नाना, अलोकनाथ, अग्निहोत्री, AIB…सगळ्यांवर #MeToo चे आरोप झाले पण त्याचं पुढं काय झालं ?
बिग बॉस हा एक असा रिऍलिटी शो आहे ज्याला एक तर शिव्या घालणारी लोकं असतात नाही तर मग आवडीने पाहणारी लोकं असतात. हा शो सुरु झाला कि, इन्स्टा, फेसबुक अन् ट्विटर….अक्षरशः बातम्यांमध्ये देखील याच शो ची चर्चा असते. यातले कन्टेंस्टन्ट ट्रेंड करत असतात. त्यावर फॅन्सची आपापसात होणारी भांडणं असतील, त्यावर होणाऱ्या चर्चा असतील अक्षरशः प्रत्येक एपिसोडचा किस पाडला जातो.
आपल्या आजूबाजूला सुद्धा एवढी भांडणं आणि गॉसिप होत नसेल तेवढं हे एका कार्यक्रमात होत असतं. नुसतंच मसालेदार गॉसिप नाही तर हा कार्यक्रम सुरु झाला की नव-नव्या कॉंट्रोव्हर्सी सुद्धा तोंड वर काढतात.
सध्या अशीच एक गाजत असलेली कॉंट्रोव्हर्सी पुन्हा एक डोकं वर काढतेय ती म्हणजे #MeToo.
त्याला बिग बॉसमध्ये घेऊन पुन्हा एकदा प्रसिद्धी आणि काम दिलं जातंय असं म्हणत त्याला कार्यक्रमातून काढून टाकायची मागणी करण्यात येत आहे. यामध्ये कन्टेन्ट क्रिएटर जेनीस सिक्वेरा, गायिका सोना महापात्रा यांचा समावेश आहे. तसंच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खानला बिग बॉस मधून काढून टाकायची मागणी केली होती.
साजिद खानबद्दल अहाना कुमरा, सलोनी चोप्रा, मंदाकिनी करीम सारख्या अनेक अभिनेत्री समोर येऊन त्यांचे अनुभव शेअर करताना दिसल्या होत्या. साजिदचं त्यांच्याशी असलेलं गैरवर्तनाचा आरोप सगळ्यांच्या वक्तव्यांमध्ये कॉमन होता. त्यावेळी हे प्रकरण इतकं गाजलं की त्याचा परिणाम साजिदच्या करिअरवर झाला. साजिदवर एक वर्ष बॅन सुद्धा आणण्यात आला होता. २०१८ मध्ये झालेल्या या प्रकारानंतर त्याच्यावर वर्षभराचा बॅन आणला गेला होता जो बॅन मार्च २०१९ मध्ये संपला.
साजिद खानच नाही तर बॉलिवूड मधल्या बरीच सेलिब्रेटींची नावं त्यावेळी घेण्यात आली होती. त्यांच्यावर मी टू चे आरोप करण्यात आले होते. तेव्हा काय झालं आणि आता ते नेमके कुठे आहेत हे बघूया..
यात सर्वात गाजलेलं नाव म्हणजे,
१. नाना पाटेकर
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. गरजेपेक्षा जास्त सलगी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. २००८ साली आलेल्या हॉर्न ओके प्लिज सिनेमात नानांसोबत इंटिमेट गाणं करायला नकार दिला आणि सेट सोडून जायचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलवल्याचा सुद्धा तिने सांगितलं होत. या प्रकरणात साधारण सात महिने तपास करून नानांच्या विरोधात ठोस पुरावे हाती न आल्याने त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती.
त्यानंतर नाना नव्या प्रोजेक्टमध्ये दिसले नसले तरी ते लवकरच ओटीटीवर कमबॅक करणार असं चित्र दिसत आहे. त्यांच्या नाम फाउंडेशन अंतर्गत ते आजही सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आणि पून्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले.
२. आलोकनाथ
इंडस्ट्रीमध्ये एक संस्कारी वडील अशी प्रतिमा आलोकनाथ यांची आहे. पण त्यांच्या विरोधात सुद्धा metoo चळवळ चांगलीच रंगली होती. लेखिका आणि दिग्दर्शिका विनिता नंदा, अभिनेत्री संध्या मृदुल, दीपिका अमीन यांनी आलोकनाथवर metoo च्या अंतर्गत आरोप केले होते. आलोकनाथ यांनी गैरवर्तन केल्या प्रकरणी त्यांच्यावर हे आरोप झाले होते. विनिता नंदा यांच्या मालिकेच्या शूटिंग दरम्यान तर संध्या मृदुल हिच्याशी एका टेलिफिल्म दरम्यान त्यांनी गैरवागणूक केली असल्याचं अभिनेत्रींनी स्पष्ट केलं. दीपिका अमीन यांनी ट्विट करून आपला अनुभव शेअर केला होता.
दारू पिऊन धुंद अवस्थेत अलोकनाथ यांनी गैरवर्तन केल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. आलोकनाथ यांनी विनिता नंदा यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. त्यांच्याकडून लिखित माफीनामा आणि नुकसानभरपाई म्हणून एक रुपया अशी मागणी त्यात केली होती. त्यानंतर metoo चळवळीवरवर आधारित हिंदी सिनेमात आलोकनाथ यांनी न्यायाधीशाची भूमिका साकारली होती. पण वितरकांनी सिनेमात आलोकनाथ आहेत म्हणून सिनेमा स्वीकारायला नकार दिला होता.
३. विवेक अग्निहोत्री
अभिनेत्री तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्यावर सुद्धा metoo अंतर्गत आरोप केला होता. विवेक यांनी अंगावरचे कपडे काढून तिला नाच करायला सांगितल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. एका अभिनेत्याला क्यू देण्यासाठी कपडे काढून नाच असं विवेककडून सांगण्यात आल्याचं तनुश्रीने म्हटलं होतं.
विवेक विरोधात अधिकृत FIR दाखल करायचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता पण नंतर तो निर्णय मागे घेतला गेला. तनुश्रीच्या वकिलांच्या मते विवेक यांनी स्वतः एका दहा पानी नोटीसमध्ये स्वतःचा गुन्हा कबूल केला होता. पण विवेकने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. सध्या विवेक एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून समोर आला आहे. काश्मिर फाईल्स या त्यांच्या सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. येत्या काळात दिल्ली फाईल्स सिनेमा बनवताना ते दिसणार आहेत.
४. सुभाष घई
सुभाष घई हे सुद्धा metoo प्रकरणात अडकले होते. त्यांच्यावर ऑक्टोबर २०१८ मध्ये एका महिलेवर जबरदस्ती केल्याचा आणि बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. लेखिका महिमा कुकरेजाने याबद्दलची घटना स्क्रिनशॉटच्या माध्यमातून ट्विटरवर शेअर केली होती. या महिलेची ओळख जगासमोर आली नव्हती पण मीडियामधील एक नामांकित व्यक्ती असल्याचं महिमा यांनी स्पष्ट केलं होतं.
अभिनेत्री केट शर्माने सुद्धा सुभाष घईंवर आरोप केले होते. तिला लोखंडवाला इथल्या फ्लॅटवर बोलवून मसाज करून द्यायला सांगितलं आणि नंतर इच्छा नसतानाही जबरदस्ती किस केल्याचा आरोप तिने केला होता. सुभाष घई यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली होती. केट शर्माने सुद्धा आईच्या आजारपणाचं कारण देत असलेली तक्रार मागे घेतली होती.
बरं हे झालं केसबद्दल पण सुभाष घई हे पुढे कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसले का? प्रोजेक्ट जाऊदे त्यांना फिल्मफेअरकडून यावर्षी ऑगस्ट महिन्यात जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे.
५. AIB
metoo या हॅशटॅग अंतर्गत ज्या महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडायला सुरुवात केली त्यातलं पहिलं प्रकरण हे AIB शी निगडित होतं. AIB हा काही मित्रांनी सुरु केलेला एक ग्रुप होता. तन्मय भट, गुरसिमरन खंबा, रोहन जोशी आणि आशिष शक्या या चौघांनी पॉडकास्ट, पॅरडी, कॉमेडी स्केचेस अशा माध्यमातून कन्टेन्ट बनवायला सुरुवात केली आणि त्यांचं युट्युब चॅनेल सुद्धा होतं.
कमी कालावधीत ऑल इंडिया बकचोद सगळीकडे प्रसिद्ध झालं आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा खूप नावाजले गेले. पण महिमा कुकरेजा या लेखिकेने AIB मधील एका मेम्बरवर metoo अंतर्गत आरोप केले होते.
AIB मधील उत्सव चक्रवती या कॉमेडियनने तिला काही चुकीचे फोटो आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तिने ट्विटरवर काही स्क्रिनशॉट शेअर केले होते. त्यानंतर उत्सवला त्याच्या जवळच्या लोकांनी अक्षरशः बाजूला केलं. कंपनीने त्याचे विडिओ सुद्धा त्यांच्या युट्युब चॅनेलवरून काढून टाकले.
हे प्रकरण एवढं गाजलं की जिथून तिथून त्याच्यावर टीका होत होती. या metoo चळवळीची सुरुवात या एका किस्स्याने झाली असं सुद्धा सांगितलं जातं. पुढे AIB च्या गुरसिमरन खंबावर सुद्धा metoo प्रकरणातून आरोप झाले त्यावर बरीच उत्तरं-प्रतिउत्तर दिली गेली आणि हळूहळू त्याचा परिणाम कंपनीवर झाला. #metoo या चळवळीने AIB ही कंपनी बंद झाली.
#metoo ही चळवळ महिलांवर होणारे अत्याचार समोर आणण्यासाठी खूप गरजेची होती. विशेषतः ज्यांचं नाव मोठं आहे थोडीफार लोकं त्यांना ओळखतात अशा अनेकजणांची नावं यात समोर आली होती. त्यात आता आरोप झालेल्यांपैकी एक साजिद खान पुन्हा एकदा टीव्हीवर दिसतोय त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय.
हे ही वाच भिडू :
- म्हणून सप्टेंबरमध्ये परत जाणारा पाऊस यंदा ऑक्टोबरमध्येही कोसळतोय
- संजय शिरसाटांना तत्काळ एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणलंय; पण सामान्यांना ती परवडते का ?
- रशियाकडून वापरल्या जाणाऱ्या कामिकाझे ड्रोन्समागे जापनीज इतिहास दडला आहे