पुनीत राजकुमारवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्याच चाहत्यांपासून संरक्षण घ्यावं लागतंय

सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमारचं २९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्याच्या निधनामुळं फक्त कन्नड सिनेसृष्टीच नाही, तर देशभरातले चाहते हळहळले. पुनीतचा मृत्यू व्यायाम केल्यानंतर अटॅक आल्यानं झाला. त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्नही झाले, मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.

पुनीतवर त्याचे फॅमिली डॉक्टर रमण राव यांनी उपचार केले. मात्र आता पुनीतचे चाहते याच रमण राव यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत आहेत. रमण राव यांची चौकशी व्हावी अशी मागणीही चाहत्यांनी धरली आहे. त्यामुळं, बंगळुरू पोलिसांनी सध्या राव यांना पोलिस संरक्षण पुरवलं आहे.

त्यादिवशी नेमकं काय झालं?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘२९ ऑक्टोबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुनीत माझ्या क्लिनिकमध्ये आला. मी वैद्यकीय प्रोटोकॉलचं पूर्णपणे पालन करत त्याच्यावर सर्वोत्तम उपचार केले. त्याला वेदना किंवा अस्वस्थता वाटत नव्हती, तर वर्कआऊट केल्यानंतर अशक्तपणा जाणवत होता. मी लगेचच त्याचा ईसीजी काढला, त्यात स्ट्रेन जाणवल्यावर पुनीतची पत्नी अश्विनी हिला पुनीतला विक्रम हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितलं.

पुनीतला कारमधून हॉस्पिटलला का नेलं? 

पुनीतचा मृत्यू बेंगळुरूमधल्या कनिंगहॅम रोडवरच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये झाला. त्याच्या चाहत्यांचा एक ग्रुप पुनीतच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करतोय. त्यांचा मुख्य आरोप आहे की, डॉ. रमण राव यांनी पुनीतवर उपचार करताना दुर्लक्ष केलं. पुनीत त्यांच्या क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी आलेला असताना, त्यांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात का हलवलं? ईसीजीमध्ये स्ट्रेन आहे हे कळल्यावर त्यांनी पुनीतला कोणतं औषध लिहून दिलं होतं? त्याला अँब्युलन्स ऐवजी कारमधून हॉस्पिटलमध्ये का नेण्यात आलं? असे प्रश्न पुनीतचे चाहते करत आहेत.

डॉक्टर रमण राव म्हणतात…

चाहत्यांच्या या प्रश्नांना डॉक्टर राव यांनी उत्तरं दिली आहेत. ते म्हणाले, ‘पुनीतला त्याच्याच कारमधून रुग्णालयात नेलं, कारण अँब्युलन्स बोलवायला जास्त वेळ लागला असता. माझ्या क्लिनिकचा वापर फक्त सल्ला देण्यासाठी किंवा तपासण्यासाठी करता येतो, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पेशंटवर उपचार करता येतील इतक्या सुविधा इथं नाहीत. त्यामुळं मी अजिबात उशीर न करता, पुनीतला सर्वोत्तम उपचार मिळावेत या उद्देशानं विक्रम हॉस्पिटलसारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. माझ्या हातात होते तेवढे सगळे मानवी प्रयत्न मी केले.

पुनीतचा चाहता वर्ग पाहता डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून, बंगळुरू पोलिसांनी त्यांचं घर व क्लिनिक बाहेर बंदोबस्त वाढवला आहे. सोबतच काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आजूबाजूच्या भागांत गस्तही वाढवण्यात आली आहे.

हे प्रकरण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यापर्यंतही गेलंय. प्रायव्हेट हॉस्पिटल्स अँड नर्सिंग होम्स असोसिएशननं पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूनंतर प्रसारमाध्यमांमध्ये आणि जनतेमध्ये आरोग्यसेवेचे ज्या प्रकारे चित्रण केले जात आहे त्याबद्दल PHANA खूप चिंतित आहे. एका तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्याला गमावल्याचं दुःख आणि धक्का आम्ही सामायिक करत असताना, यानंतर घडलेली घटना दु:खद आहे आणि तुमची तातडीने दखल घेण्याची गरज आहे; अशी मागणी बोम्मई यांच्याकडे केली आहे.

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.