शेतात राबणाऱ्या कार्यकर्त्याला उचलून नेलं आणि थेट आमदार बनवलं !

ही गोष्ट तेव्हाची जेव्हा राजकारणात पैशापेक्षा शब्द महत्वाचा होता. कोल्हापूरचे उदयसिंहराव गायकवाड हे तेव्हा जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये दोन गट होते. एक श्रेष्ठी गट आणि दुसरा रत्नाप्पा कुंभार गट. इतर पक्षांपेक्षा कॉंग्रेसमधल्या या दोन गटातच मोठी स्पर्धा असायची. या स्पर्धेमध्ये अनेकदा छोटे कार्यकर्ते भरडले जायचे.

एकदा असच झालं. शिरोळ तालुक्यातल्या घोसरवाडचा दशरथ नरसिंगा कांबळे हा कार्यकर्ता जिल्हापरिषदेचा सदस्यपदी निवडला गेला होता. घरची परिस्थिती बेताचीच होती. हातावर पोट होतं.

एकदा राजकारणामुळे कोणी तरी दशरथ कांबळेची झोपडीच पेटवून दिली. त्याचा संसार उघड्यावर आला. 

तसं बघायला गेल तर दशरथ कांबळे हा श्रेष्ठी गटाचा कार्यकर्ता. काही विरोधातले नेते त्याला आपल्या सोबत ये म्हणून दमदाटी करत होते.  त्यातूनच त्याची झोपडी पेटवण्याचा प्रकार घडला.  दशरथ कांबळेबरोबर जे घडलं ते उदयसिंहराव गायकवाडानां कळाल. ते जिल्हापरिषदेत श्रेष्ठी गटाचे नेते होते. ते दशरथ कांबळेच्या भेटीला त्याच्या झोपडीवर गेले.

गायकवाडांच्या सोबत शिरोळ तालुक्यातील नेते दिनकरराव यादव, दत्तवाडकर सरकार, डॉ.देसाई अशी नेते मंडळी होती. रात्रीचे बारा वाजले असतील. गायकवाड दशरथला समजावून सांगत होते की तूझ्यावर एवढा दबाव येत असेल तर तू त्यांच्या गटात जा. पण दशरथ ऐकायला तयार नव्हता. अचानक तो रडायलाच लागला. कसे बसे डोळे पुसले आणि म्हणाला,

“गायकवाडसाहेब, मी जातीचा मांग आहे. शब्दाला जागणारी आमची जात आहे. त्यांनी त्रास दिला म्हणून मी तुम्हाला सोडून कसा जाऊ? मेलो तरी मी बदलणार नाही.”

अक्षरशः घर जळालेले आहे आणि हा कार्यकर्ता आपल्याला सोडून जाणार नाही म्हणतोय हे बघून त्या तिन्ही नेत्यांना भरून आलं. गायकवाड गाडीत बसता बसता त्याला म्हणाले,

” दशरथ मला संधी मिळाली नां तर तुझ्यासाठी मी जरूर काही तरी करेन एवढ लक्षात ठेव.”

पुढे दहा वर्षांचा काळ लोटला. पंचगंगेच्या पुलाखालून बरच पाणी वाहून गेल. उदयसिंहराव गायकवाड शाहूवाडी तालुक्यातून आमदार झाले. त्यानंतर मंत्रीदेखील झाले. जिल्ह्यांच नेतृत्व त्यांच्याकडे आलं.

शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. त्यांनी गायकवाडांना आपल्या चेम्बरमध्ये बोलवून घेतलं. कडक शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकररावांनी तातडीने बोलावलं म्हटल्यावर गायकवाडांना कळेना नेमक काय झालंय. गडबडीने ते मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये आले. तिथे गेल्यावर दिसल की कोल्हापूर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंतराव भिडे आले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले,

“इंदिरा गांधींचा आत्ताच फोन आला होता, कोल्हापूर नगरपरिषदेतर्फे विधानपरिषदेवर एका व्यक्तीची निवड करायची आहे. मात्र ती व्यक्ती मांग समाजाची पाहिजे. अशा कोणाच नाव तुमच्या डोळ्यासमोर असेल तर सुचवा.”

उदयसिंगराव गायकवाडांना दहा वर्षापूर्वीचा घोसरवाडमधला प्रसंग आठवला. त्यांनी एका क्षणात उत्तर दिल,

“दशरथ नरसिंग कांबळे”

अनंतराव भिडेना देखील आश्चर्य वाटल. त्यांनी खात्रीतला कार्यकर्ता आहे का याची चौकशी केली. गायकवाडांनी सांगितलं की

“कार्यकर्ता तुमच्या भागातील आहे, प्रामाणिक आहे. त्याची खात्री मी देतो.”

शंकरराव चव्हाणांनी सांगितलं की वेळ घालवू नका, त्याचा फॉर्म भरून घ्या. लगेच कोल्हापूरला सखाराम खराडे यांना फोन करण्यात आला आणि निरोप दिला की घोसरवाडमधल्या दशरथ नरसिंग कांबळेनां शोधून आणा आणि त्यांचा फॉर्म कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करा.

कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांनी शेतात काम करत असलेल्या दशरथ कांबळेनां शोधून काढल.

ते राजकारणापासून खूप दूर निघून आले होते. त्यांना कळेना काय झालंय. कार्यकर्त्यांनी त्यांना थेट कोल्हापूरला आणलं. तिथे नवीन धोतर, शर्ट, टोपी विकत घेतली, दशरथ कांबळेनां ती घालायला लावली आणि वाजत गाजत कलेक्टर ऑफिस मध्ये त्यांचा विधानपरिषदेचा फॉर्म भरला.

शेतात राबत असलेला कार्यकर्ता थेट आमदारकीला निवडून आला.

आजकाल नेतेमंडळी बसता उठता अशी आश्वासने अनेकांना देत असतात. काळाच्या ओघात ही आश्वासने विरून जातात. पण नेत्यांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे दशरथ कांबळे यांच्या सारखे कार्यकर्ते आणि शब्दाला जागणारे गायकवाड यांच्या सारखे नेते आज शोधूनही सापडणार नाहीत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.