पोटापाण्यासाठी रिक्षा चालवणाऱ्या राजू श्रीवास्तवनं आपल्याला कायम हसवत ठेवलं…

आता दर चार-पाच व्हिडीओज मागं एक व्हिडीओ स्टॅन्डअप कॉमेडीयनचा असतोय. पण एक काळ होता जेव्हा ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज नावाचा शो म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी कॉमेडीचा बूस्टर होता. नवज्योत सिंग सिद्धू आणि शेखर सुमनचं हसणं, व्हरायटी असणारे कॉमेडीयन्स त्यामुळं हा शो बघताना लय मजा यायची. पण हा शो न जिंकता कुणी सुद्धा मार्केट खाल्लं असेल, तर गजोधर भैय्या अर्थात राजू श्रीवास्तव यांनीच.     

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांचं आज २१ सप्टेंबर रोजी निधन झालंय. १० ऑगस्ट २०२२ रोजी व्यायाम करत असतांना त्यांना हार्ट अटॅक आला. 

दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ४० दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आलेला. त्यानंतर त्यांना तातडीनं  एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलमध्ये असताना ते कोमात गेले. तेव्हापासून ते ४२ दिवस कोमातच होते.

तपासणीदरम्यान त्यांच्या हृदयाच्या एका भागात पूर्णपणे ब्लॉकेज आढळलं होतं. परंतु आज सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि त्यातच वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 

राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशाच्या कानपूर शहरात झाला होता. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे प्रसिद्ध कवी होते. बलाई काका या नावाने ते कविता लिहायचे. मुळात कवीचा मुलगा असल्यामुळे लहानपणी सगळेजण राजू यांना कविता म्हणायला लावायचे. यामुळेच राजू कविता सादर करायचे. पुढे जाऊन ते बर्थ डे पार्टी आणि इतर प्रसंगी सुद्धा कविता ऐकवायला लागले.

यातूनच त्यांनी फिल्ममध्ये करियर करायचं ठरवलं आणि ते मुंबईला आले.

१९८२ साली ते मुंबईला आले. पण मुंबईत शहरात निभाव लागणं सोप्प नव्हतं. पोटापाण्यासाठी त्यांनी सुरुवातीला मुंबईत रिक्षा चालवली. त्यानंतर १९८८ पासून त्यांना बॉलिवूड चित्रपटांत छोटे मोठे रोल मिळाले आणि त्यात काम करून त्यांनी करिअरची सुरूवात केली. सलमानचा सुपरडुपर हिट सिनेमा ‘मैने प्यार किया’  मध्ये त्यांनी ट्रक क्लीनरची काही सेकंदांची भूमिका साकारली होती. 

यानंतर आणखी काही सिनेमे केले. पण त्यात फारसे यश येत नसल्यामुळे लवकरच त्यांनी कॉमेडी शोमध्ये प्रवेश केला. त्यातूनच २००५ साली द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या दमदार कॉमेडी शोमधून त्यांना ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. कॉमेडी का महामुकाबला, बिग बॉस ३ आणि नच बलिए या शोमध्येही त्यांनी काम केलं. 

राजू श्रीवास्तव हे अमिताभ बच्चन यांची अफलातून मिमिक्री करायचे. 

अमिताभ बच्चनची शोले फिल्म राजू यांना प्रचंड आवडली होती. हा चित्रपट पाहिल्याबरोबरच राजू अमिताभचे चाहते झाले होते. इतके की, हुबेहूब त्यांच्यासारखं उठणं-बसणं आणि बोलण्याची सुरुवात त्यांनी केली. सोबतच ते अमिताभ यांची मिमिक्री करायला लागले. अमिताभ यांची मिमिक्री केल्याबद्दल पहिल्यांदा त्यांना ५० रूपये मिळाले होते.

त्यांना कॉमेडियन म्हणून तर सगळेच ओळखतात मात्र यासोबतच ते राजकारणी सुद्धा होते.

राजू श्रीवास्तव हे समाजवादी पक्षाचे कानपूर लोकसभेचे उमेदवार होते. समाजवादी पक्षाने त्यांना दिलेले तिकीट त्यांनी दोन वेळ नाकारले होते. यासाठी त्यांनी पार्टीचे कार्यकर्ते त्यांना मदत करत नाही असे आरोप लावले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपची भूमिका मांडताना ते कायम चर्चेत असायचे. अपर्णा यादव यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी एक टिप्पण्णी केली होती. 

ते म्हणाले होते की, “भाजपमध्ये मुली आणि सुना सुरक्षित आहेत त्यामुळे अपर्णा यादव या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.”

सोबतच त्यांनी नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे सुद्धा प्रमोशन केले होते. अनेक स्टेजवर याबद्दल त्यांनी कार्यक्रम घेतले होते.

राजू कॉमेडियन असल्यामुळे काही वेळेस ते अडचणीत सुद्धा सापडलेले  होते. २०१० सालात त्यांनी दाऊद इब्राहिमवर कॉमेडी केली होती, त्यामुळे त्यांना पाकिस्तानातून धमकीचे कॉल्स आले होते. पण या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या कॉमेडियन म्हणून चाहत्यांमध्ये असलेल्या लोकप्रियतेवर कधीच परिणाम झाला नाही. अजूनही त्यांचे शोज, विशेषत: गजोधर भैय्या हे कॅरॅक्टर युट्युब आणि सोशल मीडियावर सर्च करुन पाहिले जातात हेच राजू श्रीवास्तव यांचं मोठं यश मानावं लागेल.

राजू श्रीवास्तव कोमात गेले, तेव्हा अमिताभ बच्चननं त्यांना आपल्या आवाजात एक संदेश पाठवला होता, ‘उठ राजू, खूप झालं, अजून खूप काम करायचं आहे. आता उठ, आम्हाला सगळ्यांना हसायला शिकव.’

बच्चनच्या आवाजाचे आणि अभिनयाचे दिवाने असणारे राजू श्रीवास्तव यावेळी मात्र मिमिक्री करायला उठले नाहीत, त्यांची मृत्युसोबत सुरू असलेली झुंज ४० दिवसांनी संपली… आणि राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.