फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या ‘त्या’ ओळी १० वी च्या पुस्तकातून हटवण्यात आल्या…

हम देखेंगे…..लाज़िम है कि हम भी देखेंगे….
फ़ैज़ अहमद फ़ैज़च्या या विद्रोही ओळी आठवल्या आणि फ़ैज़ अहमद यांच्या सर्वच ग़ज़ल नजरेसमोरून गेल्या..त्याचं कारण म्हणजे CBSE ने दहावीच्या अभ्यासक्रमातून फ़ैज़च्या काही ओळी होत्या ज्या नव्या अभ्यासक्रमातून हटवल्या गेल्या आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषदेने म्हणजेच CBSE २१ एप्रिल रोजी २०२२-२०२३ साठी नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम पब्लिश केला. मात्र या नव्या अभ्यासक्रमात प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या दोन कविता दहावीच्या NCRT च्या पुस्तकातून काढून टाकण्यात आल्या आहेत.
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, गेल्या १० वर्षांपासून सीबीएसईचे दहावीचे विद्यार्थी सोशल सायन्सच्या पुस्तकात, धर्म, जातीयवाद आणि राजकारण – जातीयवाद सेक्युलर स्टेट नावाचा धडा शिकत होते, ज्यामध्ये शीर्षकाप्रमाणेच धर्म, सांप्रदायिकता आणि राजकारण आणि धर्मनिरपेक्ष राज्य अशा विषयासंदर्भात हे प्रकरण आहे.
असं बातम्यांमध्ये सांगितलं की, हे प्रकरण आहे तसेच राहणार फक्त त्यातील पेज क्रमांक ४६, ४८, ४९ वर असलेले फोटो हटवण्यात आले आहेत.
ते फोटो म्हणजे काही राजकीय व्यंगचित्र आहेत तर काही पोस्टर्स आहेत जे हटवले गेले आहेत. अनहद नावाच्या एनजीओने हे पोस्टर पब्लिश केले होते ज्यावर फैज यांच्या दोन कवितेच्या ओळी होत्या. आता या दोन्ही पोस्टरमधील ज्या फैजच्या ओळी हटवल्या गेल्या त्या कवितेमागची स्टोरी फार इंस्टरेस्टिंग आहे. त्यातील एक म्हणजे,
“हम तो ठहरे अजनबी कितनी मुलाकातों के बाद, खून के धब्बे धुलेंगे कितनी बरसातों के बाद“.
या ओळी फैज यांनी १९७४ मध्ये ढाकाला दिलेल्या भेटीनंतर लिहिल्या होत्या.
फैज अहमद फैज बांग्लादेश निर्मितीनंतर ढाक्याला गेले होते तेंव्हा त्यांचे स्वागत काही खास झालं नव्हतं. कारण बांगलादेश निर्मितीच्या जखमा अजून ताज्याच होत्या. त्यामुळे फैज यांना तिथे परकेपणाची भावना जाणवली.. त्यावेळी आलेल्या वेदनेतूनच त्यांनी या ओळी लिहिल्यात..
हम कि ठहरे अजनबी इतनी मदारातों के बाद फिर बनेंगे आश्ना कितनी मुलाक़ातों के बाद…
कब नज़र में आयेगी बेदाग़ सब्ज़े की बहार ख़ून के धब्बे धुलेंगे कितनी बरसातों के बाद ~ फैज अहमद फैज
तर दुसऱ्या पोस्टरमध्ये,
“चश्म-ए-जान-ए-शोरीदा काफी नहीं है, तोहमत-ए-इश्क-पोशिदा काफी नहीं है, आज बाजार में या बजौलां चलो”.
इंडियन एक्सप्रेस आणि रेख्ता पोर्टलच्या संदर्भानुसार, ही कविता फैज यांनी तेंव्हा लिहिली होती, जेंव्हा ते लाहोरच्या जेलमध्ये होते. त्यांना जेलमधून डेंटिस्टकडे नेले जात होते.
याशिवाय CBSE ने ११ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामची स्थापना, उदय आणि विस्ताराचा इतिहास सांगितलेल्या ‘सेंट्रल इस्लामिक लँड्स’ या प्रकरणात बदल केलेत. तसेच १२ वी च्या पुस्तकातून मुघल साम्राज्याच्या शासन आणि प्रशासनाच्या प्रकरणामध्ये देखील काही बदल केल्याचं बातम्यांद्वारे कळतंय.
फैज अहमद फैज यांच्या याच ओळी नाही तर, ‘हम देखेंगे’ ही कविता देखील वादात सापडली होती. विशेष म्हणजे भारतात आणि पाकिस्तानातही या कवितेला मोठा विरोध झाला होता.
फैज अहमद फैज यांचा नातू डॉ. अली मदीह हाश्मी यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,
‘हम देखेंगे..चं झालं असं की, यातील मतितार्थ बाजूला ठेवला गेला अन त्यातले मोजकेच शब्द उचलले गेले अन त्यावरून वाद निर्माण केला गेला.
ते सांगतात की, या हम देखेंगे हि कविता लोकांना भ्रष्ट सरकार बदलण्यासाठी प्रेरित करते. खरं तर ही कविता फक्त भारत आणि पाकिस्तानच नाही तर प्रत्येक देशाला लागू होते.
डॉ. अली मदीह हाश्मी हे व्यवसायाने तसे मानसोपचारतज्ज्ञ आहेत मात्र शेर-शायरी त्यांच्या रक्तातच आहे. त्यांनी फैज यांच्यावर चरित्र लिहिलं तसंच त्यांची बरीच पुस्तके देखील आहेत.
असो तर वाद निर्माण करणाऱ्यांना फैज यांच्या कवितेचा अर्थच कधी कळला नाही..
हे ही वाच भिडू :