आवडत्या संघाचा खेळ बघता यावा म्हणून त्याने चक्क क्रेन भाड्याने घेतला…!!!
तुमच्या आवडत्या खेळातील आवडत्या टीमची मॅच बघता यावी म्हणून तुम्ही काय-काय करू शकता..? तुम्ही तुमच्या घरी बसून टेलिव्हिजन सेटवर बसून मॅच बघू शकता, किंवा थेट स्टेडीयममध्ये हजेरी लावून लाईव्ह मॅच बघण्याचा ऑप्शन तुमच्याकडे असतो. समजा मॅचचं तिकीट नाहीच मिळालं तर..? त्यावरही ते ब्लॅकमध्ये मिळवता येतंय का, यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. पण एवढ सगळं करूनही तुम्हाला तिकीट नाहीच मिळालं तर तुमच्याकडे दुसरा काही उपायाच शिल्लक राहत नाही. बरोबर ना..? आम्हालाही असंच वाटतं. पण थांबा, तुर्कीमधल्या एका फुटबॉलवेड्या चाहत्याने मात्र यावर एक भन्नाट उपाय शोधून काढलाय. तो फक्त उपाय शोधूनच थांबलेला नाही तर त्याने तो उपाय आमलात देखील आणलाय.
कुठल्याही परिस्थितीत मॅच बघता यावी यासाठी या चाहत्याने शोधलेला उपाय आधी तुम्हाला सांगतो. उपाय असाय की, मॅचच्या दिवशी तुम्ही क्रेन भाड्याने घेऊ शकता आणि स्टेडीयमच्या बाहेर क्रेन उभारून मॅच बघू शकता. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. या भिडूने हीच भन्नाट आयडियाची कल्पना सांगितलीये. विशेष म्हणजे अशाच पद्धतीने त्याने आपली आपल्या आवडत्या फुटबॉल क्लबची मॅच देखील बघितली. त्याचा क्रेनवर बसून मॅच बघतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय.‘अली डेमीरकाया’ असं या फुटबॉलवेड्या चाहत्याचं नांव.
तर झालं असं की तुर्कीमधील डेनिझ्ली अतातुर्क स्टेडियममध्ये डेनिझ्लीस्पोर आणि गाझीइंटेस्पोर या दोन फुटबॉल क्लब दरम्यान फुटबॉलचा मॅच रंगणार होता. ‘अली डेमीरकाया’ हा डेनिझ्लीस्पोरचा चाहता. मॅच बघण्यासाठी म्हणून तो स्टेडीयमच्या गेटपाशी पोहोचला. परंतू त्याच्यावर १२ महिन्यांची स्टेडीयम प्रवेशबंदी असल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला गेटवरच अडवले. या पट्ठ्याने सुरक्षारक्षकांना खूप गयावया केल्या की आपल्याला स्टेडीयममध्ये प्रवेश देण्यात यावा, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. मग या पट्ठ्याने काय केलं असेल तर तो गेला आणि थेट एक क्रेन भाड्याने घेऊन आला. क्रेन स्टेडियमच्या बाहेर सेट करून मॅचच्या ७५ व्या मिनिटापासून त्याने मॅच बघायला सुरुवात केली पण काही वेळानंतर मात्र पोलीसांनी त्याला क्रेन काढायची सांगितल्याने आपल्या आवडत्या टीमचा पूर्ण मॅच मात्र त्याला बघता आली नाही. तो जरी पूर्ण मॅच बघू शकला नसला तरी त्याच्या आवडत्या टीमने मात्र ही मॅच ५-० अशी जिंकली.
“स्टेडीयममध्ये प्रवेशबंदी असल्याने त्याला आतमध्ये प्रवेश मिळत नव्हता आणि टीमच्या दृष्टीने मॅच खूपच महत्वाचा होता, त्यामुळे त्याला तो बघायचाच होता” असं अली डेमीरकायाने स्थानिक माध्यमांशी यासंदर्भात बोलताना सांगितलं. असं असलं तरी त्याच्यावर स्टेडीयममध्ये प्रवेश करण्यास नेमकी बंदी का घालण्यात आली होती, हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही.