हिंदू साथीचे रोग पसरवत आहेत अशी फेक न्यूज अमेरिकेत पसरली होती

कोरोना महामारी रोगामुळे पूर्ण जग लॉकडाऊन झाले आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सरकार, प्रशासन आणि पोलीस खाते यांनी जीव धोक्यात घालून युद्धपातळीवर लढा सुरू केला आहे.

या सर्वांबरोबरच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे म्हणजेच मीडिया वर देखील अतिशय महत्वाची जबाबदारी पडली आहे

योग्य व खात्रीशीर बातम्या समाजापर्यंत पोहचविण्याची.

या संकटकाळात काही अपप्रवृत्ती समाजात तेढ पसरवण्याचं काम करत असतात. पत्रकारांची जबाबदारी असते की हा प्रकार रोखून सत्य बाहेर आणायचे. पण बऱ्याचदा असे होताना दिसत नाही.

एकोणिसाव्या शतकात अगदी असच घडलं होतं, ते ही अमेरिकेत

युरोप मधील अनेक देशांनी अमेरिका खंडात आपल्या वसाहती उभ्या केल्या होत्या. तिथले मूलनिवासी रेड इंडियन्स कधीच देशधडीला लागले होते. शिवाय या गोऱ्या लोकांच्या वसाहतीने भांडून आपलं वेगळं राष्ट्र सुद्धा स्थापन केल होतं.

अमेरिका ही land of opportunity होती. जगभरातून हजारो लोक या नव्या देशात आपलं नशीब उजळण्यासाठी जात होते. यात भारतीय सुद्धा जाते.

भारतातून पहिल्यांदा व्यापार करण्यासाठी लोक अमेरिका खंडात गेले पण नंतर वेगवेगळ्या कारणासाठी तिकडे जाणाऱ्या भारतीयांचं प्रमाण वाढलं.

यात सगळ्यात आघाडीवर होते पंजाबचे शेतकरी.

भारतात इंग्रज करत असलेली मुस्कटदाबी सहन करण्यापेक्षा दूर अमेरिका खंडात गेलेलं बर या विचाराने शेकडो पंजाबी जहाजाने भारतातून बाहेर पडू लागले.

अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः कॅलिफोर्नियापासून कॅनडापर्यंत हे पंजाबी सेटल झाले. अमेरिकेत अनेक विकासकामे सुरू होती, उद्योगधंदे सुरू होत होते. यासाठी लागणारे मजुरसुद्धा भारतातून येऊ लागले.

भारतीयांनी अल्पकाळात अमेरिकेमध्ये प्रचंड प्रगती केली.

हजारो वर्षे शेतीच ज्ञान रक्तात भिनलेल असल्यामुळे कोन्याही अमेरिकन माणसापेक्षा चांगली शेती भारतीय लोक करू लागले.

हीच गोष्ट गोऱ्याना सहन झाली नाही.

सारा ईसाबेल वॉलेस हिने लिहिलेल्या नॉट फिट टू स्टे या पुस्तकात हा घटनाक्रम लिहिलेला आहे.

वर्णवर्चस्वाची भावना त्यांच्या मनात तीव्र होती. गोरे लोक सर्व बाबतीत इतरांपेक्षा श्रेष्ठ असतात असा समज सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांमध्ये खोलवर पसरलेला होता.

भारतातून येणारे लोक अडाणी व गावंढळ आहेत ते अस्वच्छ असतात, ते रोगराई पसरवतात अस कायम बोललं जायचं. अशातच 1906 साली तिथल्या एका वर्तमानपत्रातील बातमीमुळे एक अफवा पसरली.

preview lockley invasion 001

अमेरिकेवर हिंदूंच आक्रमण होत आहे का?

या अर्थाचं बातमीच शीर्षक खोडसाळपणे भारतीयांविरुद्ध भावना भडकवणारे होत. भारतीयांचे लोंढे अमेरिकेत प्लेग रोग आणत आहेत अशी ती बातमी होती. अनेक वाचकांनी पत्र पाठवून याच अर्थाची वलग्ना करण्यास सुरवात केली.

खरं तर कॅनडा व अमेरिकेत येणाऱ्या पगडीधारी शीख लोकांचे प्रमाण जास्त होते मात्र पाश्चात्यांच्यासाठी सर्व भारतीय म्हणजे हिंदू असल्यामुळे ही अफवा हिंदूंचा उल्लेख करून होत होती.

याची सुरवात मुख्यतः जेम्स मिल्स थोबर्न नावाच्या ख्रिश्चन पाद्रीने केली होती.

तो तीस वर्षे भारतात धर्मप्रसारासाठी राहून आला होता. त्या काळात भारतातील अनेक शहरात प्लेगची महाभयंकर साथ आली होती. जेम्स मिल्स च म्हणणं होतं की,

या रोगापासून वाचण्यासाठी भारतीय लोक अमेरिका कॅनडाला येत आहेत. त्यांना जर इथे प्रवेश दिला तर ते तो रोग सगळी कडे पसरवतील.

पण या आरोपाला कोणताही पुरावा त्याने जोडला नव्हता.

त्याच्या आरोपामागे द्वेषाची भावना अधिक होती. दुर्दैवाने तिथल्या वर्तमानपत्रांनी कोणतीही खातरजमा न करता ही अफवा उचलून धरली.

अनेक पत्रकारांनी हाच समज दृढ करण्यासाठी विद्वात्ता पूर्ण लेख लिहिले.

अशातच वनकुव्हरच्या खासदारांनी एका जाहीर सभेमध्ये मधमाश्यांच्या हल्ल्या प्रमाणे भारतीय घुसखोरांची झुंड अमेरिका खंडावर आक्रमण करत आहे असे वक्तव्य केले.

दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये सर्वपक्षीयांचा भारतीयांना विरोध अशी खोटी बातमी झळकली.

याच बातमी मध्ये एका जहाजातून 160 भारतीय व 2000 जपानी लोक कॅनडामध्ये बेकायदेशीर प्रवेश करून हल्ल्याच्या तयारीत आहेत असा पण उल्लेख केला होता.

ही सुद्दा एक फेक बातमी होती.

4 सप्टेंबर 1907च्या रविवारी वॉशिंग्टन प्रांतात 500 गोऱ्या लोकांच्या समूहाने हिंदूंना देशातून हाकलून द्या अशी मागणी करत दंगल पेटवली.

जवळपास पाच तास हे दंगे सुरू राहिले. भारतीयांच्या घरांची तोडफोड केली गेली.

जवळपास 200 भारतीयांनी त्या रात्री सिटी हॉलचा सहारा घेतला. दुसऱ्या दिवशी देखील दंगे झाले, पोलिसांनी निष्ठुरपणे फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.

एवढे होऊनही अमेरिकन वर्तमानपत्रांनी भारतीयांच्या विरोधात च बातम्या प्रसारित केल्या.

हिंदूं चांगले नागरिक नाहीत, ते आपल्यातले नाहीत, ते देशद्रोही आहेत असे आरोप केले.

आशियाई लोकांनी शेकडो रायफल्स व बंदुकां, पिस्तुल, सूरी सारख्या शस्त्रास्त्रांची खरेदी सुरू केली आहे अशी बातमी द वर्ल्ड नावाच्या वर्तमानपत्राने लावली.

हिंदू घुसखोर धर्मयुद्ध सुरू करणार आहेत असे संकेत दिले जात होते.

तुमच्या मुलांच्या सुरक्षितते साठी आशियाई लोकांना देशातून घालवून द्या असे आवाहन करणारे तिकीट वाटले जात होते. कोमागाटामारू हे प्रकरण यातूनच उदभवले.

हा द्वेष अनेक वर्षे चालू राहिला. 4 फेब्रुवारी 1917 साली आलेल्या एशियाटिक बार्ड झोन ऍक्ट द्वारे यूएसए मध्ये भारतीयासकट आशियाई लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.

पूढे कालांतराने हा वाद शांत झाला, स्वातंत्र्यानंतर अनेक कायदे शिथिल करण्यात आले 

आता एवढा तिरस्कार आढळून येत नाही. पण वर्णवर्चस्वाची भावना थोड्या प्रमाणात का असेना दिसत असते. मागच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली वक्तव्ये याचीच साक्ष आहेत.

हाच धडा आजकालच्या माध्यमानी देखील घ्यायला हवा. एखाद्या विशिष्ठ समाजसमूहाला रोगासाठी टार्गेट करणे चुकीचे आहे. सर्वांनी मिळून रोगाशी सामना करणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं फेक बातम्या पसरण्यापासून रोखण्याचं काम मीडियाने जबाबदारीने पार पाडावे लागणार आहे.

संदर्भ- द वायर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.