नदालला हरवून फेडररने अकरा वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केला आहे.

६ जुलै २००८ विम्बल्डन ग्रँडस्लॅम फायनल.

जगातला नंबर वनचा टेनिस प्लेअर रॉजर फेडरर आणि नंबर दोनचा प्लेअर राफेल नदाल टायटलसाठी अमोरासमोर होते. प्रचंड गर्दी झाली होती. दोन्ही साईडचे फॅन्स एखाद्या युद्धाच्या तयारीने आले होते. साधसुधं नाही तर महायुद्धच होते ते. टेनिस जगाचा सम्राट कोण हे ठरवणारं महायुद्ध.

या युद्धाला मोठी पार्श्वभूमी देखील होती.

फेडरर २७ वर्षांचा झाला होता. सुरवातीला काही वर्षे त्याने एकहाती टेनिस वर वर्चस्व राखले होते पण गेले काही वर्षे त्याच्या खुर्चीला चलेंज देणारा खेळाडू आला होता तो म्हणजे राफेल नदाल. नुकताच त्याने २२ वर्षे पूर्ण केली होती. टेनिसला जसा स्टॅमीना लागतो, जेव्हढी स्पर्धा असते त्यामानाने फेडररच्या कारकिर्दीची संध्याकाळ सुरु झाली होती आणि नदाल उगवता सूर्य होता.

२००५ पासून नदाल फ्रेंच ओपनमध्ये कधी हरला नव्हता पण विम्बल्डन व इतर ठिकाणी अजून त्याला यश मिळायचं होतं. नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये तर नदालने फेडररला एकतर्फी सरळ सेटमध्ये हाणले होते. फेडररला या अपमानाचा बदला घ्यायचं होता. त्याहूनही जास्त त्याच्या फन्सना तो बदला घ्यायचा होता. तो ते सहज घेईल असे वाटत होते कारण जस नदाल साठी फ्रेंच ओपन तसं फेडररसाठी विम्बल्डन हे घरचं मैदान असल्यासारखं होत. तो तिथे गेली पाच वर्षे अजिंक्य होता.

विम्बल्डन फायनल ही आजवर झालेल्या टेनिस मधील सर्वात जबरदस्त मॅच असणार आहे हे उघड गुपित होतं. रणांगण भरल होत.

खरोखर मॅच सुरु व्हायला मात्र उशीर झाला. इंग्लंडमधल्या प्रथेप्रमाणे वरूणराजाने हजेरी लावली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या दोन सेटमध्ये नदालने ६-४, ६-४ असा विजय मिळवला. आणखी एक सेट जिंकला की विम्बल्डन नदालच्या खिशात. पण फेडरर असा सहजासहजी हर मानणाऱ्यातला नव्हता. पुढच्या सेटमध्ये त्याने कमबॅक केले होते. तो ५-४ असा पुढ होता मात्र परत पाउस आला.

तब्बल ८० मिनिटाचा ब्रेक झाला. परत लढाई सुरु झाली.

प्रत्येक पोईंटसाठी फेडररला झगडाव लागत होतं. घोड्यासारखं कोर्टच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या तरण्या नदालच्या एनर्जीशी मॅॅच कराव लागत होतं. तरी अगदी हातघाईला आलेल्या या सामन्यात त्याने ७-६, ७-६ असे दोन सेट जिंकले. चौथ्या सेटच्या तर शेवटी दोनवेळा नदाल ला मॅच संपवण्याची संधी मिळाली होती. सगळ जग काही क्षणासाठी थांबल होतं. फेडरर साठी प्रार्थना म्हटल्या जात होत्या. पण अखेरीस फेडररने दोन वेळा मॅचपोईंट वाचवले. मॅच पाचव्या सेट मध्ये गेली. जवळपास अंधार पडत आला होता.

टेनिस विश्वात आज पर्यंत सगळ्यात जास्त पाहिला गेलेला हा सेट आहे. हा सेट सुद्धा तोडीसतोड झाला. अत्यंत चुरशीचा झालेल्या या सेटमध्ये अखेर नदालने फेडररला नमवलेचं. त्याने अखेरचे दोन मारलेले फोरहँडचे फटके जगातील सगळ्यात भारी समजले जातात.

शेवटचा फटका मारल्या मारल्या नदाल खाली पडला. त्याला कळाले होते आपण टेनिसमधल्या आजवरच्या सर्वोत्तम खेळाडूला नमवले आहे. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते तर फेडररच्या फॅन्सच्या डोळ्यात दुःख होतं. नशिबाने देखील त्याला साथ दिली नव्हती. सगळ्यांना वाटलं हाच तो दिवस जिथून फेडरर हे नाव टेनिस विश्वातून गायब होत जाणार.

पण तसं घडलं नाही.

आज त्या घटनेला ११ वर्षे झाली. कित्येकदा लोक म्हणाले फेडरर आता फायनली संपला. २०१० मध्ये खुद्द फेडररला सुद्धा वाटलं होतं की आपण आता बास करू पण काय कुणास ठाऊक त्याने निवृत्ती घेतली नाही. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याला व्हिलचेअरवरून टेनिस कोर्टवर आणावं लागलं असत. तो लढतच राहिला. परत वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतच राहिला. कित्येक विक्रम त्याने मोडले.

 परवा झालेल्या विम्बल्डन सेमी फायनल मध्ये ३७ वर्षाच्या फेडररने नदालला सहज नमवले. पाहिलं तर फेडरर अतिशय नम्र आहे, तो स्वतः कधी म्हणणार नाही पण या सामन्याच्या निमित्ताने त्याने अकरा वर्षापूर्वीचा बदला घेतला आहे.

आज त्याची नोव्हाक जोकोविच बरोबर फायनल आहे. आज जिंको अथवा हरो तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल हे राहणारच आहे. जिंकला तर त्याच्या शिरपेचात ९ व्या विम्बल्डन ग्रँडस्लॅमची भर पडेल इतकच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.