बिहार जिंकणाऱ्या फडणवीस यांना वडिलांचा गड राखता आला नाही.

आज पदवीधरचे निकाल लागत आहेत. महाविकास आघाडीचा वारू चौफेर सुटला आहे. पुण्यात चंद्रकांतदादा पाटील यांच्या जागी मोकळ्या झालेल्या जागेवर राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झालेत, तर मराठवाड्यात सतीश चव्हाण यांनी सलग तिसरा विजय मिळवत आपली सीट राखली आहे.

पण सगळ्यात धक्कादायक निकाल नागपूर पदवीधर मतदारसंघाचा समजला जातोय. इथे काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांना पराभवाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंय. काँग्रेसने विजयाचा गुलाल उधळण्यास सुरवात देखील केली आहे. आता हा निकाल धक्कादायक का हे आधी पाहू.

नागपूरला भाजपचा गड म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही जन्मभूमी असल्यामुळे तो भाजपचा गड असणे साहजिकच आहे. मात्र हा विशेष करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड आहे. त्यातही पदवीधर मतदारसंघ तर नक्कीच.

गेले साठहून अधिक वर्षे या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत होता.

याला सुरवात केली होती पंडित बच्छराम व्यास यांनी १९५८ साली. त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांनी म्हणजे गंगाधरपंत फडणवीस यांनी. गंगाधर पंत फडणवीस हे संघाचे कट्टर कार्यकर्ते. आणीबाणीच्या काळात कारावासात जाऊन आलेले. त्यांच्याबद्दल नागपुरात प्रचंड सहानुभूती होती. जनसंघ असतानाच्या काळापासून त्यांनी नागपूरचे नेतृत्व केले होते. इथल्या पदवीधर मतदारसंघात तर त्यांनी अनेकवेळा विजय मिळवला.

गंगाधरपंत फडणवीस यांच्यामुळेच पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला.

एकवेळ नागपूरच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पराभव होईल पण नागपूर पदवीधर कधीच हरणार नाही ही भाजपला त्यांच्या काळापासूनची खात्री होती. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची सुरवात वडिलांच्या कार्यात मदत करण्यापासून झाली, त्यामुळे हा तर त्यांचा  घरचा मतदारसंघ होता.

गंगाधर फडणवीस यांचे १९८९ साली निधन झाले. त्यांच्या नंतर नागपूर भाजपचा वारसा त्यांचेच शिष्य समजल्या जात असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या कडे आला. देवेंद्र फडणवीस तेव्हा महाविद्यलयात शिकत होते. मात्र त्यांनी राजकारणात प्रवेश केला होताच. नितीन गडकरी यांचा जोरदार प्रचार त्यांनी त्याकाळी केला होता. 

नितीन गडकरी निवडून आले. यापूर्वी ते नागपूर मध्ये विधानसभेत पडले होते मात्र त्यांची कारकीर्द या पदवीधर मतदारसंघाने घडवली. १९८९ पासून ते २०१४ पर्यंत जवळजवळ २५ वर्ष गडकरी यांनी नागपूर पदवीधरची निवडणूक खिशात घातली. 

नागपूर पदवीधरचा आमदार असतानाच गडकरी राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले, मुंबईपुणे एक्सप्रेस वे बांधून देशभरात नाव कमावलं. नागपूर मध्ये मिहान सारख्या प्रकल्पात मोठमोठ्या कंपन्या आणल्या. विधानपरिषदेचा विरोधीपक्ष नेता म्हणून विदर्भाचे प्रश्न मांडले, तडीस नेले.  

काँग्रेसने जंग जंग पछाडूनही गडकरी यांचा पदवीधर मतदारसंघात पराभव करणे त्यांना शक्य झाले नव्हते. एकदा तर ते चक्क बिनविरोध निवडून आले.

पुढे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील बनले.  केंद्रात मोठी भूमिका बजावी लागणार आहे हे ओळखून नितीन गडकरी यांनी पुढची पदवीधरची निवडणूक लढवली नाही. त्यांच्या जागी नागपूर महानगरपालिकेचे महापौर अनिल सोले यांना तिकीट देण्यात आलं.

देवेंद्र फडणवीस ज्यांचा गडकरी यांच्यानंतर या मतदारसंघावर हक्क होता ते विधानसभेत निवडून येत होते त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला नाही.  

अनिल सोले यांनी नागपूर पदवीधरवर विजय मिळवला. यावेळी देखील त्यांनाच तिकीट मिळेल अशी शक्यता होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपले खास मित्र व नागपूरचे सध्याचे महापौर संदीप जोशी यांना तिकीट दिले. अनिल सोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती पण फडणवीस यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

काँग्रेसने मात्र यावेळी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सध्याचे ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालक मंत्री नितीन राऊत यांनी तर भाजप व फडणवीस यांना हरवण्यासाठी कंबर कसली होती. 

भाजपचा अभिमान मोडून काढणार अशी घोषणा त्यांनी केली होती.

काँग्रेसच्या ऍड. अभिजित वंजारी याना तिकीट देण्यात आलं होतं. 

यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली यामुळे त्यांचा जोर दिसत होता. फडणवीस याना याची कुणकुण सुरवातीपासून लागली होती, यामुळेच यंदाच्या निवडणुकीत मतदार यादीचा घोळ असल्याची ओरड त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरु केली होती.

ऍड. अभिजित वंजारी हे युथ काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यांना अपयश आले होते. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांनी फडणवीस यांच्या उमेदवाराला चांगली टक्कर दिल.

सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये तर संदीप जोशी तीन नंबरला असलेलं दिसत होतं. अपक्ष उमेदवार नितीन करळे यांनी त्यांच्याहून जास्त मतांची आघाडी घेतली होती.

पण नंतर संदीप जोशींनी त्यांना मागे टाकलं.  अजूनही मतमोजणी सुरु असताना अभिजित वंजारी यांनी जोशींना १५ हजार मतांनी मागे टाकले असून त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे.

हा पराभव संदीप जोशी यांच्याही पेक्षा देवेंद्र फडणवीस यांचा मानला जातोय. पन्नासहून जास्त वर्षे भाजपने जिथे राज्य केले, नितीन गडकरी यांच्यासारखा नेता घडवला तो नागपूर पदवीधर मतदारसंघ हातातून निसटला. गंगाधरपंत फडणवीस यांनी बनवलेला भाजपचा गड अखेर ढासळला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.