युद्धात ठार केलेल्या पाटलाच्या मुलाला छत्रपतींनी आपलं नाव दिलं

सतरावे शतक संपले होते. मराठ्यांचा विनाश करायची प्रतिज्ञा करून दक्षिणेत आलेल्या औरंगजेब बादशाहचा मराठीत मातीतच मृत्यू आला होता. मुघल साम्राज्य भारतभर पसरवणारा, दगा करून स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांना पकडणारा, त्यांची हत्या घडवून आणणाऱ्या औरंगजेबाचा गर्व देखील मराठी मातीत गाडला गेला होता.

या अस्मानी वादळातही मराठ्यांनी ताराबाई महाराणीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तग धरला. चिवटपणे त्यांनी दिलेला लढा मुघल साम्राज्याच्या अंतास कारणीभूत ठरला.

स्वराज्याचे युवराज शंभुपुत्र शाहू महाराज तेव्हा मुघलांच्या कैदेत होते. दिल्ली काबीज करण्यासाठी निघालेल्या शाहजाद्याने जाण्यापूर्वी त्यांची सुटका केली. शाहू महाराज महाराष्ट्राकडे निघाले.

शाहू महाराजांच्या सुटकेनंतर मराठा सरदारांच्या मध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला.

शाहू महाराज युवराज होते, त्यांचा छत्रपतीपदाच्या गादीवर हक्क होता. तर महाराणी ताराबाई यांनी आपल्या पराक्रमाने ही गादी सांभाळली होती. त्यांनी आपला हक्क सोडण्यास नकार दिला होता.

दोन्ही बाजूनी माघार घेण्यास नकार दिला होता.

शाहू महाराज ऑगस्ट १७०७ रोजी खुलताबाद येथे पोहचले. त्यांनी आसपासचा प्रदेशात आपला अंमल प्रस्थापित केला. तिथून जवळच शिवणे येथे पारद नावाची गढी होती. या गावात शाहू महाराजांची माणसे गेली असता त्यांना विरोध झाला.

गढी मध्ये राहणारे गावचे पाटील सयाजी लोखंडे हे ताराराणीचे पक्षकर्ते होते.

त्यांनी शाहू महाराजांच्या सैन्यावर हल्ला चढवला. दोन्ही बाजूंमध्ये घनघोर युद्ध झाले. सयाजी पाटील या युद्धात मारले गेले.

या लढाईच्या निमित्ताने शाहू महाराजांनी आपल्या विरोधकांनी प्रसंगी कठोर पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही हा संदेश दिला होता.

शाहू महाराज तिथून निघाले तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी सुपुत्राचे दर्शन घेण्यासाठी प्रजा गोळा झाली होती.

अचानक या गर्दीतून एक महिला समोर आली आणि आपल्या छोट्या मुलाला शाहू महाराजांच्या पालखीमध्ये घातलं. ती सयाजी लोखंडे पाटील यांची विधवा होती आणि सोबत तिचा राणोजी हा ७ वर्षांचा मुलगा होता. रडत रडत ती म्हणाली,

“जे अन्यायकर्ते होते ते गेले यात याची काय चूक ?”

दिलदार शाहू महाराजांच मन द्रवलं.

त्यांनी त्यांना अभयदान तर दिलंच पण सयाजी लोखंडेच्या मुलाला त्यांनी आपला मानसपुत्र मानलं. आपल्या पहिल्या विजयाची आठवण म्हणून त्याला फत्तेसिंह हे नाव दिलं. आपलं छत्रपती घराण्याच आडनाव दिलं.

राणोजी लोखंडे पाटील शाहू महाराजांचा मानसपुत्र फत्तेसिंह भोसले बनला.

पारदहून शाहू महाराज साताऱ्याला आले. तिथे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व छत्रपती बनले.
फत्तेसिंह भोसले यांना शाहू महाराजांनी आपल्या मुलाची जागा दिली होती. फत्तेसिंह देखील साताऱ्याला आले. विरुबाई यांनी त्यांचे पालनपोषण केले.

फत्तेसिंह पराक्रमी व मुत्सद्दी निघाले.

शाहू महाराजांच्या प्रति त्यांच्या मनात अपार निष्ठा होती. बाळाजी विश्वनाथ भट, खंडेराव दाभाडे, पेशवा बाजीराव याच्यासह फत्तेसिंह यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. आपली तलवार गाजवली.

त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची मोहीम म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड. संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून रायगड मुघलांच्या ताब्यात होता. त्यांनी तो सिद्दीच्या हवाली केला होता.

बाजीराव व फत्तेसिंह या दोघांच्या पराक्रमामुळे दुर्गदुर्गेश्वर रायगड पुन्हा छत्रपतींच्या ताब्यात आला.

खुद्द भोसले घराण्याचा मानसपुत्र या मोहिमेत अग्रेसर असल्याचं कौतुक शाहू महाराजांना वाटलं.

फत्तेसिंह यांना त्यांनी सनद व अक्कलकोटची जहागीर दिली होती. राजमाता विरुबाई यांचे निधन झाल्यावर मुलगा या नात्याने उत्तरक्रिया फत्तेसिंह महाराजांनीच केले.

पुढे शाहू महाराजांच्या मृत्यूचा धक्का सहन न होऊन फत्तेसिंह भोसले यांचे देखील निधन झाले.

त्यांच्या वंशजांनी अक्कलकोटचे संस्थान सांभाळले. हा भोसले वंश छत्रपती घराण्याची एक वंशवेल म्हणून वाढला. अक्कलकोट एक वैभवशाली संस्थान म्हणून प्रसिद्धीस आले.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Pratik says

    याच पूर्वाश्रमीच्या लोखंडे पाटलांच्या आणखी दोन शाखा म्हणजे पिलीव,जि.सोलापूर येथील जहागीरदार भोसले,आणि राजाचे कुर्ले ता.सातारा, येथील राजे भोसले..

  2. अक्कलकोट संस्थानचा पूर्ण इतिहास कुठे मिळेल?आपल्याकडे असेल तर प्रसिद्ध करा.

Leave A Reply

Your email address will not be published.