एका रात्रीत सर्वच शेतकरी झाले करोडपती, आशियातल्या श्रीमंत गावाची कहाणी !!!
अरुणाचल प्रदेशमधील बोमजा गाव. शेती करणारे सामान्य कुटूंबातील माणसं म्हणून हे गाव आजवर प्रसिद्ध होतं. गावात विकासकाम देखील तशी बऱ्यापैकी झालेली. गावचा उत्पन्नाचा सोर्स म्हणजे शेती पण रातोरात हे गाव करोडपतींच गाव म्हणून समोर आलं. नुसतं करोडपतींच गाव म्हणून नाही तर आशिया खंडातील श्रीमंत गावांपैकी एक म्हणून आज त्याचा उल्लेख केला जातोय.
तर किस्सा असा की, संरक्षण मंत्रालयाने जमीन हस्तांतरणाचा मोबदला म्हणून या गावातील 31 कुटुंबाना 40 कोटी 80 लाख 38 हजार 400 रुपये एवढा निधी वितरित केलाय. अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात धनवर्षाव झाल्याने हे गाव सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
गावातील साधारणतः 200 एकर जमिनीचं अधिग्रहण संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलंय. त्याचा मोबादला नुकताच मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या हस्ते गावकऱ्यांना वितरित करण्यात आला.
अशा प्रकारे धनलाभ झालेल्या गावातील 31 कुटूंबांपैकी एका कुटुंबाला 6 कोटी 73 लाख 29 हजार 925 रुपये, दुसऱ्या कुटुंबाला 2 कोटी 44 लाख 97 हजार 886 रुपये तर बाकी 29 कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी 9 लाख 3 हजार 813 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात कुबेरकृपा झाली आहे.