सांगून पटणार नाही पण द्रविडने एकदा फक्त २२ बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं.
राहुल द्रविड म्हटल की एकच गोष्ट डोळ्यासमोर येते, टीम इंडियाची वॉल. एकदा क्रीझवर नांगर टाकून उभा राहिला तर भल्याभल्यांना न दाद देणारा द्रविड.
समोरचा बॉलर कितीही दिग्गज का असेना, त्याचा बॉल रिव्हर्स स्विंग होतोय, बाउन्स होतोय, वेगाने येतोय, स्पिनरला मदत करणारी खेळपट्टी आहे, फिल्डर्स प्रचंड स्लेजिंग करत आहेत, ग्राउंडमध्ये प्रेक्षकांचा दंगा सुरु आहे या पैकी कोणतही कारण असू दे.
राहुल द्रविडची एकाग्रता भंग करण्याची हिंमत कोणाचीही नाही.
टाळ्या खाऊ शॉट मारण्यापेक्षा इनिंग बिल्ड करणे यावर द्रविडचा जोर असायचा. यामुळे बऱ्याचदा बाकी खेळाडू शायनिंग मारून जायचे पण द्रविडकडे मिडीयाच्या झगमगाटाच दुर्लक्ष व्हायचं. त्याची कामगिरी झाकोळून जायची.
सुरवातीच्या काळात तर द्रविडवर फक्त कसोटी प्लेअर आहे असा शिक्का बसला होता. अनेकदा कप्तान गांगुलीवर द्रविडला बाहेर बसवून एखादा फोर सिक्सर मारणारा खेळाडू खेळवण्याचा दबाव येत असायचा. पण गांगुलीला माहित होतं की द्रविड एक बाजू लावून धरतो म्हणून बाकीचे प्लेअर्स रिस्की शॉट मारू शकतात.
टेस्ट असो किंवा वनडे द्रविड खरा मॅच विनर होता.
गोष्ट आहे २००३ सालची. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडची टीम टीव्हीएस ट्राय सिरीज साठी भारत दौऱ्यावर आले होते.
भारताची बॅटिंग लाईनअप मजबूत व्हावी म्हणून गांगुलीने पार्थिव पटेलला बाहेर बसवून विकेटकीपिंगची जबाबदारी उपकर्णधार राहुल द्रविडवर सोपवली होती.
चौथी वनडे भारत व न्यूझीलंडदरम्यान हैद्राबादच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियममध्ये होणार होती. गांगुलीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. न्यूझीलंडची बॉलिंग तगडी होती. डरेल टफी, कायले मिल्स, जेकब ओरम, व्हिटोरी, ख्रिस केर्न्स असे एका पेक्षा एक बॉलर त्यांच्या टीममध्ये होते.
पण तो दिवस न्यूझीलंडसाठी अतिशय खराब होता.
सचिन आणि सेहवागने जबरदस्त ओपनिंग केली. न्यूझीलंडच्या बॉलर्सची पिसे काढत दोघांनीही शतक ठोकले. दोघांनी १८२ धावांची डोंगराएवढी पार्टनरशिप बनवली. सचिन १०२ धावा काढू आउट झाला. तीन नंबरला आलेल्या गांगुलीने सेहवागला चांगली साथ दिली.
भारत प्रचंड मोठी धावसंख्या बनवेल अस दिसत होत. मात्र सेहवाग आणि गांगुली आउट झाल्यावर भारताचा रनरेट अडखळला.
४ नंबरला आलेला युवराज देखील काही मोठा पराक्रम करू शकला नाही. तो आउट झाल्यावर द्रविड, लक्ष्मण आणि कैफ हे तिघे फलंदाज उरले होते मात्र स्फोटक बॅटिंग ही त्यांची ओळख नव्हती. द्रविड आणि लक्ष्मणने नेहमीप्रमाणे अंदाज घेऊन संथ सुरवात केली.
सिंगल डबल काढून स्ट्राईक रोटेट करणे एवढ टार्गेट त्यांच्या समोर होत.
पण ४५ व्या ओव्हरला बॉलिंगला आलेल्या स्टायरीसने द्रविडला काय केलं काय माहित. द्रविडने त्याला एक फोर आणि एक सिक्स हाणला. कॉमेंटेटरनां सुद्धा द्रविडची बॅटिंग बघून आश्चर्य वाटलं.
पुढच्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला लक्ष्मण आउट झाला. भारताचा स्कोर ३००च्या वर पोहचला होता. अजून चार ओव्हर शिल्लक होते. कैफ आणि द्रविड आता संयमी बॅटिंग करतील असाच सगळ्यांचा अंदाज होता.
पण द्रविडचा नूरच वेगळा होता.
त्याची गाडी आता वरच्या गियरमध्ये पोहचली होती. त्याचं हे रौद्ररूप अनेकांना नवीन होतं. पुढच्या ओव्हर साठी आलेल्या जेकब ओरमची त्याने खरपूस धुलाई केली. एका ओव्हर मध्ये एक सिक्स आणि दोन फोर मारले.
द्रविडच बघून कैफ सुद्धा फोर्मात आला. त्याने सुद्धा न्यूझीलंडच्या बॉलर्सवर हात धुवून घेतले.
शेवटच्या ओव्हर साठी आलेल्या जेकब ओरमला द्रविडने आणखी एक सिक्स मारला. इनिंगच्या शेवटच्या बॉलला द्रविडने पळून २ धावा काढल्या आणि आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. न्यूझीलंड पुढे आपण ३५४ धावांचा डोंगर उभा केला होता.
भारताची बॅटिंग संपली तेव्हा लक्षात आलं की द्रविड फक्त २२ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. हा एक विक्रम होता. सगळ्या जगाला धक्का बसला.
भारता तर्फे सर्वात वेगवान अर्धशतक अजित आगरकरने ठोकलेल ते २१ बॉलमध्ये. द्रविड फक्त १ चेंडू मागे राहिला पण तरीही भारतातर्फे दुसरा वेगवान बॅॅट्समन ठरलाच होता. शिवाय जगातला फास्टेस्ट हाफ सेंच्युरी मारणारा तो एक नंबरचा विकेटकीपर ठरला.
ती मॅच भारताने १४५ धावांनी सहज जिंकली.
१३० धावा ठोकणारा सेहवाग मॅन ऑफ द मॅच ठरला. विश्वविक्रम करूनही द्रविडची खेळी दुर्लक्षित राहिली. पण आपण मॅच जिंकली यातच तो खुश होता.
आज या इनिंगला इतकी वर्षे झाली. भारताकडे धोनी, विराट कोहली, तेंडूलकर, गांगुली, रोहित शर्मा असे अनेक स्फोटक फलंदाज होऊन गेले पण कोणालाही द्रविडचा विक्रम मोडता आला नाही. इतकेच काय सेहवाग, युवराज यांनी देखील २२ बॉलमध्ये अर्धशतक झळकवल आहे पण वनडेमध्ये द्रविडच्या पुढे जाण त्यांना देखील जमलं नाही.
कसोटी प्लेअर म्हणून हिणवल्या जाणाऱ्या द्रविडने त्या एका इनिंगमध्ये सगळ्यांची तोंडे बंद करून टाकली.
हे ही वाच भिडू.
- जिथे कमी तिथे आम्हीम्हणणाऱ्या द्रविडने बॉलिंग करूनदेखील मॅच जिंकवली होती.
- द्रविड त्या दिवशी लॉर्डसवरची पैज हरला पण १५ वर्षांनी का होईना त्याने जिंकून दाखवलंचं!
- पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये राहुल द्रविड स्कॉटलंडकडून खेळला होता.