७५० रुपयांचं मानधन मिळवण्यासाठी फारुख शेखना १५ वर्ष वाट पाहावी लागली होती

सिनेमातील काही जातीवंत कलाकार सिनेमाला कला म्हणून पुढे नेत असतात. त्यांच्या दृष्टीने व्यावसायिक यश कधीच महत्त्वाचे नसते. सिनेमातून मांडलेला आशय, त्याचा समाज मनावर होणारा परिणाम आणि सिनेमातून प्रेक्षकांना दिलेला संदेश महत्त्वाचा असतो. असे चित्रपट भारतामध्ये पॅरलल सिनेमा म्हणजेच समांतर सिनेमा किंवा कलात्मक सिनेमा म्हणून ओळखले जातात.

या सिनेमांना यश कमी मिळत असले तरी या कलाकृतीनी भारतीय सिनेमाच्या इतिहासात फार मोलाची भर टाकली आहे. याच श्रेणीत मोडणाऱ्या एका कलावंताच एक नाव आहे एम एस सथ्यू ! त्यांचा जन्म ६ जुलै १९३० रोजी कर्नाटकात म्हैसूर येथे झाला. सुरुवातीपासूनच त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचा आणि चळवळीचा पगडा होता. यातूनच त्यांची मानसिकता घडत गेली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एम एस सथ्यू मुंबईत आले आणि ‘इप्टा’ या संस्थेची जोडले गेले.

या संस्थेत अनेक नामवंत कवी, चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ आणि नाट्य कर्मी होते. या संस्थेच्या मार्फत अनेक साम्यवादी विचारांना साजेश्या कलाकृती येत होत्या. देशात साम्यवादी विचार रुजविण्याचे मोठे काम या संस्थेने केले आहे.

एम एस सथ्यू सुरुवातीला चेतन आनंद सोबत काही वर्ष कार्यरत होते. आर्ट डायरेक्टर म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम केले. १९७४ साली त्यांचा पहिला महत्त्वपूर्ण असा सिनेमा प्रदर्शित झाला. तो होता ‘गर्म हवा’ हा सिनेमा भारत पाकिस्तान फाळणीच्या प्रश्नावर होता. फाळणीनंतर भारतात आग्रा शहरात एका मुस्लिम कुटुंबाची होणारी कुचंबणा या चित्रपटातून दाखवण्यात आली होती.

ख्यातनाम उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांच्या एका कथेवर हा चित्रपट होता. याची पटकथा आणि संवाद सथ्यू यांची पत्नी शमा जैदी आणि कैफी आजमी यांनी लिहिले होते.

‘गर्म हवा’ या सिनेमाच्या वेळचा हा किस्सा आहे.

फारुख शेख याच्या मानधनाचा! जेष्ठ अभिनेते बलराज सहानी यांची या चित्रपटात प्रमुख होती. याच चित्रपटातून अभिनेता फारुक शेख याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्या वेळी तो मुंबईत लॉचे शिक्षण घेत होता. फारूक शेख देखील इप्टा संस्थेशी  निगडित होता.

या सिनेमाचे  बजेट खूपच कमी होते. त्यामुळे सथ्यू यांनी या सिनेमात ज्या लोकांना कमी पैसे द्यावे लागतील आणि ज्यांना पैसे द्यावेच लागणार नाहीत अशा कलाकारांना घेऊनच चित्रपट बनवला! फारुक शेख ला जेव्हा या चित्रपटासाठी विचारण्यात आले त्यावेळी त्याला ७५० रुपये मानधन मिळेल असे सांगितले गेले. तसेच हे मानधन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळेल हे देखील सांगण्यात आले. 

अनेक अडचणींना तोंड देत या सिनेमाचे शूट पूर्ण झाले. निर्मितीच्या वेळी अनेक अडथळे आले. बलराज सहानी यांनी या चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले आणि दुसऱ्याच दिवशी (१३ एप्रिल १९७३) रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाल्यावर देखील हा सिनेमा प्रदर्शित होवू शकला नाही. काही उजव्या विचारसरणीच्या मंडळीनी या सिनेमाला प्रखर विरोध केला. 

मुंबईत शिवसेना प्रमुखांसाठी सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले. त्यांच्या ग्रीन सिग्नल नंतर सिनेमा प्रदर्शित झाला. देशात फार कमी ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला. अपेक्षाप्रमाणे चित्रपटाला व्यवसायिक यश अजिबात मिळाले नाही परंतु अनेक मान्यवरांनी आणि समीक्षकांनी याच्यावर कौतुकाची मोहर उमटवली.

या चित्रपटाचे ठरलेले मानधन ७५० रुपये फारुक शेख याला काही मिळालेच नाही. 

अर्थात फारुक शेख हा ‘वेल टू डू’ फॅमिली मधील असल्यामुळे त्याला त्याचे काहीच वाटले नाही. या सिनेमाचे भलेही मानधन फारुख शेखला मिळाले नसले तरी त्याला या चित्रपटाच्या नंतर सत्यजित रे यांनी ‘शतरंज के खिलाडी’ आणि मुजफ्फर अली यांनी ‘गमन’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

फारुख शेख साठी ही फार मोठी उपलब्धी होती आणि ती केवळ ‘गर्म हवा’ या चित्रपटात त्याने भूमिका केली म्हणून प्राप्त झाली होटी. यानंतर फारुख शेख याने व्यावसायिक चित्रपटात काम करायला सुरुवात केली. ऐंशीच्या दशकामध्ये नूरी, चष्मबद्दूर, साथ साथ, बीबी हो तो ऐसी असे अनेक चित्रपट फारुक शेख यांनी केले. रंगभूमीवर त्याचा वावर कायमच होता. या सर्व गदारोळात फारुख शेख आपल्या पहिल्या चित्रपटाचे साडेसातशे रुपये मानधन पूर्णतः विसरून गेला होता. पण दिग्दर्शक एम एस सथ्यू मात्र विसरले नव्हते. 

‘गर्म हवा’ प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी म्हणजे १९८९ साली ते फारुक शेख यांना भेटले आणि त्यांनी साडेसातशे रुपये फारुक शेखच्या हातात ठेवले! फारुख शेख तोवर हे मानधन विसरून गेला होता आणि तो हिंदी सिनेमातील मोठा कलाकार झाला होता. पण सथ्यू यांनी दिलेले साडेसातशे रुपये त्याने मोठ्या श्रद्धेने स्वीकारले आणि त्यांना नमस्कार केला. 

कारण त्यांच्या ‘गर्म हवा’ या चित्रपटापासूनच त्याची अभिनयाची यात्रा सुरू झाली होती. फारूक शेख आपल्यातून जाऊन आता जवळपास दहा वर्ष होत आहे  एम एस सथ्यू आज ९३ व्या वर्षी म्हैसूर मध्ये आनंदात जीवन जगात आहेत. काही वर्षापूर्वी ‘गुगल सर्च’ च्या ‘री युनियन’ या जाहिरात पटात त्यांनी भूमिका केली होती.

भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.