नगरपंचायतीच्या पराभवानं या नेत्यांचा पाय अजूनच खोलात गेलाय

राज्यतल्या नगरपंचायतींचे रिझल्ट आलेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालंय तर भाजपाची कामगिरी पण साजेशी झालेय. बहुतांश नगरपंचायती या तालुक्याची ठिकाणं असल्यानं विधानसभेच्या निवडणुकांवर हे रिझल्ट बऱ्यापैकी प्रभाव टाकू शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतात.

त्यामुळं असे काही रिझल्ट आहेत जे आधीच खोलात असलेल्या नेत्यांना धोक्यची घंटा ठरू शकतात.

यातील महत्वाचे निकाल काय सांगून गेलेत ते पाहुयात

नाथाभाऊ म्हणतायेत सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन गेम केला.

२०१९च्या विधानसभेसाठी भाजपाकडून एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारण्यात आलं मग कसबसं आपली मुलगी रोहिणी खडसे यांच्यासाठी तिकीट मिळवलं. मात्र शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊंच्या लेकीचा धक्कादायकरीत्या पराभव केला होता. पुढे पक्षातूनच खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

बोदवडच्या नगरपंचायतीच्या माध्यमातून खडसे पुन्हा आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. बोदवड नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली, तेव्हापासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार वाद रंगला होता. मात्र ‘ईश्वरचिट्टीने’ का होईना पण चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोदवडमध्ये एकनाथ खडसे यांना पुन्हा अस्मान दाखवलंय.

 एकनाथ खडसे यांनी मात्र गुलाबराव पाटील,चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी एकत्रित येऊन आपला पराभव केल्याचं म्हणतायत. त्यामुळं इथूनपुढं नाथाभाऊंची वाट अजूनच बिकट झाल्याचं बोललं जातंय.

विधानसभा मग जिल्हा बँक आणि मग आता कोरेगाव नगर पंचायत शशिकांत शिंदे यांच्या पराभवाची मालिका काय खंडित होईना

२०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पुन्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही शशिकांत शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवर विरोध होत असतानादेखील पक्षश्रेष्टींच्या पाठिंब्याने शशिकांत शिंदे कमबॅक करण्याची तयारी करतायत. 

मात्र त्यांच्या या तयारीला जोरदार धक्का बसलाय शिवसेना आमदार महेश शिंदे पुरस्कृत कोरेगाव शहर विकास पॅनलने सर्वाधिक म्हणजेच १२ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पॅनललने अवघ्या ४जागांवर विजय मिळवला आहे.  

राम शिंदेंना अजून एक धक्का देत कर्जतमध्ये रोहित पवार पर्मनंट होण्याच्या तयारीत 
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे.

राष्ट्रवादीनं १७ पैकी १२ जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या. त्यामुळं मागच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राम शिंदे यांचं राजकीय भवितव्य अजूनतरी अधांतरीच दिसतंय.

रामदासभाईं बरोबर त्यांच्या आमदार मुलापुढच्याही अडचणी वाढल्यात 

परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वादामुळे रत्नगिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड या नगरपंचायतींची निवडणूक चुरशीची झाली होती.

अनिल परब यांनी पद्धतशीरपणे रामदास कदम यांचे पंख कापत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळं रामदास कदम यांनी बंडखोरी करून आपले समर्थक उभे केले होते. मात्र त्यांची ही खेळी दापोलीत चालली नाहीये. तर मंडणगडमध्ये रामदास कदम पुरस्कृत गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात राहिल्यात. 

मात्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवार दिल्यानं रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं जाणकार सांगतायत.

गोपीचंद यांचा पहिला विजय अजून अवघड होईल असंच दिसतंय.

वरकरणी गोपीचंद पडळकर यांचा राजकीय आलेख चढता दिसत असला तरी विधानपरिषदेचे आमदार असणाऱ्या पडळकरांना अजून डायरेक्ट लोकांच्यातून निवडून येता आलेलं नाहीये. पडळकर यांनी आतापर्यंत चार निवडणुका लढवल्या आहेत. पण या चारही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचं तोडं पाहावं लागलं आहे.

 २०१९ मध्ये बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यांनतर गोपीचंद पुन्हा आपल्या होमटर्फवर म्हणजे सांगलीला आटपाडी-खानापूर मतदारसंघात जातील असं सांगण्यात येत होतं. त्यामुळं खानापूर पंचायतसमितीची निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची होती. 

खानापूर नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला ९ तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला ७ जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजपला याठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या आमदार अनिल बाबर यांनी गोपीचंद पडळकर यांना सपशेल मात दिल्याचं दिसतंय.जिल्ह्या बँकेच्या निवडणुकींनंतर गोपीचंद पडळकर यांचा सलग दुसरा पराभव आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.