‘मी पुन्हा येईन’ या वाक्यावरुन गेल्या अडीच वर्षात फडणवीसांची अशी टिंगलटवाळी झाली…
‘मी पुन्हा येईन!’ ‘मी पुन्हा येईन!’ ‘मी पुन्हा येईन!’ हे वाक्य वाचल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस आणि इंदुरीकर महाराज यांचा टिक-टॉक व्हिडिओ आठवतो. या व्हिडिओची आठवण झाल्यावर अनेकांना आजही हसू आवरत नाहीत.
या व्हिडिओ बरोबरच अनेकांनी सोशल मीडियावर तसेच यु ट्यूबवर ‘मी पुन्हा येईन’ वर बरेच विनोद केले आहेत. तर अनेकांनी या वाक्यांची खिल्ली सुद्धा उडवली होती. याच वाक्यांचा पुनरुच्चार गेल्या दोन आठवड्यांपासून वारंवार माध्यमांमध्ये होतोय आणि सोशल मीडियावर तर याचीच चलती होती.
परंतु आज विधानसभेत बोलतांना खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की
“या वाक्यावरून ज्यांनी ज्यांनी माझी खिल्ली उडवली आहे त्यांचा मी बदला घेणार आहे.”
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु “मी त्यांचा बदला घेईन म्हणजेच टिंगल उडवणाऱ्यांना माफ करेन.” असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करताच वातावरण निवळलं.
परंतु आजपर्यंत कुणी कुणी देवेंद्र फडणवीसांची टिंगल उडवलीय आणि फडणवीस कुणा कुणाचा बदला घेतील याची जोरदार चर्चा सुरु झालीय. चाल तर जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस बदला घेणार आहेत त्या मंडळींची नावे..
या मंडळींमध्ये पहिलं नाव आहे ते शरद पवारांचं..
देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन! ची खिल्ली सगळ्यात आधी उडवणारे नेते होते ते शरद पवार. पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले होते की,
“सध्या माझ्या डोक्यात फक्त तेच चालू आहे, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार. मी देवेंद्र फडणवीसांना चांगल्या पद्धतीने ओळखतो पण त्यांनी कधीच हे सांगितलं नव्हतं की ते ज्योतिष शास्त्र सुद्धा जाणतात.”
शरद पवारांच्या या उत्तराने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता.
विधानसभेत सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी केली होती खिल्लीची सुरुवात..
महाविकास आघाडीची स्थापना होऊन मुख्यमंत्री झाल्यांनतर विधानसभेत बोलतांना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ वर टोला लावला होता. ठाकरे म्हणाले की,
“मी इथे येईन असं मी कधीही बोललो नव्हतो, तरी मला यावं लागलं आणि मी इथे आलो.”
या वाक्यांनंतर सदनात एकंच हशा पिकला होता.
उद्धव ठाकरेंनंतर जयंत पाटलांनी मोर्चा सांभाळला..
जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की,
“देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येइन म्हणाले होते पण त्यांनी कुठे बसेन हे सांगितलेलं नव्हतं.”
विरोधी बाकांवर बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटलांच्या टोल्यावर सभागृहांसोबतच खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा मिश्किल हसले होते.
यांनतर भाषणाला उभे झाले छगन भुजबळ..
देवेंद्र फडणवीसांना उद्देश्याने बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की,
“आपण परत आलात हे खरंच आहे. मी मस्करी करत नाही. तुम्ही ज्या पदावर आहेत त्याला पदाला मानसन्मान आहे आणि विरोधी पक्षामध्ये तुम्ही एक नंबर आहात. त्यामुळे मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन! तो शब्दसुद्धा तुम्ही खरा करून दाखवलात.”
छगन भुजबळांनंतर धनजय मुंढेंनी निशाणा साधला..
देवेंद्र फडणवीसांवर विनोद करतांना धनंजय मुंढे बोलले कि, “यावेळेस महायुतीला सत्ता मिळून सुद्धा नियतीने चक्र फिरवले. त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं, पण कुठल्या भूमिकेत येईन हे स्पष्ट केलं नाही म्हणून विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेत आज देवेंद्र भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करतो.” धंनजय मुंढेंच्या या विधानानंतर सभागृहात सगळेच सभासद खळखळून हसायला लागले.
शेवटी देवेंद्र फडणवीसांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला..
देवेंद्र फडणवीस सगळ्यांना प्रत्युत्तर देत म्हणाले कि,
“अध्यक्ष महोदय हे खरं आहे कि मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन, आणि मी पुन्हा आलो. पण मी केव्हा येईन याचं टाइम टेबल सांगितलेलं नव्हतं.”
देवेंद्र फडणवीसांच्या या प्रत्युत्तराचं सभागृहात भाजपच्या आमदारांनी बाकडं वाजवून स्वागत केलं होतं.
निव्वळ सभागृहातच नाही तर सभागृहाच्या बाहेरसुद्धा अनेकांनी देवेंद्र फडणवीसांच्या विधानांवर विनोद केले आहेत.
यात बाळासाहेब थोरातांनी ऐन आनंदाच्या वेळी देवेंद्र फडणवीसांना घेरलं होतं..
मार्च २०२२ ला देवेंद्र फडणवीसांनी गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यशांनंतर २०२४ ला भाजप परत सत्तेत येईल असं विधान केलं होतं.या विधानानंतर बाळासाहेब थोरातांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हटलं होतं की,
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजप पुन्हा सत्तेत येइल अशी घोषणा केली आहे. मी यापूर्वीही त्यांना अनेकदा म्हटलं आहे आज पुन्हा म्हणतोय की, त्यांनी एकदा आरशापुढं उभं राहावं, त्यांना आरशात पुढचा विरोधी पक्षनेताच दिसेल.”
अशी खोचक टिप्पणी केली होती.
सगळे बोलले. मग यात संजय राऊत कसे मागे राहतील..
जून महिन्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. यात संजय राऊत म्हणाले कि
“जे चांगलं काम करतात ते वारंवार संसदेत जातात. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असं न म्हणता सुद्धा चार वेळा निवडून आलोय.”
असा मिश्किल टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लावला होता.
एवढचं नाही तर नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमोल मिटकरी, प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा अनेकदा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांची टिंगल करून त्यांना चिडवलय. परंतु आता मात्र फडणवीसांनी या सगळ्यांना माफ करून बदल घेण्याचा निर्णय केला आहे.
हे ही वाच भिडू
- ते पुन्हा येईन म्हणाले आणि खरंच एका रात्रीत मुख्यमंत्रीपदी परत आले…
- ते पुन्हा आले, पण त्यांच्यासोबत मंत्री म्हणून झळकणारे हे चेहरे ही आत्ता रोज दिसू लागतील..
- अमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री करणार होते.