वडिलांनी नकार दिला म्हणून, नाही तर नरेंद्र मोदी आज सैन्यात असते…
नरेंद्र दामोदरदास मोदी. भारताचे सध्याचे पंतप्रधान. पण त्याही पेक्षा त्यांची आणखी एक ओळख म्हणजे सर्वात महत्वकांक्षी नेते. आपल्या विरोधकांना अलगद बाजूला करून जे हवं आहे ती गोष्ट ते मिळवणारचं यासाठी मोदी विशेष ओळखले जातात. असं म्हंटल जात कि त्यांच्या याच महत्वकांक्षी स्वभावामुळे त्यांनी एक संघाचा साधा स्वयंसेवक ते देशाचे पंतप्रधान या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली.
पण किती हि महत्वकांक्षी स्वभाव असला तरी मोदींना एक गोष्ट मात्र सध्या करता आली नाही ती म्हणजे त्यांचं सैन्यात जाण्याचं स्वप्न.
खरंतर नरेंद्र मोदी लहानपणापासूनच देशाची सेवा करण्याचं स्वप्न बघत होते. त्यासाठी ते भारतीय सैन्यात देखील जाऊ इच्छित होते. पण नियतीने मात्र त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. ते म्हणजे देशाचे पंतप्रधान पद.
१७ सप्टेंबर १९५० ला वडनगरमध्ये दामोदरदास मूलचंद मोदी आणि हीराबेन मोदी यांच्या घरी नरेंद्र मोदींचा जन्म झाला. लहानपण अत्यंत गरिबीत जात असल्यामुळे त्यांच्या आयुष्याची सुरुवातच अत्यंत संघर्षमय झाली होती. आपल्या भावंडांसह मोदी एका मजल्याच्या छोट्याश्या घरात राहायचे. वडील स्थानिक रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे.
सुरुवातीच्या काळात मोदी देखील सर्वसामान्य मुलाप्रमाणे वडिलांना आपल्या कामात मदत करायचे. स्टेशनवर उभे राहून वडिलांसोबत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना चहा विकायचे. त्याच दरम्यान वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. बॉयज स्काऊट्स गट असं त्यांच्या गटाला म्हंटले जायचे. पुढे १९६० च्या आसपास ते संघाच्या शाखेत देखील जाऊ लागले.
याच दरम्यान मोदींनी एका भाषणात जेष्ठ नेते लक्ष्मणराव इनामदार यांना ऐकले. लक्ष्मणरावांना देखील हा महत्वकांक्षी तरुण प्रचंड आवडला आणि त्यांनी मोदींना बालस्वयंसेवक बनवले. मोदी शाळेत देखील तेवढेच हुशार होते. त्यांच्या शाळेतील एक सहकारी सांगतात कि मोदी वाद-विवाद स्पर्धांमध्ये अव्वल होते. ते वडनगरच्या प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये होते.
सोबतच याच काळात १२-१३ वर्षाच्या नरेंद्र मोदी यांचा देशभक्तीकडे ओढा वाढला होता. त्यांना एक पारंपरिक आणि चाकोरीबद्ध जीवन जगायचं नव्हत.
त्यांनी देशसेवा करण्यासाठी सैन्यात जायचं स्वप्न बघितले. त्यासाठी त्यांनी जामनगरच्या सैनिक स्कुलमध्ये जाण्याचं ठरवलं. मात्र जामनगरच ते सैनिक स्कुल कच्छच्या आखाताजवळ होते. जे मोदींच्या घरापासून बरेच लांब होते. सोबतच जेव्हा फी भरायची वेळ आली तेव्हा देखील मोदींच्या वडिलांकडे पुरेसे पैसे नव्हते.
परिणामी दामोदरदास मोदी यांनी नरेंद्र मोदी यांना सैनिक स्कुलमध्ये जाण्यास नकार दिला.
यामुळे ते बरेच नाराज झाले. पुढे ४ वर्षातच शाळेतील शिक्षण पूर्ण करून मोदींनी घराचा निरोप घेतला आणि उत्तर भारतात निघून गेले, त्यावेळी ते हिमालय वगैरे फिरले. १९७० च्या दशकात ते पुन्हा अहमदाबादला परतले आणि हेडगेवार भवन मधील लक्ष्मणराव इनामदार यांना संपर्क केला आणि त्यांच्यासोबतच राहू लागले.
१९७२ साली ते औपचारिकपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून दाखल झाले आणि प्रचारक म्हणून काम करू लागले.
१९७३ साली सिद्धपूर पाटणमध्ये भरलेल्या पहिल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन काम केलं. तिथून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये ओळखले जाऊ लागले होते. गुजरात नवनिर्माण आंदोलनाने तर त्यांच्या नावाची वरीष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊ लागली. या आंदोलनामुळे आरएसएस आणि एबीव्हीपी या संघटना गुजरातच्या तळागाळात जाऊन पोहचल्या.
पुढे आणीबाणी दरम्यान देखील मोदींनी आणीबाणीच्या विरोधात सक्रिय भूमिका बजावली. ते गुजरातमध्ये लोक संघर्ष समितीचे जनरल सेक्रेटरी बनले. आणिबाणीमध्ये भूमीगत होऊन त्यांनी आंदोलनाचा झेंडा उंच केला. असं म्हणतात कि आणीबाणीच्या संघर्षात तावून सुलाखून नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व घडलं. पुढे ते सक्रिय राजकारणात आले, गुजरातचे मुखमंत्री, देशाचे पंतप्रधान बनले.
हे हि वाच भिडू
- आणीबाणीच्या काळात मोदी काय करत होते ?
- नरेंद्र मोदी अडवाणींची रक्ततुला करणार होते..
- मोदी एकदा चक्क राजीव गांधींना भेटायला गेले होते, अहमद पटेलांनी गाठ घालून दिली होती.