स्विट्झरनं धक्के खाल्ले, म्हणून आज महिला मॅरेथॉनमध्ये पळू शकतात…
थंडीचे दिवस आहेत… सकाळ सकाळ उठून जॉगिंग-बिगिंगला गेलाच, तर आजूबाजूला बघा. जितकी पोरं पळताना दिसतील, तितक्याच पोरीही. आता कुणी का असंना. लॉकडाऊनमुळं आणि बसून बसून वाढलेली पोटं आत घेणं, सगळ्यांनाच गरजेचं आहे. मुली सहजपणे रस्त्यानं पळताना आपल्याला दिसतात, पण हे झालं आजचं चित्र. यामागं लय मोठा इतिहास आहे आणि एका मुलीनं खाल्लेले धक्केही.
आता जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात मॅरेथॉन स्पर्धा होते. इंटरनॅशनल स्पर्धा, हाफ मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉन असे अनेक प्रकार आता हिट झाले आहेत. या स्पर्धांमध्ये सर्व वयोगटांच्या महिला आणि पुरुष धावू शकतात. पण सुरुवातीपासून अशी परिस्थिती नव्हती.
मॅरेथॉनची सुरुवात झाली, १८९६ च्या ऑलिम्पिक्सपासून. मात्र जवळपास ७० वर्ष मॅरेथॉनमध्ये धावायला महिलांना परवानगी नव्हती. त्यानंतरही, परवानगी देण्यात आली नाही… तर ती मिळवली.. एका महिलेनं, तिच्या धावण्यामुळं.
तारीख होती १९ एप्रिल १९६७. बोस्टनमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला इतिहासही फार मोठा. कारण स्पर्धा सुरू झाली होती १८९७ मध्ये. स्पर्धेची तयारी झाली, सगळे ‘पुरुष’ स्पर्धक सुरुवातीच्या रेषेपाशी जमले. यात एक नाव होतं, KV Switzer.
या नावामुळं स्पर्धक पुरुष आहे की महिला हे पटकन लक्षात आलं नाही. ते लक्षात आलं ती थोडं अंतर धावल्यावर. ती स्पर्धक होती, कॅथरीन स्विट्झर. मॅरेथॉन धावणारी पहिली महिला…
कॅथरीनचा जन्म झाला जर्मनीमध्ये. मात्र ती आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाली. तिला पहिल्यापासूनच खेळाची आवड होती, पण मॅरेथॉन धावण्याची ठिणगी पेटली, ती कोचनं मारलेल्या एका टोमण्यामुळं. सरावावेळी कोच तिला म्हणाला, ‘मुलींना मॅरेथॉन धावणं जमायचं नाही. त्या अत्यंत नाजूक आणि दुर्बल असतात. पळता पळता त्यांचं गर्भाशय बाहेर पडलं तर…’ हा टोमणा कॅथरीनच्या चांगलाच जिव्हारी लागला, तिनं ठरवलं की फक्त आपल्या कोचलाच नाही, तर जे जे महिलांना दुर्बल समजतात त्यांना सगळ्यांना खोटं ठरवायचं.
KV Switzer हे नाव आणि २६१ हा टीशर्ट नंबर घेऊन ती स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचली. तिनं धावायला सुरुवातही केली. ती काही अंतर धावली आणि मॅरेथॉनचा अधिकारी जॉक सेम्पल तिच्यामागं धावला. त्यानं तिला जबरदस्ती धक्का देत ढकलण्याचा प्रयत्न केला. तिला रेसच्या बाहेर काढण्यासाठी त्यानं कॅथरीनचा टीशर्ट नंबर फाडण्याचा प्रयत्नही केला. पण कॅथरीन बधली नाही. तिनं ४ तास २० मिनिटं धावत मॅरेथॉन पूर्ण केली.
इतिहास लिहिला गेला… इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेनं मॅरेथॉन पूर्ण करत नवी वाट आखली.
या सगळ्यामध्ये तिची साथ दिली… तिच्या बॉयफ्रेंडनं.
कॅथरीन सोबत कोणताही चुकीचा प्रकार घडू नये आणि तिनं हि स्पर्धा पूर्ण करावी याची कॅथरीन इतकीच दक्षता तिच्या बॉयफ्रेंडनेही घेतली. ‘रेस पूर्ण करण्याचा आपला विचार नव्हता. मी फक्त काही अंतर धावणार होते. मात्र रेसच्या अधिकाऱ्यानं मला धक्का दिला आणि मी निर्धारानं रेस पूर्ण केली,’ असं कॅथरीन सांगते.
बरं एक मॅरेथॉन धावून ती थांबली नाही. तिनं न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये विजय मिळवला. ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉनचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले. तिनं पाया घातलेल्या संस्थेनं ही मागणी लाऊन धरली आणि १९८४ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये महिला मॅरेथॉनचा समावेश झाला.
आजही तिचा २६१ जर्सी नंबर हा इतिहास बनला आहे, तिची बोस्टन मॅरेथॉनमधली ही धाव ही महिलांचा आवाज ठरली. त्या चार तास ३० मिनिटांत कॅथेरीननं लिहिलेला इतिहास अजरामर ठरला आहे. फक्त मॅरेथॉन धावणाऱ्या महिलांसाठी नाही, तर जगातल्या प्रत्येक महिलेसाठी!
हे ही वाच भिडू:
- स्पेस मॅरेथॉनमध्ये धावण्याचा सुनीता विलियम्सने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता
- स्वतः पंतप्रधान राजीव गांधी पुण्यात मॅरेथॉन धावायला उतरले..
- कधीकाळी तो मुंबईचा गॅंगस्टर होता, आज तो प्रसिद्ध धावपटू आहे
English Summary: Even today, Kathrin Switzer’s 261 jersey number has become history, her run in the Boston Marathon became the voice of women. The history written by Catherine in those four hours and 30 minutes is immortal. Not just for women running marathons, but for every woman in the world!
web title : Female Marathon History Kathrine Switzer first woman marathon runner