जॉर्ज फर्नांडिस यांचा सिक्रेट प्लॅन फसला नाही तर अडवाणी २००८ साली पंतप्रधान झाले असते

गोष्ट आहे २००८ सालची. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान होते. त्यांनी अमेरिकेबरोबर अणुकरार करायचा घाट घातला होता. यावरून डावे पक्ष नाराज झाले व त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. मनमोहनसिंग यांचे सरकार अस्थिर झाले. त्यांना लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची वेळ आली.

काँग्रेसकडे बहुमत नव्हते आणि भाजप त्यांचे सरकार पडणार याची अनेक राजकीय पंडितांना खात्री होती.

तेव्हा भाजपचे सर्वेसर्वा लालकृष्ण अडवाणी हे होते. वाजपेयींनी वय झाल्यामुळे राजकीय जीवनातून पूर्णपणे निवृत्ती घेतली होती.

या आणीबाणीच्या वेळी आडवणींना भाजपचे चाणक्य कै. प्रमोद महाजन यांची आठवण येत होती. पक्ष फोडणे, नवीन मित्रपक्ष जोडणे अशा कामात जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी हे तेवढे धूर्त नव्हते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं अजून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला नव्हता.

या वेळी काँग्रेस फोडायची जबाबदारी उचलली होती समता पक्षाच्या जॉर्ज फर्नांडिस यांनी.

एकेकाळी मुंबईत बंद सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस हे समाजवादी विचारसरणीचे असूनही भाजपला साथ देतात याचं अनेकांना आश्चर्य वाटायचं. पण वाजपेयी आणि अडवाणी यांच्या मित्रत्वाने फर्नांडिस यांना जिंकलं होतं.

त्यांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी एक सिक्रेट प्लॅन बनवला होता.

झालं काय होत की या निवडणुकीपूर्वी इलेक्शन कमिशनने लोकसभा मतदारसंघाची पुनर्रर्रचना केली होती. यात अनेक मतदारसंघ बदलले होते, काही ठिकाणची आरक्षणे उठली होती, काही खुल्या मतदारसंघात आरक्षण पडलं होतं, काही खासदारांचे अख्खेच्या अख्खे मतदारसंघ गायब झाले होते.

फर्नांडिस यांनी याचाच फायदा उठवायचं ठरवलं.

त्यांनी लोकसभा पुर्नररचनेत आरक्षण पडल्यामुळे अथवा इतर काही कारणांनी ज्यांना तिकीट मिळाले नाही अशा काँग्रेसच्या शक्तिशाली नेत्यांची यादी बनवली. ती यादी भाजपकडे सोपवली.

आता सामदामदंड भेद वापरून हे खासदार फोडायचे असा हा सिक्रेट प्लॅन होता.

अडवाणी यांच्याकडे ही यादी आली तेव्हा पक्ष फोडाफोडीचे राजकारण करावे का हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता. भाजपच्या कार्यकारणीपुढे हा विषय ठेवण्यात आला. लवकरच पार्टीचे प्रमुख नेता यावर निर्णय घेणार होते.

पण दुर्दैव दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर काँग्रेस फोडायची सगळीच्या सगळी योजना छापून आली.

भाजपला हा खूप मोठा झटका होता. काँग्रेस फ्लोअर मॅनेजर सतर्क झाले व त्यांनी आपले खासदार फुटू नयेत म्हणून खबरदारी घेतली. बाकी काय काय बरंच घडलं पण तरीही पुढे मनमोहनसिंग यांनी अविश्वास ठराव जिंकला. त्यांचे पंतप्रधानपद टिकले.

अस म्हणतात की हे सगळं घडलं अरुण जेटली यांच्या मुळे.

अरुण जेटली हे वाजपेयी यांच्या काळापासूनचे मोठे नेते. दिल्लीत त्यांनी मोठमोठी मंत्रीपदे उपभोगली होती. मीडिया वर्तुळात त्यांची पकड होती.

भाजपमधल्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार जेटलींना जर एखादी योजना पसंत पडली नाही तर ते विरोध करण्यासाठी अथवा आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी मीडियाचा वापर करायचे. यातूनच त्यांनी काँग्रेस फोडण्याची फर्नांडिस यांची स्कीम टाइम्स ऑफ इंडिया पर्यंत पोहचवली आणि सगळा प्लॅन बारगळला.

आणि अडवाणी यांची पंतप्रधान बनण्याची संधी हुकली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.