पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर ; या आहेत महाराष्ट्रातल्या टॉप 10 प्रसिद्ध मिसळ…

तिसरं महायुद्ध ‘मिसळ कुठली भारी?’ यावरून नक्कीच होऊ शकतं, यात शंकाच नाही.  इथं पुणे, कोल्हापूर, नाशिकमध्ये तर ‘आमची मिसळ भारी’ म्हणून भांडत असताना मुंबईकर अधेमध्ये येत असतात. रविवारी सकाळी-सकाळी एका व्हाट्सअप ग्रुप कुठली मिसळ भारी यावरून चर्चा सुरु होती. हाणामारी तेवढी बाकी राहिली होती. 

त्यात भर पडली ती मिसळ ‘पावासोबत की ब्रेडसोबत खावी’ यावर चर्चा करणाऱ्यांची. मग म्हणलं या राड्यापेक्षा भारी काहीतरी करावं,

महाराष्ट्रातल्या १० बेस्ट मिसळ कुठं मिळतात? हे सांगावं.

मिसळ हा आस्थेचा विषय असल्याने लिहतांना जरा काळजीनेच लिहतोय. तुमची आवडती मिसळ या दहात आली नाही तर नाराज होऊ नका. कमेंट करून नक्की सांगा.  

मिसळ मूळची कुठली हा वाद न घालता आम्ही तुम्हाला कुठल्या- कुठल्या मिसळ भारी आहेत, कुठल्या मिसळीचा नाद करायचा नाही हे सगळं डिटेलमध्ये सांगतोय. केवळ फेमसच नाही तर चवीला वेगळ्या असणाऱ्या मिसळीबद्दलही इथं वाचायला मिळणार आहे. 

१) मामलेदार मिसळ (ठाणे)

ही मिसळ केवळ ठाण्याची नाही तर महाराष्ट्राची ओळख बनली आहे. इथं सामान्यांपासून ते नेते, अभिनेते सगळ्यांची गर्दी असते. १९४६ पासून ही मिसळ ठाण्यात मिळते. एका लहान कॅन्टीनमध्ये सुरु झालेल्या मिसळ महाराष्ट्रभर पोहचली आहे. 

तिखट मिसळ ही मामलेदार मिसळीची खरी ओळख. मिसळीच्या सॅम्पलमध्ये इतर भागात मटकी असते. मामलेदार मिसळीच्या सॅम्पलमध्ये पांढरे वाटाणे टाकण्यात येतात.

पुण्यातही मामलेदार मिसळ फर्ग्युसन रस्त्यावर सुरु करण्यात आली होती. मात्र, पुणेकरांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती बंद करण्यात आली. मामलेदार मिसळची मुख्य शाखा ठाणे जिल्हा परिषदेच्या समोर आहे. 

mamledar

 

२) काटाकिरररर  (पुणे)

पुण्यातल्या कर्वे रस्त्यावर आतल्या बाजूच्या गल्लीत गेल्यावर काटाकिर्रर्रर्रर्रर्र असा बोर्ड दिसतो. बोर्डाच्या स्टाइलवरूनच हि मिसळ तिखट असल्याची फिलींग येते. कोल्हापूर स्टाईलमधली मिसळ म्हणून काटाकिर्र प्रसिद्ध आहे. 

काटाकिर्रच्या मिसळमध्ये कोल्हापूरचा तिखट मसाला वापरून रस्सा तयार करण्यात येतो. काटाकिर्र मध्ये मिळणाऱ्या रस्स्याचा मसाला हा घरीच बनवण्यात येत असल्याने त्याची रेसिपी सिक्रेट आहे. 

चुकून इथं तिखट मिसळ तुमच्या वाट्याला आली तर काहीच खरं नाही. विकेंडला जाण्याच्या विचारात असाल तर जरा गर्दीचा विचार करूनच जा. काटाकिर्रमध्ये मिळणाऱ्या ताकाला ही तितकीच मागणी आहे. 

katakir

 

३) ‘साधना’ मिसळ (नाशिक)

साधनामध्ये बनविण्यात येणाऱ्या मिसळीचं सॅम्पल चुलीवर तयार करण्यात येतं. ४ टेबलपासून सुरुवात झालेलं हे हॉटेल आता मोठं रेस्टोरंट झालं आहे. तरीही साधनाची ओळख चुलीवर मिळणारी मिसळ म्हणूनच आहे. 

इथं दोन प्रकारचं सॅम्पल देण्यात येत. तिखट आणि अति तिखट. पापड सुद्धा देण्यात येतो. साधना मिसळची सुरुवात १९५९ मध्ये झाली. राजन आम्ले यांच्या आजी-आजोबांनी ती केली. तेव्हा ज्या पद्धतीने त्यांच्या आज्जी मसाला तयार करून सॅम्पल तयार करायच्या त्याच पद्धतीने साधना मिसळमध्ये आजही सॅम्पल तयार करण्यात येतं.

गंगापूर – सातपूर लिंक रोड, सोमेश्वर जवळ, बारदान फाटा येथे साधना हॉटेल आहे. 

sadhna misal

 

४) बेडेकर मिसळ (पुणे)

बेडेकर मिसळ ही पुण्यातल्या जुन्या उपहार गृहांपैकी एक आहे. १९५५ मध्ये सुरु झालेली मिसळ आजही पुण्यात प्रसिद्ध आहे. बेडेकर मिसळचे सॅम्पल दिसायला लाल मात्र चवीला गोड. यामुळे बेडेकर मिसळ पुण्यात चांगलीच गाजली. 

दामोदर दत्तात्रय बेडेकर यांनी १९५५ मध्ये बेडेकर मिसळ सुरु केली. बेडेकर मिसळीत देण्यात येणारे फरसाण बेडेकर यांच्या घरी बनवण्यात येते. एका गोष्टीमुळे इथं तुमची निराशा होऊ शकते. इथं मिसळसोबत पाव नाही तर ब्रेड स्लाइस देण्यात येतो.

bedekar 1 नारायण पेठेत पत्र्या मारुती चौकात हे छोटेखानी हॉटेल आहे. वेटिंग करायची सवय इथं गरजेची आहे 

५) ठोंबरे मिसळ (कोल्हापूर) 

कोल्हापूरच्या मिसळशिवाय ही लिस्ट पूर्णच होऊ शकत नाही. कोल्हापूर मधील मिसळचा पॅटर्नच वेगळा आहे. ठोंबरे मिसळ म्हणजे प्लेटमधे एका बाजूला बटाटा, मटकी, शेव-चिवडा तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरी पद्धतीने तयार केलेले सॅम्पल आणि सोबतीला कापून दिलेला पाव. 

कोल्हापूरची मिसळ झणझणीत नसणार हे शक्य आहे का. ठोंबरे मिसळ कोल्हापूरकरांच्या स्वभावा प्रमाणे झणझणीत आहे. 

ठोंबरे मिसळ भोई गल्लीत रविवार पेठेत आहे. 

thombre

६) नेवाळे मिसळ (चिंचवड)

झक्कास तिखट आणि थोडी गोड असे वैशिष्ट्य नेवाळे मिसळीचे आहे. इथल्या मिसळच्या फरसाणमध्ये शेवेचं प्रमाण थोड जास्त असतं. एकाबाजूला फरसाण आणि मटकी तर दुसऱ्या बाजूला तिखट रस्सा देण्यात येतो. ही मिसळ खाण्यासाठी पुण्यातून २५ किलोमीटर ट्रॅव्हल करून अनेकजण जातात.

इथं मिसळ बरोबरच बटाटे भजी सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे.

लॉकडाऊननंतर नेवाळे मिसळ नवीन जागेत शिफ्ट झाली आहे. मात्र, मिसळची चव तीच असल्याचं खवय्ये सांगतात.

newal 1

७) रुपेश मिसळ (सोमाटणे फाटा)

मिसळ केवळ तिखट असून चालत नाही ती झणझणीत सुद्धा असायला हवी. रुपेश मिसळचं वैशिष्ट्य हे ‘झणझणीत मिसळ’ असंच आहे. फरसाण, त्यात सॅम्पल आणि एक काकडीची आणि टोमॅटोची चकती सोबत दही वाटी देण्यात येते.

रुपेश मिसळ येथे पावभाजी प्रमाणे भाजलेले पाव देण्यात येतात.

ही मिसळ मुंबई-पुणे रस्त्यावर सोमाटणे फाटा येथे आहे.

rupesh misal

८) फडतरे मिसळ (कोल्हापूर)

कोल्हापूर आणि मिसळचे नाते वेगळे सांगायची गरज नाही. फडतरे मिसळ १९६८ मध्ये सुरु करण्यात आली. कोल्हापुरी मसाला वापरून सॅम्पल तयार करण्यात येतो. बटाटा, मटकी, फरसाण आणि सॅम्पल देण्यात येते मागच्या अनेक वर्षांपासून फडतरे मिसळची तीच चव टिकून आहे. 

फडतरे मिसळमध्ये सुद्धा पाव नाही तर ब्रेड स्लाइस देण्यात येते. फडतरे मिसळचे ठिकाण शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर 

fadtare misal

 

९) बुवांची मिसळ (लोणावळा)

लोणावळ्यात गेल्या ३२ वर्षांपासून बुवांची मिसळ मिळते. मिसळमध्ये पोहे टाकले जात नाही.बटाट्याची भाजी त्यावर फरसाण आणि मोड आलेल्या मटकीच सॅम्पल, वरतून बारीक चिरलेला कांदा आणि टोमाटो, सगळ्यात वरती लिंबू अशा पद्धतीने मिसळ दिली जाते. सोबत कांदा, लिंबू आणि मिरचीचा ठेचा असतो.

आता नॉर्मल मिसळ बरोबर बटर मिसळ, चीज मिसळ सुद्धा इथं मिळते.

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील फरियाज ५ स्टार हॉटेलच्या मागच्या गल्लीत, लोणावळा.

images 1

 

१०) रामनाथ मिसळ (पुणे)

पुण्यात कोल्हापूर प्रमाणे तिखट मिसळ खायची असेल तर त्यात पुण्याच्या रामनाथ मिसळचे नाव घेण्यात येतं. ७५ वर्षांची परंपरा इथल्या मिसळला आहे. पोहे त्यावर वाटाण्याचा रस्सा, नायलॉन पोह्यांचा चिवडा त्यावर शेव आणि कांदा टाकून मिसळ बनवली जाते. सॅम्पल वेगळे दिले जाते इथं कोल्हापूर प्रमाणे ब्रेडचा स्लाइस दिला जातो आणि पावही.

ज्यांना कोल्हापुरी किंवा खूप तिखट मिसळ आवडते, त्यांच्यासाठी इथे तर्रीचं सॅम्पल दिलं जातं आणि ज्यांना मध्यम तिखट मिसळ हवी असेल त्यांना फक्त नेहमीचं सॅम्पल दिलं जातं.   

रामनाथ मिसळ ही साहित्य परिषद जवळ टिळक रस्ता, पुणे

महाराष्ट्रात अजूनही मिसळ प्रसिद्ध आहे. सगळ्यांची आवड निवड वेगळी असते. तुम्हाला कुठल्या शहरातील कुठली मिसळ आवडते, हे कमेंट करून सांगू शकता.

ramnath misal 1

हे ही वाच भिडू 

2 Comments
  1. Pranay Bhandare says

    नाशिकच्या मिसळ सोबत सॅम्पल नाही मिळत भिडू रस्सा मिळतो रस्सा…. sss तो तर्रीवाला 🔥 तर तु त्याला रस्साच बोल.

  2. Abhishek Pingle says

    I am misal fan from childhood, trust me i went every corner of Maharashtra to have misal pav including the places mentioned above. You can’t miss Vinay health home from Girgaon. Kept it’s test intact for many years. It claims no. 1 in my list. Come to Marine lines I’ll take you there.

Leave A Reply

Your email address will not be published.