शेतकऱ्यांचं आंदोलन संपले असं वाटत असतानाच सरकारची कृती नवीन ऊर्जा देऊन जाते…

मागच्या जवळपास १० महिन्यांपासून उत्तर भारतात चालू असलेलं शेतकरी आंदोलन मागच्या अनेक दिवसांपासुन चर्चेत तसं दुर्मिळच होते. बातम्यांमध्ये देखील क्वचित. त्यामुळेच शेतकरी आंदोलन आता संपले कि काय असं वातावरण तयार झाले होते.

पण हरियाणाच्या कालच्या घटनेने सिद्ध केलं कि ज्या उत्साहात नोव्हेंबर २०२० मध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती त्याच उत्साहात आज देखील शेतकरी आंदोलन सुरु आहे. याआधी देखील अनेकदा अशा घटना घडल्या ज्यामुळे आंदोलन संपले कि काय असं वाटत असतानाच सरकारच्या एखाद्या कृतीमुळे आंदोलन पुन्हा नव्या ऊर्जेने सुरु झालं आहे.

हरियाणामध्ये काल काय घडले?

आंदोलनातील शेतकरी संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली जोडले गेले आहेत आणि आवाहन करण्यात आले ते आंदोलनस्थळी एकत्र येतात. अशातच हरियाणामधील स्थानिक निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीने करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे, यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.

या जखमी शेतकऱ्यांचे फोटो करनालचे उपविभागीय अधिकारी आयुष सिन्हा यांच्या एका आदेशासोबत जोडले जात आहेत. कारण सिन्हा यांनी पोलिसांना सुरक्षेबाबतचे आदेश देताना स्पष्ट म्हंटले आहे कि,

ही नाकाबंदी तोडून कुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतो सरळ त्यांची डोकी फोडा. मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा. मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे. लिखित देतो. सरळ लाठीचार्ज करा, काही शंका? सरळ उचलून उचलून मारा.

यात शेतकऱ्यांचं रक्त सांडल्याने पुन्हा एकदा आंदोलनाने नव्या जोमाने उसळी घेतल्याच पाहायला मिळत आहे. कारण राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी निदर्शन सुरु केली आहेत, आणि यासोबतच ५ सप्टेंबरला मुजफ्फरनगर इथं शेतकऱ्यांची महापंचायत होणार आहे. याला आधी मर्यादित लोक येण्याची शक्यता होती. मात्र आता सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी इथं जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राकेश टिकैत यांनी देखील आरोप केला आहे कि, सरकार शेतकऱ्यांना मुजफ्फरनगरला येण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी एवढा सगळा खटाटोप करत आहे. त्यांचं सगळं लक्ष याच महापंचायतीकडे आहे.

याआधी देखील काही घटनांनी आंदोललनाला आणखी बळ मिळालेलं दिसून आलं आहे.  

  • याआधी संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली स्वतःची अभिरूप संसद चालवण्याची घोषणा केली होती होती. खरंतर त्याआधी शेतकरी केवळ संसदेला घेराव घालणार होते. मात्र २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेला हिंसाचार लक्षात घेत पोलिसांनी संसद मार्चसाठी परवानगी साफ नाकारली.
  • मात्र हि परवानगी नाकारल्यामुळे शेतकऱ्यांनी जंतरमंतर मैदानावर स्वतःची अभिरूप संसद चालवण्याची घोषणा केली. त्यावेळी राकेश टिकैत यांनी सांगितले होते की म्ही रोज जंतर मंतरवर शेतकऱ्यांची संसद चालवू. पोलिसांनी जाऊ दिले तर तेथे जाऊ, अन्यथा तुरुंगातून शेतकरी संसद चालवू. सोबतच काँग्रेसपासून अनेक विरोधी पक्षांची देखील या आंदोलनाला साथ मिळाली.
  • त्यादरम्यान भाजपच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत एक वादग्रस्त विधान केलं, ज्यात त्या म्हणाल्या होत्या कि, प्रदर्शन करत असलेले शेतकरी नाहीत तर ते मावली आहेत.
  • तर जुलैमध्ये हरियाणामध्येच विधानसभेचे उपाध्यक्ष रणबीर गंगवा यांच्या सरकारी वाहनावर हल्ला झाला होता. या घटनेनंतर जवळपास १०० शेतकऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र यामुळे हरियाणा सरकारवर सर्वच स्तरातून टीका झाली आणि आंदोलन पुढे चालूच राहिले.
  • जून महिन्यात गाजीपूर सीमेवर भाजपचे नेते अचानक घोषणा देऊ लागले. शेतकऱ्यांचा आरोप होता कि, ते व्यासपीठाच्या दिशेने जात होते. याच दरम्यान पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि शेतकऱ्यांदरम्यान बाचाबाची झाली. याबद्दल देखील बरीच चर्चा झाली.
  • याआधी १६ मे रोजी देखील जेव्हा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी विरोध प्रदर्शन केले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. यानंतर देखील शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते.
  • तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंदोलनजीवी या शब्दाने देखील शेतकऱ्यांना अधिक बळ मिळण्याचं दिसून आलं होतं. संसदेत अधिवेशनादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर विरोधी पक्ष आणि शेतकऱ्यांकडून या गोष्टीवर बरीच टीका करण्यात आली होती.
  • यासोबतच सातत्यानं सरकार आणि भाजपकडून शेतकऱ्यांना अनेकदा खलिस्तानी सारखी देखील टीका करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एकप्रकारे आणखी बळ मिळालं होतं.

राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी जादू केली होती. 

या सगळ्या घटनांव्यतिरिक्त शेतकरी आंदोलन २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीमुळे देखील बरेच चर्चेत आले होते. मात्र त्या घटनेनंतर अनेक शेतकरी आंदोलन स्थळावरून मागे फिरत होते. पण गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा रडतानाचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला आणि एक प्रकारे आंदोलनाला पुन्हा बळ मिळालं. शेतकरी अजूनही ३ कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर आंदोलनावर ठाम आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.