चर्चा आणि कौतुक फक्त एकाचंच कशाला, भारताच्या या पाच जावयांचंही करायला पाहिजे

रिषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आणि भारतात त्यांच्या खतरनाक चर्चा होऊ लागली. पार सोशल मीडिया पोस्ट म्हणू नका, बातम्या म्हणू नका सगळीकडे रिषी सुनक हेच नाव दिसू लागलं. आता चर्चा होण्याची कारणं सिम्पल आहेत. पहिलं म्हणजे सुनक हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. ब्रिटनच्या एवढ्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाली आहे. आता सुनक नेमके भारताचे की पाकिस्तानचे हा मुद्दा चर्चेत आलाय खरा, पण रिषी सुनक यांची एवढी चर्चा आणि कौतुक होण्याचं कारण म्हणजे ते आहेत भारताचे जावई.

२००९ मध्ये रिषी सुनक यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी विवाह केला. साहजिकच ते भारताचे जावई म्हणून ओळखले जाऊ लागले. फक्त १० हजाराच्या भांडवलावर इन्फोसिससारखं मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या मूर्ती दाम्पत्यांच्या जावयानं ७०० मिलियन पाउंड्सच्या संपत्तीचं मालक आणि ब्रिटनचे पंतप्रधान होणं, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.

पण जसं कौतुक किंवा चर्चा रिषी सुनक यांचं होतं, तसंच भारताच्या या इतर जावयांचंही व्हायला पाहिजे…

१) शोएब मलिक

आता नाव बघून कित्येक जण शिव्या घालतील. पण भारताचा जावई म्हणून खतरनाक चर्चेत आलेलं नाव म्हणजे शोएब मलिक. भारताची टेनिस सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सानिया मिर्झानं २००८ मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केलं. हैदराबामध्ये झालेलं लग्न आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये झालेलं रिसेप्शन या गोष्टी चांगल्याच चर्चेत राहिल्या.

भारताला टेनिसमध्ये कित्येक अविस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या सानियाचं नाव मात्र कायम या लव्हस्टोरीमुळंच चर्चेत राहिलं. तिकडं शोएबनंही पाकिस्तानला अनेक क्रिकेट मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला, मात्र २०१९ च्या भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर निघालेला त्याचा बोल्ड आजही कित्येक चाहात्यांच्या लक्षात आहे, एवढं खरं.

२) निक जोनस

बॉलिवूड गाजवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडच्या सिनेमांमध्येही दिसू लागली. अशातच बातमी आली ती तिच्या रिलेशनशिपची. २०१८ मध्ये प्रियांका चोप्राला अमेरिकन गायक आणि गीतकार निक जोनासनं प्रपोझ केलं. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांनी मुंबईत पंजाबी पद्धतीनं साखरपुडा केला आणि जोधपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीनं लग्न केलं.

या दोघांच्या लग्नाची चर्चा होण्याचं कारण फक्त हॉलिवूड आणि बॉलिवूड एवढंच नव्हतं. तर प्रियांका आणि निक जोनासमध्ये असलेलं वयाचं अंतरही चर्चेत आलं होतं. 

प्रियांका ही निकपेक्षा तब्बल १० वर्षांनी मोठी आहे. अजूनही कित्येक ठिकाणी मुलगी वयानं मोठी असली की चर्चा होते, या दोघांचं लग्नही त्याला अपवाद ठरलं नाही. निक जोनास मात्र यापलीकडेही त्याच्या गाण्यांमुळे नावाजला गेलाय. वयाच्या ३० व्या वर्षी त्याच्या नावावर अनेक म्युझिक अवॉर्ड्सही आहेत.

३) ग्लेन मॅक्सवेल

या यादीतला दुसरा क्रिकेटर म्हणजे ग्लेन मॅक्सवेल. या ऑस्ट्रेलियन बॅट्समननं २०२२ मध्येच चेन्नईमध्ये लग्न केलं. तेही साऊथ इंडियन पद्धतीनं. मात्र त्याआधी त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं ऑस्ट्रेलियामध्ये लग्न केलं होतं. मॅक्सवेल फक्त क्रिकेटच्या मैदानातच नाही, तर भारताबद्दलच्या सोशल मीडिया पोस्ट, भारतीय खेळाडूंशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे मॅक्सवेल चर्चेत असतो.

आता सध्याच्या टी२० वर्ल्डकपमध्ये मॅक्सवेल हिट ठरणार की फ्लॉप यावर ऑस्ट्रेलियाच्या टीमचं भवितव्य अवलंबून असेल.

४) आंद्रेई कोशचीव्ह

दृश्यम बघितलाय का ? त्यातली हिरोईन श्रिया सरन, तिचा हा नवरा. या दोघांनी २०१८ मध्ये लग्न केलं. आता मॅक्सवेल किंवा जोनास यांची नावं चर्चेत असल्यानं आपल्याला माहीत असतात. पण कोशचीव्ह हा गडीही काय कमी नाही. मूळचा रशियन असलेला कोशचीव्ह टेनिस खेळाडू म्हणून लोकप्रिय आहे, पण सोबतच तो व्यावसायिक आहे आणि मोटीव्हेशनल स्पीकरसुद्धा.

नुकताच एका दिवाळी पार्टीमधला या जोडीचा एक फोटो व्हायरल झाला आणि त्यावरुन प्रचंड ट्रोलिंगही झालं.

५) मुथय्या मुरलीधरन

आपल्या फिरकीमुळं भल्याभल्यांना जाळ्यात अडकवणारा मुरलीधरन सुद्धा भारताचाच जावई आहे. २००५ मध्ये मुरलीनं मधीमलर रामामूर्ती या चेन्नईच्या मुलीशी लग्न केलं. मधीमलर ही प्रसिद्ध मलर हॉस्पिटल्सचे मालक डॉ. एस राममूर्थी यांची मुलगी. या दोघांच्या लग्नाची फारशी चर्चा झाली नाही. पण प्रतिस्पर्धी संघातला असूनही मुरली भारतात प्रचंड लोकप्रिय ठरला.

त्याची बॉलिंग ऍक्शन, नावावर असलेले कित्येक रेकॉर्ड्स आणि ऑस्ट्रेलियन बोर्डानं उभ्या केलेल्या कित्येक प्रश्नांना उत्तर देत त्याचं पुन्हा मैदानात उभं राहणं आणि यशस्वी होणं या गोष्टी निश्चितच कौतुकास्पद आहेत.

ही पाच नावं भारताच्या जावयांची. पण या चर्चांमध्ये एक नावही कायम येतं ते म्हणजे

व्हिव रिचर्ड्स

सोशल मीडियाच्या आधीच्या काळात भारतात गाजलेली लव्ह स्टोरी म्हणजे व्हिव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता. भारताच्या दौऱ्यावर विंडीज टीम आलेली. तेव्हा काही पार्ट्यांमध्ये नीना गुप्ता आणि व्हिव रिचर्ड्स एकत्र दिसल्याची चांगलीच चर्चा झाली. मॅचेस झाल्या, विंडीज टीम पुन्हा परत गेली आणि अशातच बातमी आली की नीना गुप्ता प्रेग्नन्ट आहे. लग्न न होता नीना गुप्ता प्रेग्नन्ट झाल्यानं चांगलीच चर्चा झाली, मात्र तिनं हे बाळ वाढवलं. या दोघांचं लग्न झालं नाही, पण तरीही हे दोघं चांगले मित्र राहिले.

रिचर्ड्स मात्र नीना गुप्ता सोबतच्या अफेअरच्या पलीकडेही आपली बॅटिंग आणि एक खतरनाक रुबाब यामुळं लोकप्रिय होता, आहे आणि राहीलही.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.