एका क्षणात पोरगीचं भांड फुटलं आणि ५० हजार कोटींची कंपनी रस्त्यावर आली

एक १९ वर्षाची मुलगी एलिझाबेथ होलमेस. मेडिकल फिल्डमध्ये उतरती आणि जगात एक क्रांतीकारी बदल करणार असल्याची घोषणा करते. दोन थेंब रक्तातुन तब्बल २०० तपासण्या. ती आपल्या या योजनेवर सिलीकॉन व्हॅलीमध्ये काम करण्यास सुरुवात करते. ऑरॅकल, वॉलमार्ट यांसारख्या गुंवणूकदारांना चुना लावत ती अवघ्या १० वर्षात ९ युवा करोडपतींच्या पंगतीत जावून बसली.

पण २०१६ मध्ये वॉल स्ट्रीट जरनलच्या एका पत्रकाराने दिलेल्या एका बातमीनं तिचं भांड फुटलं न् ६० हजार कोटींची कंपनी एक क्षणात रस्त्यावर आली… कशी ते वाचा.

या थेरॉनॉस कंपनीचे कथा सुरु होते २००३ मध्ये.

कंपनीची संस्थापक, मालक आणि सीईओ असं सगळं काही एलिझाबेथ होम्स होती. लहानपणापासूनच एक हुशार आणि वेगवेगळे व्यवसाय करणारी फोकस्ड महिला. शाळेत असतानाही ती सी++ चे कंपायलर्स काही चायनीज शाळांना विकत होती.

पुढे वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये तिने प्रवेश घेतला आणि नव-नवीन उद्योगांच्या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली.

२००३ मध्ये विद्यापीठामधील काही प्राध्यापकांना तिने आपली एक कल्पना सांगितली. ती म्हणाली,

“मी एक अशी मशिन बनवु इच्छिते ज्यामध्ये दोन थेंब रक्तामध्ये जवळपास सगळ्या तपासण्या होतील. सोबत ही मशिन कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराची माहिती आधीच देवू शकेल. ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने मी या तपासण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचेल”

एलिझाबेथची ही आयडीया ऐकुन स्टॅनफर्डचे काही प्राध्यापक अक्षरशः उडाले.

त्यांना तिच्या या कल्पनेवर विश्वासच बसेना. रक्ताच्या दोन थेंबावर हे शक्य नसल्याचे ठाम पणे सांगितले. तसेच हे सगळे औषधशास्त्र आणि भौतिकशास्त्रांच्या नियमांच्या विरोधात असल्याचेही सांगितले. पण ती ही पुर्ण फोकस होती.

तिने उलट प्राध्यापकांनाच चार तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या.

तिच्या मते, जगात जेव्हा ही अशी क्रांतिकारी कल्पना जन्माला येते तेव्हा तिचा विरोधच होतो. पण एकदा यशस्वी झाली तर स्विकार होतो. तिने यासाठी आणखी काही प्राध्यापकांना गाठले आणि आपल्या प्लॅनमध्ये सामावून घेतले. एलिझाबेथने त्यांना विश्वास दिला की,

आपल्याला रक्ताच्या तपासण्यांमधील ही सगळी व्यवस्था बदलवायची आहे. या तपासण्या करण्यासाठी आपण अजूनही जुनेच तंत्रज्ञान वापरत आहे. त्यामुळे यात क्रांतिकारी बदलाची आवश्यकता आहे.

पुढे यासाठी तिने स्टॅनफर्डमधील शिक्षण अर्धवट सोडले आणि आपल्या कल्पनेवर लक्ष दिले.

यानंतर २००३ मध्ये तिने ‘रिअल टाईम क्युअर्स’ नावाच्या एका कंपनीची स्थापन केली.

पुढे थेअरपी आणि डायग्नोसिस या शब्दांवरुन कंपनीचे नाव थेअरॉनॉस ठेवले. काही दिवसांतच आपण दोन थेंब रक्तापासून २०० तपासण्या करणारे डिव्हाईस तयार केल्याची घोषणा केली.

तिच्या म्हणण्यानुसार

आपले हे डिव्हाईस पुर्णपणे यशस्वी काम करत आहे.

तसेच ह्या डिव्साईसच्या संबंधीतील सारे प्रयोग करताना आम्हाला थॉमस एडिसन यांच्यासारखेच अनेक अडचनींना सामोरे जावे लागले. अनेकदा अयशस्वी झालो. पण अखेरीस आम्ही हे डिव्हाईस बनवले. थॉमस एडिसन यांच्यावरुन प्रेरितच होवून आपण या डिव्हाईसचे नाव ‘एडिसन’ ठेवले असल्याचे ही सांगितले.

आता प्रश्न होता कंपनीच्या विश्वासार्हतेचा आणि त्यासाठी आवश्यकता होती गुंतवणूकदारांची.

यासाठी पण एलिझाबेथने पद्धतशीर काम केले. तिने पहिल्यांचा अशा गुंतणूकदारांना शोधले जे प्रतिष्ठीत आणि नावाजलेले असतील पण त्यांना मेडीकलच्या क्षेत्रातील ज्ञान मर्यादित असेल.

यातुन तिने ऑरॅकलचे संस्थापक आणि जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती लॅरी लिसन, वॉलमार्टचे मालक वॉल्टन कुटूंबीयांना गाठले. या बड्या बड्या उद्योजकांशी ती अगदी सहजतेने बोलायची. अगदी समोरच्याशी आय टू आय कॉनटॅक्ट करुन बोलू शकत होती. तिच्या या स्टाईलवरुन अनेकांना ती पुर्ण फोकस्ड आणि कमालीची कॉन्फिडंट वाटायची.

एलिझाबेथच्या याच स्टाईलवर या उद्योजकांनी विश्वास ठेवला आणि तिने आपल्या गोड आणि आत्मविश्वासु बोलण्याने या गुंतवणूकदारांकडून जवळपास ७० हजार कोटी रुपये कंपनीच्या पदरात पाडून घेतले.

आता तुम्ही म्हणाल या मोठ्या उद्योजकांनी तिच्याकडे चौकशी का केली नाही? तर केली होती. पण ही पोरगी खरचं हुशार होती. तिने मेडिकलमधील एका पळवाटेचा उपयोग केला. मेडीकलमध्ये ट्रेड सिक्रेट नावाची एक गोष्ट असते. यानुसार आपल्या एखाद्या उत्पादानाविषयीची गोपनीय माहिती कोणालाही न सांगण्याची सुट असते. अगदी गुंतवणूकदारांनाही.

एलिझाबेथने थेरॉनॉस कंपनीच्या संचालक मंडळावर पॉवरफुल लोकांना घेतले होते.

यामध्ये स्टॅनफोर्डचे काही प्राध्यापक आणि अमेरिकेतील काही सेक्रेटरी होते. यामुळे मजबूत बॉडी वाटायची. तसेच तिने गुंतवणूकदारांना सांगितले की अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय अफगाणिस्तान मध्ये आपले उत्पादन वापरते. आणि तिथून आपल्याला १० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो.

गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकल्यानंतर तिने काही राज्य सरकारांना संपर्क केला आणि आपल्या डिव्हाईस बद्दल सांगितले.

तसेच सरकारने जर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय रक्ताच्या तपासण्या करण्याची परवानगी दिली तर पुढे जावून होणाऱ्या आजारांची आधीच माहिती मिळेल. आणि यातुन आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. तिच्यावर विश्वास ठेवत अमेरिकेतील एरिझॉना सरकारने यासाठी परवानगी दिली.

२००३ पासून सुरु झालेल्या या कंपनीचा प्रवास २०१५ पर्यंत अगदी व्यवस्थित चालू होता.

कंपनीची किंमत आता ९० हजार कोटी रुपयांची बनली होती. त्यावेळी ती अमेरिकेतील खूप मोठी कंपनी बनली होती. २०१५ च्या फॉर्च्युन मासिकाने एलिझाबेथच्या या यशस्वी घौडदौडला सलाम केला आणि आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले. तसेच त्यावर्षी ती जगातील ९ नंबरची स्वरंप्रेरित युवा करोडपती बनली. फोर्बच्या यादीत ही तिचे नाव आले. त्याचवर्षी थेरॉनॉस कंपनीचा अॅसबायोने बायोसेन्स कंपनी ऑफ द ईयर ने गौरव केला.

२०१६ मध्ये झाली भांडाफोड :

थेरॉनॉसची वाटचाल चालूच होती. पण वॉल स्ट्रीट जरनलच्या एका चाणाक्ष पत्रकाराला संशय आला. त्यांने याची पाळमुळं खणण्याचे ठरवले. त्याने पुराव्यानिशी सांगितले की थेरॉनॉजकडे असे कोणतेही डिव्हाईस नाही की ज्यामुळे २ थेंब रक्तामध्ये २०० चाचण्या होतील. थेरॉनॉस आपल्या सगळ्या चाचण्या या रोज वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक मशिनवरतीच करत आहे. यासंबंधीची एक मालिकाच त्याने प्रकाशित केली न् सगळ्यांचे डोळे खाडकन् उघडले.

यानंतर अनेक रेग्युलेटर्स आणि गुंतवणूकदार कंपन्यांनी चौकशी सुरु केली. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाला कळाले की थेरॉनॉस करत असलेल्या तपासण्यामध्ये अनियमीतता आहे. त्यानंतर प्रशासनाने लॅब चालवण्यास बंदी घातली.

यानंतर गुंतवणूकदारांनाही समजले की आपल्यासोबत धोका झाला आहे.

पण त्यानंतर ही ती लपून बसली किंवा पळून गेली नाही.

खोट बोल पण रेटून बोल या म्हणीप्रमाणे ती अजून ही रेटून बोलत होती. ती म्हणायची जेव्हा तुम्ही काही तरी क्रांतिकारी गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर सुरुवातीला लोक तुम्हाला त्रास देतात, भांडतात, बदनाम करतात. पण त्यानंतरच तुम्ही यशस्वी होता. पारंपारिक गोष्टी बदलने सोपे नसते.

यानंतर ही केस अमेरिकेच्या सिक्युरीटी आणि एक्सचेंज कमिशनने तपास केला. आणि एलिझाबेथ ने फ्रॉड केला असल्याचे सांगितले.

थेरॉनॉसमध्ये काम करणाऱ्यांना देखील असे कोणतेही यंत्र नसल्याचे माहित होते परंतु संचालक मंडळाच्या दबावामुळे आणि भितीमुळे ते काहीच करु शकत नव्हते. पण पुढे कंपनी बंद झाली आणि ८०० कामगार बेरोजगार झाले. कंपनीच्या मालक एलिझाबेथ आणि सीईओ रमेश बलवानी या दोघांवर गुन्हा दाखल केला.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.