एका वॉचमनच्या आयडियाने तयार झाला ‘ देश को जोडनेवाला फेविकॉल’ ब्रँड…

सलमान भाईच्या एका पिच्चरमध्ये एक गाणं होतं बघा,

मेरे फोटो को सिने से यार

चिपकाले सैय्या फेविकॉल से …..

हे गाणं सलमान भाईने खास फेविकॉल कंपनीची रीतसर परवानगी काढून शूट केलं होतं. कारण मागच्या एका पिच्चरमध्ये झंडू बाम शब्दावरून भाई गोत्यात आले होते. पण फेविकॉल कंपनीने या गाण्यातून होणारी पब्लिसिटी लक्षात घेता या गाण्याला परवानगी दिली होती.

फेविकॉल ब्रॅण्डची स्टोरी पण लय इंटरेस्टिंग आहे भिडू. टीव्हीवर फेविकॉल वाले जितक्या दणकून जाहिराती करतात त्यामागे खूप कष्ट आहेत. आज आपण फेविकॉल ब्रँड कसा तयार झाला ते पाहू, म्हणजे जितक्या गोष्टी तुटल्या त्या सगळ्या फेविकॉलने जोडल्या म्हणता येईल.

बलवंत पारेख यांनी पीडिलाइट हा ब्रँड तयार केला. पीडिलाइट नाव ऐकलं पण पीडिलाइट म्हणजेच फेव्हिकॉल. बलवंत पारेख जन्म १९२५ साली गुजरातमधल्या भावनगरमध्ये झाला. गावामध्येच त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. घरची परिस्थिती चांगली होती.

आज जसं फॅड आहे ना कि भावा इंजिनिअरिंग कर लय स्कोपय आयुष्यात… तसंच त्यावेळी वकिली करण्याचं फॅड होतं, वकील झाला म्हणजे बसून पैशे कमवशील.  मग घरचे बलवंत पारेख यांना म्हणाले कि तू पण वकिली कर. वकिली करण्यासाठी लॉ कॉलेज मुंबईला पाठवण्यात आलं.

अभ्यास करण्यात तर मन काय लाग नव्हतं, हे आपल्याला काय जमणार हे त्यांना बहुधा बराच काळ आधी लक्षात आलं होतं. त्याच वेळी महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरु केलं होतं. संपला विषय ! बलवंत पारेखांनी अभ्यास सोडून या आंदोलनात उडी घेतली.

घरच्यांना कळलं कि पोरगं भरकटलंय, वकिली करायची सोडून क्रांतिकारक बनायला चाललंय. मग क्रांती बाजूला ठेव म्हणून घरच्यांनी परत गुजरातला बोलावून घेतलं. शिक्षणाने नाही तर लग्नाने तरी सुधारेल म्हणून घरच्यांनी लग्न लावून दिलं.

आता घरादाराची , बायकोची जबाबदारी अंगावर पडेल म्हणून चांगला अभ्यास करून वकील होऊन मुलगा सेटल होईल म्हणून घरच्यांनी पुन्हा त्यांना मुंबईला पाठवलं. बलवंत पारेख यांनी डिग्री पूर्ण केली वकील झाले, पण कधी वकिलीची प्रॅक्टिस करण्यासाठी कोर्टात गेले नाही.

त्यांना व्यवसाय करायचा होता. घरच्यांनी काय त्यांना व्यवसाय करण्यासाठी एक रुपयाही दिला नव्हता. आता पैसे मिळावे म्हणून ते एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला लागले , तिथे दिवसभर ते डाईंगची कामं करू लागले. नंतर हे काम सोडून त्यांनी एका लाकडाच्या व्यापाऱ्याकडे वॉचमनचं काम धरलं.

आधीच्या कामापेक्षा इथे कमी पगार होता. हे इतके कमी पैसे होते कि त्यातून ते बायकोसोबत घर घेऊन राहू शकत नव्हते. म्हणून त्यांनी त्या लाकडाच्या गोदामात कुटुंबासोबत दिवस काढले. इथे त्यांनी हा व्यवसाय चांगला ओळखला, बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या. 

इथे त्यांची ओळख एका मोहन नावाच्या माणसाशी झाली. बळवंत पारेख यांची काम करण्याची वृत्ती पाहून त्याने त्यांना काही पैसेही देऊ केले. आता पारेख यांनी या पैशातून सायकल, कलर, सुपारी या गोष्टींचा माल परदेशातून इम्पोर्ट केला. परदेशातला हा माल ते भारतात विकू लागले.

यातून त्यांना चांगला नफा होऊ लागला आणि पैसेही वाचू लागले. या कामात त्यांनी त्यांचा भाऊ सुशील यालाही जोडुन घेतले. १९५४ साली त्यांनी पेपर डाईंग, इमल्शन, इंडस्ट्री केमिकल या गोष्टींच्या ट्रेनींग आणि मॅन्युफॅक्चरिंग साठी पारेख डाय चेमिकल इंडस्ट्री नावाने एक फर्म सुरु केले. 

सुरवातीच्या काळातच त्यांनी ठरवलं होत कि देशातल्या सुतार लोकांच्या भल्यासाठी काहीतरी काम करायचं. यात सुतार लोकांची मोठी अडचण होती ती लाकूड चिटकवण्याची किंवा जोडण्याची. आधी हि लाकडं जोडण्यासाठी जनावरांच्या चरबीचा उपयोग केला जायचा. या चरबीपासून तयार झालेला चिकट द्रव्य निकृष्ट होता.

आता जेव्हा हि चरबी उकळली जायची तेव्हा त्याचा भयंकर वास यायचा. यावर उपाय म्हणून बलवंत पारेख यांनी बऱ्याच प्रोसेस नंतर सिन्थेटिक केमिकल पासून तयार केलेला चिकट द्रव्य किंवा डिंक तयार केला. ज्याने लाकूड सोप्या पद्धतीने चिटकवली जात.

१९५९ साली कंपनीचं नाव पीडिलाइट झालं होतं. या ब्रँड अंतर्गत सुवासिक आणि उत्कृष्ट दर्जाचे डिंक तयार केले गेले ज्याचं नाव ठेवलं फेविकॉल. या नावातला कोल म्हणजे दोन गोष्टींना जोडणे. लोकांच्या समस्येवर फेविकॉल उपाय ठरू लागल्याने आपसूकच त्यांची भयंकर चर्चा झाली. 

आज घडीला या कंपनीचं मार्केट तुम्ही बघू शकता. या ब्रॅण्डला स्पर्धा देणार कुणीही नाही. साध्या साध्या जाहिरातीतून हि कंपनी लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली आणि लोकप्रिय झाली.

नंतर या कंपनीने एम सील, फेवी क्विक , डॉ. फ़िक्सिट अशा प्रकारची अणे प्रोडक्ट बाजारात आणली. २००६ साली हि कंपनी अगदी परदेशातही पोहचली. यु एस, इजिप्त, थायलँड, बांगलादेश अशा अनेक देशांमध्ये आपल्या ब्रॅण्डची फॅक्ट्री सुरु केली.

आज घडीला ८०००० करोडची उलाढाल हि कंपनी करते. ५००० लोकांना रोजगार हि कंपनी देते. बलवंत पारेख यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव मधुकर पारेख सध्या या ब्रँडचे सर्वेसर्वा आहे.   

हे हि वाच भिडू :

1 Comment
  1. सुमित says

    ८०,००० हजार कोटी कुठून आले भिडू? मार्च २०२१ चे लेखापरीक्षित नफा तोटा पत्रक एकूण उलाढाल रु. ७२९२ कोटी दाखवतो. तेव्हा माहिती जरा तपासून घेणे

Leave A Reply

Your email address will not be published.