हाय प्रोफाईल केसेस सोडवूनही लाईमलाईटमध्ये न आलेले वकील म्हणजे, श्रीकांत शिवदे

सेलिब्रेटी लोकांच्या लग्नांची, घटस्फोटांची, वाढदिवसाची आणि लेकरांची जशी चर्चा होते तशीच आणखी एका गोष्टीची चर्चा होते, ते म्हणजे त्यांच्यावरच्या कोर्ट केसेस. अभिनेते असतील किंवा राजकीय नेते, त्यांची अटक, जामीन, सुनावणी, जेलमधले दिवस हे कित्येक दिवस चर्चेत राहणारे विषय असतात.

हाय प्रोफाइल केसेसमधले वकीलही कायम चर्चेत असतात, पटकन आठवणारी काही नावं म्हणजे ॲड. उज्वल निकम, ॲड. सतीश मानेशिंदे, दिवंगत ॲड. राम जेठमलानी. हाय प्रोफाईल केसेस गाजवणारं पण फारशा प्रसिद्धी झोतात नसलेलं नाव म्हणजे ॲडव्होकेट श्रीकांत शिवदे. नुकतंच शिवदे यांचं कर्करोगामुळं दुःखद निधन झालं.

१९८२-८३ सालापासून शिवदे वकिली व्यवसायात आले. ज्येष्ठ क्रिमिनल लॉयर विजयराव मोहिते यांच्या मागर्दशनाखाली त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे आयएलएसमध्येच त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केलं. मितभाषी स्वभाव आणि साधी राहणी हे शिवदे यांचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांचे सहकारी आवर्जून सांगतात. 

शिवदे यांनी आपल्या कारकिर्दीत कित्येक हायप्रोफाईल केसेस हॅन्डल केल्या. अभिनेता सलमान खान दोन मोठ्या प्रकरणांमध्ये अडकला. एक म्हणजे हिट अँड रन केस आणि दुसरं म्हणजे काळवीट शिकार प्रकरण. या दोन्ही केसेस शिवदे यांनी लढवल्या. हिट अँड रन केस प्रकरणात सलमानसोबतच तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. मात्र शिवदे यांनी ही केस जबरदस्तरित्या हाताळत त्यांची निर्दोष मुक्तता केली. या केसेसच्या सुनावणी वेळी ते सतत सलमान सोबत दिसायचे, पण उगाच कुठलीही प्रतिक्रिया देणं किंवा वादग्रस्त विधान करणं ते कटाक्षानं टाळायचे.

सलमानच्या केसेससोबतच त्यांनी देशभर गाजलेल्या टूजी स्पेक्ट्रम प्रकरणातही आरोपींची बाजू मांडली होती. प्रसिद्ध हिरे व्यापारी भारत शहा यांच्यावर दाखल झालेला खटलाही शिवदे यांनीच लढवला. एवढंच नाही, तर पप्पू कलानी, भाई ठाकूर, हितेंद्र ठाकूर, उदयनराजे भोसले यांच्या गाजलेल्या खटल्यातही शिवदे यांनी आपली अशीलांची बाजू समर्थपणे मांडली होती. शायनी आहुजा, मधुर भांडारकर, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कॅप्टन प्रसाद पुरोहित यांचे वकीलही श्रीकांत शिवदेच होते.

आता एक प्रश्न पडणं साहजिकच आहे, एवढ्या मोठ्या केसेस लढूनही शिवदे यांचं नाव चर्चेत का नव्हतं?

स्वतः शिवदे यांनीच एका ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्यांनी सांगितलेलं, “माझे वडिल पोलिस दलात कार्यरत होते. त्यामुळे मी अनेक वाईट घटना पाहिल्या आहेत. त्यासाठीच मी ज्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत, अशा काही जणांची बचाव करण्याचा प्रयत्न करतो. मला स्वतःलाच ‘सेलिब्रेटी लॉयर’ हे बिरुद मिरवणं आवडत नाही.” म्हणूनच ते बातम्यांमध्ये असूनही, प्रसिद्धीच्या झोतापासून मात्र दूर राहिले.

वकिलीच्या क्षेत्रात शिवदे यांना, ‘गुन्हेगारी प्रकरणात उलट तपासणी करण्यात जबरदस्त असणाऱ्यांपैकी एक’ अशा खास पदवीनं ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनानं वकिली क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.