दहा वर्षांपूर्वी आम्ही फेसबुकवर ऑनलाईन शेती करायचो.

परवा भारताचे पंतप्रधान मोदीजींनी चीनला धडा शिकवण्यासाठी पब्जी गेमवर सर्जिकल स्ट्राईक केला. चीनने धडा शिकला की नाही माहीत नाही पण भारतभरात सगळ्या पालकांनी मात्र त्यांना पोटभरून दुवा दिल्या.

पब्जीने येड केलंय हो. पण एकेकाळी आपल्याला ऑनलाइन सब्जीने याड लावलं होतं.

गोष्ट आहे फार फार वर्षांपुर्वीची म्हणजेच साधारण दहा वर्षांपूर्वी. फेसबुक तेव्हा भारतात नवीन होतं. ओर्कुटचा जमाना होता. एकमेकांच्या स्क्रॅपबुक मध्ये प्रेम फुलत होतं. टेस्टीमोनियलची देवाणघेवाण होत होती.

आपला स्वभाव आधी पासून रिबेल. अखंड ब्रम्हचर्याच व्रत आपल्याला देवाने कपाळावर कोरून पाठवलं होत. ऑर्कुटवर पोरींनी बॅन केलं. कॉलेजमध्ये वायडी पडलं. आयुष्यातले कांड लपवण्यासाठी गप्प ओर्कुटला रामराम केला. आणि फेसबुकवर प्रोफाइल उघडलं.

फेसबुक म्हणजे नवीन जग होतं. इथे तुम्ही कोणाचं वॉल बघताय ते त्यांना कळत नव्हतं. आपली इंजिनिअरिंगची अभ्यासू आणि व्यवहारातील अडाणी दोस्त मंडळी अजून या नवीन जगाकडे पहात नव्हती. त्यांना वेळ नव्हता.

आपल्याकडे सिंगलता आणि वेळ खूप होता.

फेसबुकचा रिसर्च सुरू केला. अगदी युगांडा पर्यंतच्या पोरींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. जेवण झालं का याची चौकशी सुरू केली. त्यांच्याकडूनही ब्लॉक झालो. राजकीय चर्चा रंगवायला लागलो. ऑर्कुट इज हिस्ट्री, फेसबुक इज फ्युचर हे म्हणणे हिरीरीने पटवणे सुरू होते

बाकीचे गाव अजून चड्डीत होतं तेव्हा आपण फेसबुकचा बाप होतो.

हे सगळं चाललं होतं पण एक मन अजून ऑर्कुट कडे धाव घेत होत. अशात फेसबुकवर टिकून राहायला एक गोष्ट घडली.

झालं काय आमच्याच शाळेतल्या आणि आता अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या एका सुबक ठेंगणीने फेसबुकवर एका गेमची रिक्वेस्ट पाठवली. एरव्ही असल्या गोष्टींनी भीक घालत नाही पण पोरगी रिक्वेस्ट करतेय म्हटल्यावर आपलं मन पाघाळलं. त्या नोटिफिकेशनवर क्लिक केलं आणि एक वेगळंच जग समोर आलं.

ऑनलाइन शेतीचं जग, फार्मव्हिले.

फार्मव्हिले हा एक ऑनलाईन गेमिंगचा प्रकार होता. नांगरणी, पेरणी, लावण, भांगलण, मशागत, काढणी वगैरे सगळी शेतीची सगळी कामे या गेममध्ये व्हायची. कोणताही रक्तपात नाही, मारामारी नाही, भांडणे नाहीत. बांध मारणे, भाऊबंदकी नाही.

आपल्या फार्म कॅशमधुन शेती खरेदी करायची. परवडते ते बियाणे विकत घ्यायचं आणि लगेच कामाला लागायचं. इथं म्हणजे सरसकट ऊस लावलाय अस नसायचं. पाणी किती, खत किती, पैशे किती हे बघून लावणं करायची. त्याची निगा राखायची.

पीक काढणीला कधी येणार हे लक्ष ठेवायचं. जरा पुढं माग झालं तर पीक जळून जायचं.

तेव्हा आपल्या हॉस्टेलवर लॅपटॉप, इंटरनेट नव्हतं. नेटकॅफेला जायचं. दहा रुपये अर्धा तास देऊन सगळी शेतीची कामे करून घ्यायची. शेजारपाजारच्या शेतात जाऊन त्यांना मदत करून बोनस पॉईंट मिळवायचा. निगुतीने शेताची आखणी करून, त्याची स्वच्छता करून शेत दिसायला देखील भारी करून ठेवायचं.

काढणी केलेलं पीक मार्केटमध्ये विकायचं. खऱ्या शेतीप्रमाणे यातही गणित होतं.

किती पैसे कोणत्या पिकात इन्व्हेस्ट करायचे, त्यातून रिटर्न किती, कोणती अवजारे लागणार याचं कॅल्क्युलेशन असायचं. शेती करून उरलेल्या पैशात शेत कस्टमाईज करता येत होतं. महागातले बुजगावणे लावून हवा करता येत होती. फेसबुक फ्रेंडला रिक्वेस्ट पाठवून मदत घेता येत होती. एक्सपिरियन्स पॉईंटला वेगळंच महत्व होतं.

आपण लावलेल्या शेतात पीक डुलतय, दाण्याने भरलेली कणसे लोम्बत आहेत हे बघायचं समाधान काही औरच होत हे नक्की.

गावाकडे बाप खऱ्या शेतात मरमर राबतोय तिकडे कधी जाणं व्हायचं नाही पण फेसबुक वर प्रगतिशील शेतकरी झालो होतो. आपल्या शेतीचं कौतुक अख्ख्या फेसबुकवर गाजत होतं.

अमेरिकेच्या झिंगा या गेमिंग कंपनीने फार्मव्हिले बनवलं होतं.

नवीनच आलेल्या फेसबुकवर १९ जून २००८ रोजी त्यांनी हा गेम रिलीज केला. अगदी थोड्याच दिवसात फार्मव्हिले प्रचंड फेमस झालं. जगभरातील लाखोजण ही ऑनलाईन शेती करू लागले.

फार्मव्हिलेला फेसबुकचा फायदा झाला त्यापेक्षाही फेसबुकला फार्मव्हिलेचा प्रचंड फायदा झाला.

फक्त ही ऑनलाइन शेती करायची म्हणून फेसबुक अकाउंट उघडणारे महाभाग आपल्या ओळखीत असतील.

२०१० हे वर्ष फार्मव्हिलेने गाजवलं. झिंगा कंपनीने तुफान पैसे छापले शिवाय अनेक अवॉर्डस देखील मिळाले.

पण काही अभ्यासू तज्ज्ञांनी या गेमला नावे ठेवायचं काम देखील हिरीरीने केलं. फार्मव्हिले निगेटिव्हिटी पसरवत आहे, याच्या विळख्यात तरुणाई अडकली आहे, त्याच्या ग्राफिक्समध्ये दम नाही वगैरे टीका झाली.

एवढंच नाही तर टाईम मॅगझीनने फार्मव्हिले जगातला सर्वात भंपक गेम आहे हे जाहीर केले.

पण म्हणतात ना हाथी चले बझार, कुत्ते भौके हजार तसच फार्मव्हिले च्या बाबतीत झालं. या खेळात त्याकाळची पोर खरोखर येडी झाली होती. दिवसरात्र ऑनलाइन शेतीची चिंता. फार्मव्हिलेची पॉप्युलॅरीटी दिवसेंदिवस वाढतच चालली होती.

एनएफएस मोस्ट वॉन्टेड, काउंटर स्ट्राईकला मागे टाकून फार्मव्हिले गेमिंग जगतावर राज्य करत होता.

पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो. फार्मव्हिलेला सुद्धा होता. ज्या वेगाने तो फेमस झाला त्याच वेगाने अचानक गायब देखील झाला. फेसबुक टिकल पण व्हर्च्युअल शेतीची आपली ही सवय सुटली कळाल देखील नाही.

पुढे अँड्रॉइडच्या काळात तो प्लेस्टोअरवर आला देखील पण डाउनलोड करायचं धाडस झालं नाही.

आजवर स्नेकपासून ते पब्जीपर्यंत हजारो गेम पाहिले. या गेमखेळण्यामुळे आपल्या आयुष्यात काय भर पडली, कोणतं ज्ञान मिळालं हे माहीत नाही पण आमच्या फार्मव्हिलेने शेतीत किती कष्ट आहे, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे नक्कीच समजावून सांगितलं.

आता पब्जी बॅन झाल्या नंतर अक्षय कुमार फौजी ही नवीन आत्मनिर्भर स्वदेशी गेम आणत आहे असं ऐकलं. आमची अक्षय कुमार साहेबाना मागणी आहे की ज्याप्रमाणे जय जवान म्हणून त्यांनी फौजी हा गेम आणला आहे त्याप्रमाणे जय किसन म्हणून फार्मव्हिले नव्या रुपात आणावा जेणेकरून शेती संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला गेमच्या रूपाने का असेना पण कळेल आणि आपल्यासारखे शहाणी होतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.