नोकरीसाठी फोन आला आणि ४० हजारला चूना लागला, कस असत हे फेक नोकरीचं रॅकेट.

खरतरं भावाने ४० हजारला स्वत:हून चुना लावून घेतला. झालं अस की मागच्या वर्षी त्याला एक मेल आला होता. महिंद्रा वगैरे सारख्या कंपनीतून. आपला भावू सांगलीच्या एका कॉलेजातून BCA झालेला. नोकरीच्या शोधात एक वर्ष गॅप पडलेला. पोरं सांगायची पुण्यात येवून कायतर बघ. निदान बॅक ऑफिसला तरी काम करायला सुरवात कर पण भावू म्हणला नाय. आपण लय ठिकाणी रजिस्टर केलय, रिप्लाय येईल जॉब मिळेल. अस करत भावू एक वर्ष बिनकामाचा राहिला. त्यात तुम्हाला माहितच आहे, नोकरी मिळणं म्हणजे खायचं काम राहिलं नाही.

हळुहळु फस्ट्रेशनचा जोर वाढू लागला. दिसेल ती साईट ओपन करुन भावू आपला कुंडली तिथ टाकायचा आणि मागं फिरायचा.

एक दिवस काय झालं तर भावाला मेल आला. मेलमध्ये तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये क्लियर झाला आहात अस सांगण्यात आलं होतं. भेंडी इथं BCA व्हायला पण भावानं इतकं कष्ट घेतलेलं आणि नोकरीचा पहिला राऊंड ़डायरेक्ट क्लियर म्हणजे चेष्टा होती काय. मेल पण विख्यात कंपनीचा होता. त्यात काय सांगितलेलं की दिल्लीतल्या एके ठिकाणी तुमचा पुढचा राऊंड पुर्ण होणार आहे, त्यासाठी तुमच्यासोबत फोन अथवा मेलवरुन संपर्क साधला जाईल.

भावाने त्याच्या पप्पांना ही बातमी सांगितली. पप्पा पेढ्यांच्या जुळणीला लागले. घरात बसून पहिला राऊंड मारतोय म्हणजे दिल्लीत जावून पोरगं हिमालय मारून येणार असल्यासारखं वातावरण झालं. दोन चार दिवस गेले आणि मेल आला. मेलमध्ये जिथे नोकरीसाठी दूसरा राऊंड होणार आहे त्या हॉटेलचे सर्व डिटेल्स आले होते. सोबत असही सांगण्यात आलं होतं की तूम्हाला दिल्लीला येण्यासाठीच तिकीट आणि इथे राहण्याचा खर्च कंपनीमार्फत होणार आहे. तो पण कसा तर तुम्ही खालील अकाऊंटवर पैसे भरायचे आणि निवांत रहायचं.

पोरानं बापाला सांगितलं आणि आईनं FD मोडली. आपल्याकडे पापड जेवढे मोडतं नाहीत त्याहून अधिक वेगानं FD मोडली जाते. गरिब आईचा जन्मच FD मोडायसाठी झालाय अस वाटतं. तर असो, आईने FD मोडली. आत्ता मला सांगा दिल्लीला जायचा आणि यायचा आणि एक दिवस रहायचा खर्च कंपनीने किती सांगितलेला तर 40 हजार. इतक्या पैशात गल्लीतली 12 पोरं तिरूपती करुन व्हाया अबाबाई करून सांगलीत येतात. पण नोकरी मिळतेय म्हणल्यावर संशय घेण्याचं कामच नव्हतं. इथं खाजगी संस्थाचालक एमएस्सी बीएड वाल्यांचा 40 लाखांचा रेट काढतेत. पोरानं तर 40 हजार मागितलेत. बापाने मेलवरुन आलेले डिटेल्स घेतले आणि पोराने त्या अकाऊंटवर पैसे भरले.

आत्ता कंपनी काही दिवसात मेल पाठवणार, त्यासोबत विमानाची तिकीट पाठवणार आणि आपला भावू दूसरा राऊंड मारायला दिल्लीला जाणार.

पानीपता जाताना सदाशिवभाऊंच्या घरातले लोक त्यांच्याकडे जसे पहात होते तसं आमच्या भावाकडे गल्लीतले लोकं पहात होती. अशाच प्रकारे दहा दिवस गेले, पंधरा गेले, महिना झाला. महिना झाला तसं बाप मुळ स्वरूपात येवू लागला. काय झालं मेल आला का. चौकशी केली का? बापाला वाटतं होतं पोरगं BCA झालं म्हणजे आयटी तज्ञ झालं. पण पोराला मेल मधले प्रकार देखील कळत नव्हते. झालं चौकशी करायची तर कुठं मेल ला रिप्लाय द्यायचा देखील प्रकार नव्हता. पोराने दोन चार मित्रांना सांगितल्यावर मित्र म्हणले वेळ केलासं मर्दा. आधी सांगितलं असतच तर मागच्या गल्लीतल्या बाळ्याबरोबर पण अस झालेलं तुला सांगितलं असतं.

पोरगं पुण्यात आलं आणि खाली मुंडी करून गप्प जॉब शोधू लागलं. पोलीसात जायचं तर बाप म्हणे आत्ता अशाप्रकारे पैशाला गंडवलय की लाज वाटत्या. 40 हजार गेले पण अक्कल विकत घेतली म्हणून विषय सोडण्यात आला.

आत्ता मुळ मुद्याकडे हे बोगस नोकरी देणारे कार्यकर्ते कोण असतात ते कोणाला टॅप करतात.

बोगस नोकरी देणाऱ्याचं रॅकेट असतं. नायझेरियन टोळीने फोन करुन गंडवलं अशी बातमी आपण गेली दहा एक वर्ष वाचत आलो आहोत तशीच ही माणसं असतात. आठ दहा जणांच टोळकं असतं. ते फिशिंग मेल पाठवतात. तुम्ही अनेक ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करता तिथून तुमचे मेल आयडी मिळवले जातात. अनेकदा असे मेल तूम्ही ज्या कॉलेजमधून शिकता तिथून मिळवले जातात. अगदी कसं असत तर बाजारात गेला तर BCA झालेल्या महाराष्ट्रातील मुलांचे फोन आणि मेल आयडी शेकडा चाळीस रुपये, अशा प्रकारे तुमचे फोन आणि मेल आयडी विकले जातात. त्यावर टॅप करुन योग्य बकरा जाळ्यात येण्याची वाट पाहिली जाते. हजार मेल पाठवले तर दहा बारा बकरे तर कुठच जात नाहीत.

मग विश्वास संपादन करण्यासाठी संबधित कंपनीची फेक साईट करणे, त्यावर ऑनलाईन परिक्षा घेणे असे उद्योग करून डिपॉझिट फि, ट्रॅव्हलिंग फि या नावाने पैसे मागवले जातात.

आपण कसं सरकारी सिस्टिमधून आलो असल्याने आपल्याला पण पटतं की एवढी नोकरी लावतेत तर पैसे घेणारच. पोरं पैसे भरतात. इथच भागलं नाही तर काय केल जातं की पुढे बोगस भरती ठेवली जाते. त्यासाठी एखादं हॉटेल ठरवलं जातं. थ्री पीस घालून मोठमोठे अधिकारी येतात. सुंदर सुंदर मुली इंग्लीशमधून तुमचा फॉर्म भरण्यासाठी हजर असतात. इथे तुम्हाला व्यक्तिगतरित्या कळवलं जातं की तुमच काम झालं आहे त्यासाठी तुम्हाला डिपॉझिट फी म्हणून लाख दिड लाख भरावे लागतील. चांगल्या कंपनीत चांगल पॅकेज मिळतं म्हणून पोरं पैसे भरून टाकतात. अनेकदा कंपन्याच जॉयनिंग लेटर देखील तुम्हाला दिलं जातं. अमुक तारखेपासून कंपनीत रुजू व्हायला सांगितलं जातं.

तुम्ही घरी जातं, पेढे वाटता. एन्जॉय करता आणि ठरलेल्या दिवशी कंपनीच्या दारात जाता. तेव्हा ती कंपनी हे आमचं लेटरहेड नाही म्हणून तुमच्या टिरीवर लाथ मारते. अशा वेळी हात चोळत गेलेल्या पैशांच दुख: करण्याशिवाय दूसरा कोणता मार्ग नसतो. म्हणून मित्र आणि मैत्रिणींनो काय करावं की संपुर्ण चौकशी करावी. आपले सिनियर्स येडे असातत हा भ्रम सोडून द्यावा. दोन चार वर्ष मोठे असणारे आणि चांगल्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसोबत मैत्रीचे संबध प्रस्थापित करावेत. आज मार्केटमध्ये अशी कोणतीच कंपनी नाही जी नोकरी लावण्यासाठी पैसे मागते. जिथे आपणाला पैसे मागत आहेत तिथे आपणाला — लागणार आहे याची पुर्णपणे खात्री बाळगावी.

कारण आई फक्त FD चे पैसे मोडायला नसते.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.