महाराज म्हणाले, ‘चमचमीत बिर्याणी खाण्यापेक्षा शेतकऱ्याची डांगर भाकर जास्त हायजेनिक आहे ‘

राजर्षी शाहू महाराज यांचं त्यांच्या रयतेवर असलेलं प्रेम सर्वश्रुत होतं. ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलं होत कि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अगदी त्याच प्रमाणे शाहू महाराजांचं वर्तन होत. त्यांचं रयतेवर अपार आणि जीवापाड प्रेम होतं. खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे म्हणून ओळखले जातात.

रयतेवर आलेल्या संकटाला राजर्षी शाहू महाराज स्वतः निधड्या छातीने पुढे असायचे. जितकी काळजी शाहू महाराज जनतेची घ्यायचे तितकीच माया राज्यातली रयत शाहू महाराजांवर करायची. राजर्षी शाहू महाराजांच्या रयतेच्या प्रेमाचा आजचा किस्सा.

ज्यावेळी प्लेगची साथ आली त्यावेळी हाहाकार उडाला होता. माणसांचे जीव डोळ्यादेखत जात होते. अशा वेळी राजवाड्यातून कारभार न बघता शाहू महाराज स्वतः रयतेत फिरून हालहवाल विचारू लागले. त्यांनी घोडागाडी काढली आणि स्वतःच त्या रथाचे दोर हातात घेऊन जनतेबद्दल विचारपूस करू लागले.

आपुलकीचा फेरफटका मारत असताना शाहू महाराजांनी सोबतीला त्यावेळचे डॉ. धनावडे घेतले होते. रुग्णांसाठी कॅम्प बांधण्यात आले होते. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. धनावडे कॅम्पकडे निघत असताना महाराजांची घोडागाडी दिसली म्हणून एका शेतकऱ्याने लवून मुजरा करतो आणि पळत जाऊन आपल्या शेतातली चांगली मोठी गाजरं धुवून महाराजांना भेट देतो.

शाहू महाराज घोडागाडीतून खाली उतरले आणि एका आंब्याच्या झाडाखाली त्या शेतकऱ्याने टाकलेल्या घोंगडीवर बसले आणि त्या शेतकऱ्याने आणलेली गाजरं खाऊ लहले. शाहू महाराजांना गाजरं खाताना पाहून डॉ. धनावडे अस्वस्थ झाले आणि ते महाराजांना म्हणाले कि

महाराज क्षमा असावी पण आपली जेवणाची व्यवस्था पुढे केली आहे आणि गाजरं आपल्या तब्येतीला चांगली नाहीत.

शाहू महाराज काहीही न बोलता तिथून निघाले, जरा पुढे येऊन ते एका पारावर बसले. त्यावेळी तिथं महाराजांना बसलेलं पाहून एक शेतकरी चटकन जाऊन डांगर भाकर महाराजांसाठी घेऊन आला. महाराजांनी पोट भरून ते जेवण खाल्लं , जेवताना महाराजांच्या तोंडावरचा आनंद पाहून त्या शेतकऱ्यालाही आनंद झाला. तिथून ते कॅम्पच्या ठिकाणी जायला निघाले.

कॅम्पच्या ठिकाणी आल्यावर ते तिथलं नियोजन बघत काही सूचना देत होते आणि जेवायच्या ठिकाणी आले. त्यावेळी मामलेदार वैगरे असे सगळे मोठे अधिकारी आलेले होते. सगळे जेवायला बसले. दोन तीन घास खाऊन महाराज हात धुवू लागले. शेजारी डॉ. धनावडे बसलेले होते. महाराज त्यांना जेवणात काय हवं नको ते विचारू लागले.

जेवण वगैरे झाल सगळी मंडळी एकत्र बसून चर्चा सुरू झाली.

या चर्चेत मुद्दा निघाला तो कोणतं अन्न आरोग्यदायी आणि कोणतं अन्न शरीराला घातक. या चर्चेच्या बैठकीत शाहू महाराज प्रेमाने डॉ. धनावडेंना म्हणाले,

तुपातली चमचमीत बिर्याणी खाण्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतातली गाजरं आणि डांगर भाकर मला जास्त hygenic वाटते. आणि डॉक्टर त्या शेतकऱ्यांनी ज्या प्रेमाने मला ती भेट दिली ती नाकारून कसं चालेल. यावरून असं सिद्ध होतं कि केवळ राजाचं जनतेवर प्रेम असलेलं पुरेसं नाही तर रयतेचही राजावर प्रेम असावं लागतं.

माझी रयत जर सुखी असेल तर राजासुद्धा आनंदी असतो. माझ्या रयतेच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सगळ्या आनंदापेक्षा मोठा आहे असं राजर्षी शाहू महाराज कायम म्हणायचे.

यातून राजर्षी शाहू महाराजांचं जनतेप्रती आणि जनतेचं आपल्या राजाप्रती असलेलं प्रेम दिसून येतं.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.