का फिरवला नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतो,

यावरून देखील दोन प्रश्न उपस्थित होतात…

पहिला म्हणजे राष्ट्रवादीने आपले दोन उमेदवार अधिकच्या मतांची पेरणी करुन सिक्युअर करुन घेतले व कॉंग्रेसला वाऱ्यावर सोडलं..
किंवा फडणवीसांनीच क्रॉस व्होटिंग करायला लावून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत असंतोषाच वातावरण
पेरलं..

आत्ता मुद्दा येतो तो भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रेटेजीचा..

भाजपला पहिल्या क्रमांकाची 133 मते मिळाली आहेत. यात एक मत मोजणी न करता बाजूला ठेवण्यात आलं. भाजपचे आमदार आहेत 106 तर त्यांना 7 अपक्षांचा पाठींबा आहे. यांची एकूण बेरीज होते 113. म्हणजेच 20 ते 21 मतांची पेरणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यात कोण असू शकतील तर महाविकास आघाडीला पाठींबा देणारे अपक्ष व लहान पक्ष असे एकूण 16 अधिक कोणालाच पाठींबा न देणारे 5 असे 21 असू शकतात. विशेष म्हणजे पक्ष सोडून ही संख्या गृहीत धरली तर यातील काहीजणांकडे मंत्रीपद देखील आहे. अशा वेळी फडणवीस सर्वच अपक्षांना आपल्या बाजूने खेचू घेतलं म्हणणं अवघड आहे. तरिही इथे दोन प्रश्न उपस्थित राहतात,

पहिला फडणवीसांनी महाविकास आघाडीचे सर्वच अपक्ष फोडले तर मग कॉंग्रेसची मते राष्ट्रवादीने फोडली का?… फडणवीसांना महाविकास आघाडीचे सर्व अपक्ष व लहान पक्ष फोडणं शक्य झालं नसेल तर त्यांनी थेट कॉंग्रेसला सुरूंग लावला का?…

हे सर्व करून फडणवीसांनी नेमकं काय केलं, तर कॉंग्रेसच्या हंडोरे यांचा पहिल्या फेरीत विजय झाला असता तर दूसऱ्या फेरीसाठी भाई जगताप व प्रसाद लाड असा सामना रंगला असता. ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या आमदारांनी दूसरा पसंतीक्रमांक भाई जगताप यांना दिला होता. भाई जगताप सोडून राहिलेल्या महाविकास आघाडीच्या एकूण 131 विरुद्ध भाजपच्या प्रसाद लाड यांची 17 मते वजा करून भाजपच्या 116 मतांची मोजणी झाली असती.

दूसऱ्या पसंतीक्रमांकावर भाई जगताप यांनाच पसंती दिल्याचं गृहीत धरल्यास भाई जगताप दूसऱ्या फेरीत निवडून आले असते, त्यामुळेच कॉंग्रेसचा-राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा कोणताही एक उमेदवार दूसऱ्या फेरीत ठेवणं हीच फडणवीस यांची मुख्य स्ट्रेटेजी होती. हंडोरे मागे राहिल्याने दूसऱ्या फेरीत प्रसाद लाड व भाई जगताप निवडून आले.

कारण दूसऱ्या पसंतीवर अनेकांच मत त्यांनाच होतं. हंडोरे कोटा पुर्ण करतील असा समज असल्याने त्यांना दूसऱ्या क्रमांकाची मते मिळाली नाहीत. थोडक्यात फक्त मते फोडून नाही तर दूसऱ्या फेरीत तीन उमेदवार येतील याची फिल्डिंग लावून फडणवीसांनी हा डाव पुर्णपणे आपल्या खिश्यात घातला असच म्हणावं लागेल..

आत्ता येणाऱ्या दिवसात अंतर्गत कलह आणि फडणवीसांची वाढलेली ताकद या दोन्ही गोष्टींचा सामना महाविकास आघाडीला करावा लागू शकतो हे स्पष्ट आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.