फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आणि राज्यातील मंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला

मागच्या काही दिवसात सोशल मीडिया, टीव्ही, पेपर पाहतांना-वाचतांना ऐकायला येणारा शब्द म्हणजे ईडी म्हणजेच सक्तवसुली संचनालय. दिवसभरात ईडीचा छापा, ईडीकडून कारवाई, ईडीने दिले समन्स असे शब्द कानावर पडणार नाही असं होणारच नाही.

नेत्या पासून ते अधिकारी, व्यापारी, अभिनेते यांच्यात सीबीआय पेक्षा आता ईडीची चर्चा अधिक होत आहे. आज पुन्हा ईडी चर्चेत येण्याचं कारण राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक. त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली.

आता पर्यंत महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विषय उचलून धरले आणि मंत्र्यांना थेट अटक झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक चर्चा केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ज्या-ज्या मंत्र्यांबाबत प्रश्न उपस्थित करतात त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. दोन्ही मंत्र्यांना अटक झाली ते सर्व प्रश्न फडणवीस यांनीच समोर आणले होते.

पहिले प्रकरण म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख

 

या प्रकरणाची सुरुवात होते ते उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका वाहनात ठेवण्यात आलेल्या विस्फोटका पासून. त्यानंतर गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या खून झाला. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सभागृहात आवाज उठविला आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली.

तब्बल १३ वर्षानंतर सचिन वाझे यांना पोलीस दलात सामील करून घेण्यात आले होते. हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजले आणि त्यामुळे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंहा यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांना साईड पोस्टिंग देण्यात आली होती.

यानंतर परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. तेव्हापासून अनिल देखमुख ईडीसह भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीनं त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. दोन महिने गायब राहिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी अँटीलिया स्फोटक प्रकरण लावून धरल्यामुळेच अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचे सांगण्यात आले होते.

बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली.

संदर्भात पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. आणि याचे पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं ते म्हणाले होते.

पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शनचा आरोप फडणवीस यांनी केला होता. मलिक यांचा सहभाग असलेल्या किमान ५ व्यवहारांमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं फडणवीस म्हणाले होते. २००५ पासून दोन वर्षापूर्वीपर्यंत म्हणजेच अल्पसंख्याक मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळण्यापर्यंत झालेल्या व्यवहारात समावेश असल्याचं फडणवीस म्हणाले होते.

मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही ३.५ कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली. सलीम पटेल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर, फ्रंट मॅन आहे, तो देखील या जमिनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर असल्याचं फडणवीस म्हणाले होते.

सरदार शहावली खान आणि सलीम पटेल कोण?

सरदार शहाबली खान हा १९९३ चे गुन्हेगार आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे ते तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे.

सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. २००७ मध्ये हसीना पारकरला अटक झाल्यानंतर सलीम पटेलला अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावाही फडणवीस यांनी केला होता.

यानंतर काही दिवसापूर्वी ईडीकडून मुंबईत काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. हि छापेमारी हसीना पारकर यांच्या घरावर करण्यात आली होती. त्यानंतर नवाब मलिक यांचावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

अनिल देशमुख आणि नवाब मलिक प्रकरणात  फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आणि राज्यातील मंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला असल्याचे बोलले जात आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.