पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना २ हजार दिले आणि खतांचे दर ५८ टक्क्यांनी वाढवले… 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा’ २ हजार रुपयांचा आठवा हफ्ता ९.५ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला.

आता ही योजना राबवण्यामागचा सरकारचा उद्देश काय तर देशातील गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी, त्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्यासाठी निधी मिळावा.

पण सध्या या निधीचा काहीच फायदाच मिळणार नसल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याला कारण म्हणजे मागच्या २ दिवसांपासून सरकारनं खताच्या किमती तब्बल ५८ टक्यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान एका हाताने पैसे देतात आणि दुसऱ्या हाताने ते काढून घेतात असा आरोप देखील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. 

नेमका काय विषय आहे?

हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला २ महिने मागं जावं लागेल. मार्च महिन्याच्या सुरुवातीला देशात खतांच्या किमती वाढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. खुद्द विक्रेते देखील शेतकऱ्यांना या संबंधित माहिती देऊ लागले, आणि ती देखील तब्बल ५०० ते ७०० रुपयांनी वाढणार असल्याचं सांगितलं गेलं.

यामागेच कारण विचारल्यावर व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं की,

आंतरराष्ट्रीय बाजारात खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत ५०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसचं केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत सबसिडी बाबतीत निर्णय घेण्यात न आल्याने खतांच्या किमती वाढणार आहेत.

यानुसार कृषी खात्यांकडून याबाबत खत उत्पादक कंपन्यांना विचरणा करण्यात आली. त्यानुसार दरवाढ करणार असल्याचं अधिकृत माहिती देणारं पत्र त्यावेळी कोणत्याही कंपनीने सादर केलं नाही. उलट ‘इफको’ने मात्र दरवाढ होणार नसल्याचं शासनाला स्पष्टपणे कळवलं.

मात्र त्यानंतर देखील या दरवाढीच्या चर्चा चालूच राहिल्या.

मात्र अखेरीस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ७ एप्रिल रोजी खुद्द ‘इफको’नेचं दरवाढ करत असल्याचं जाहिर केलं. तसं त्यांनी अधिकृत पत्र देखील काढलं.

IFFCO Fertiliser Price chart

मात्र त्यानंतर देशभरातून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. कोरोना काळात आधीच उत्पादित मला भाव मिळतं नव्हता त्यात कंपन्यांकडून ही अशी भरमसाठ वाढ केल्यामुळे कंपन्यांवर आणि सरकारवर टीका होऊ लागली.

त्यानंतर अवघ्या २४ तासात हा निर्णय मागं घेण्यात आला. तसं इफकोचे सचिव डॉ.यू.एस. अवस्थी यांनी ट्विट याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले होते,

इफकोनं माध्यमांमध्ये डीएपीच्या किंमती वाढवल्याचा ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार आहेत. आमच्याकडे ११.२६ लाख मेट्रिक टन रासायनिक खत आहे. शेतकऱ्यांना डीएपी जुन्या किंमतीला मिळेल, तसचं ज्या पोत्यांवर नव्या किंमती छापल्या आहेत ते खत विक्रीसाठी नाही.

मात्र यावरून निवडणुका चालू असल्यानं हा निर्णय बदलला असल्याचा आरोप इफकोवर करण्यात आला, त्यावर कंपनीने हे आरोप फेटाळले होते.

त्यानंतर ९ एप्रिल रोजी केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी खत उत्पादकांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर स्पष्ट केलं कि,

सध्याच्या स्थितीत कोणत्याही रासायनिक खताच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तसचं त्याबाबत माहितीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे खतांच्या किमतीत वाढ होणार नाही हे त्यावेळीच स्पष्ट झालं होतं.

मात्र आता जवळपास १ महिन्यानंतर खताच्या ज्या किमती पूर्वी वाढवल्या होत्या त्याच किमतीने सध्याची विक्री पुन्हा सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ करण्याचा निर्णय झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

रासायनिक खतांचे जुने व नवीन दर

खतांचा प्रकार,  जुने दर,   नवीन दर

(इफको)

डीएपी – ११८५ – १९००

१०:२६:२६ – ११७५ – १७७५

१२:३२:१६ – ११९० – १८००

२०:२०:० – ९७५ – १३५०

आयपीएल

डीएपी – १२०० – १९००

२०:२०:० – ९७५ – १४००

पोटॅश – ८५० – १०००

महाधन

१०:२६:२६ (स्मार्टटेक) – १२७५ – १९२५

२४:२४:० – १३५० – १९००

२०:२०:०:१३ – १०५० – १६००

जीएसएफसी (सरदार)

१०:२६:२६ – ११७५ – १७७५

१२:३२:१६ – ११९० – १८००

२०:२०:०:१३ – १००० – १३५०

डीएपी – १२०० – १९००

सुपर फॉस्फेट – ४०० – ५००

 सुपर फॉस्फेट (पावडर) – ३७० – ४७०

या वाढलेल्या किंमतीबाबत शेतकऱ्यांना विचारलं असता त्यांनी काहीश्या उद्विग्न प्रतिक्रिया ‘बोल-भिडू’शी बोलताना दिल्या.

कराड तालुक्यातील किवळ गावच्या गजानन जाधव हे शेतकरी म्हणाले,

काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दर वाढवले आहेत. आता खताच्या किमती वाढवलेत. त्यामुळे आता इथून पुढं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ कसा बसवायचं हे शासन कर्त्यांनीच सांगावं.

तर संगमेनरमधील मुरलीधर बाबर म्हणाले, 

मोदींनी २ हजार आज आम्हाला दिलेत. पण हे मदत म्हणून दिलेत कि वाढलेली खत त्या दरात खरेदी करायला दिले आहेत, तेच समजत नाही. हे म्हणजे एका हातानं द्यायचे आणि दुसऱ्या हातानं काढून घ्यायचे.

मे महिना शेतकऱ्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा 

राज्यात सर्वसामान्यपणे दिसणार चित्र म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरु दुझाला कि सऱ्या आठवड्यात पेरणी सुरू होते. त्यामुळे मे महिन्यात शेतकरी आपल्या शेतातील काड्या, फने, नांगरणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यात करण्यात येणारी कामे करायला सुरुवात करतो.

वेळेवर गडबड होऊ नये म्हणून मे महिन्याच्या पंधरवड्यापासून बी-बियाणं, खताची खरेदी करून ठेवतो. त्यामुळे एव्हाना अनेकांनी दुकानदाररांकडं खत आणि बियाणांची ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.