फिडेल कॅस्ट्रोला जाणून घ्यायचं होतं जगातले अजिंक्य समजले जाणारे हे गोरखा योद्धे कोण आहेत ?

गोष्ट आहे १९८२ सालची. भारतात पुढच्या वर्षी अलिप्त राष्ट्रगट चळवळ म्हणजेच नामचे संमेलन भरणार होते. याचे सेक्रेटरी जनरल पद देण्यात आलं होतं आयएफएस ऑफिसर नटवरसिंग यांच्या कडे. पुढे जाऊन भारताचे परराष्ट्रमंत्री बनलेले नटवरसिंग हे त्याकाळात इंदिरा गांधींच्या विश्वासातले अधिकारी मानले जायचे.

परराष्ट्र धोरणाचा त्यांचा अभ्यास मोठा होता. पंतप्रधानांच्या परदेशी दौऱ्यात त्यांच्यासोबत नटवरसिंग याना विशेष स्थान असायचे. याच मुळे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भरणाऱ्या नामच आयोजन त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापूर्वी यापूर्वी नाम संमेलन जिथे भरलं होत त्या क्युबाला नटवरसिंग यांनी भेट दिली.

तिथल्या अधिकाऱ्यांना भेटून आयोजनाबद्दल काही टिप्स मिळतील म्हणून नटवरसिंग क्युबन राजधानी हवाना येथे दाखल झाले. हि काही त्यांची अधिकृत शासकीय भेट नव्हती पण भारत व क्युबा संबंध त्याकाळात अतिशय चांगले होते यामुळे तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नटवरसिंग यांना लागेल ती मदत केली व उत्तम सहकार्य केले.

जेव्हा नटवरसिंग परत निघणार होते तेव्हा त्यांना अचानक कळलं कि तिथले राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी त्यांना भेटीसाठी बोलावलं आहे. नटवर सिंग यांना आश्चर्य वाटलं कि आपण तर त्यांच्या भेटीची वेळ मागितली नव्हती मग अचानक कस काय बोलवण आलं ? अतिशय संकोचाने ते राष्ट्राध्यक्षांच्या भेटीसाठी गेले.

फिडेल कॅस्ट्रो म्हणजे एकदम दिलदार नेता. ते इंदिरा गांधींना आपल्या छोट्या बहिणीप्रमाणे मानायचे. पंडित नेहरूंचे त्यांच्यावर डोंगराएवढे उपकार होते. याची त्यांनी जण ठेवली होती. इंदिरा गांधींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला काही कमी पडू नये यासाठी जातीने लक्ष द्यायचं म्हणून त्यांनी नटवरसिंग यांना भेटायला बोलावून घेतलं होतं.

नटवरसिंग त्यांच्या ऑफिस वर गेले. हातात क्युबन सिगार घेतलेलं कॅस्ट्रो यांचं भारदस्त व्यक्तिमत्व पाहून त्यांना दडपणच आलं होतं.

अनेक संकटातून क्रांतिकारी लढा देत त्यांनी क्युबाला भांडवलशाही अमेरिकेन विळख्यातून मुक्त केलं होतं. त्या लष्करी उठावाच्या खुणा अनेक जखमांचे व्रण अभिमानाने जपलेले फिडेल कॅस्ट्रो हे एक जिंदादिल नेते होते.

त्यांनी नटवरसिंग यांना मिठी मारून स्वागत केलं. त्यानं काही हवं नको ते विचारत निवांत गप्पा मारायला सुरवात केली. नटवरसिंग यांच्यावरील सगळं दडपण दूर झालं. बोलता बोलता फिडेल कॅस्ट्रो त्यांना म्हणाले,

“हे गोरखा सोल्जर्स कोण आहेत?”

नटवरसिंग यांना तर धक्काच बसला.  त्यांनीच राष्ट्राध्यक्षांना प्रश्न विचारला कि तुम्हाला गोरखांच्या बद्दल कस ठाऊक आहे? झालं असं होतं की दक्षिण अमेरिका खंडात अख्त्यारती खाली असणारी फॉकलँड बेटे आहेत  त्याकाळात तिथे अर्जेंटिना सोबत युद्ध सुरु होते. या युद्धात ब्रिटिशांनी आपल्या सैन्यातील गोरखा रेजिमेंट उतरवलं होत. तिथे त्यांनी मोठा पराक्रम गाजवला होता.

त्यामुळे फिडेल कॅस्ट्रो यांना गोरखा योद्ध्यांच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

शिवाय त्यांनी नुकताच वाचलेल्या गिर्यारोहक मॉरिस हरज़ोग यांच्या अन्नपूर्णा नावाच्या पुस्तकात देखील गोरख्यांच्या बद्दल माहिती होती. त्यामुळेच कॅस्ट्रो यांनी गोरख्याच्या बद्दल माहिती घेण्यासाठी नटवरसिंग याना भेटायला बोलावलं.

नटवरसिंग त्यांना सुरवातीपासूनचा इतिहास सांगितलं कि अठराव्या शतकात ब्रिटिशांनी नेपाळ वर पहिल्यांदा हल्ला केला तेव्हा त्यांना हे पहाडात लढणारे चिवट योद्धे गाठ पडले. पुढे भारतीय लष्करातील गोरखा रेजिमेंट एप्रिल १८१५ मध्ये स्थापन करण्यात आली होती. तेव्हापासून गोरखा रेजिमेंटने अनेक महत्त्वाच्या मोहिमेत, युद्धात मोलाची कामगिरी पार पाडली आहे.

फक्त भारतीय आर्मीच नाही तर नेपाळ व ब्रिटनच्या लष्करात गोरखा रेजिमेंट आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजानी बाकीचे  रेजिमेंट भारतीय आर्मी मध्ये विलीन केले पण गुरखा रेजिमेंटच्या काही भाग इंग्लंडला नेला.

आजही तिथल्या रॉयल आर्मी मध्ये गोरखा योद्धे महत्वाची कामगिरी बजावताना दिसतात. भारतातील उंच ,डोंगराळ भागातील सीमा सुरक्षेची जबाबदारी गोरखा रेजिमेंटवर असते. सध्या जवळपास ३० हजार गोरखा सैन्य आहेत.

भारताचे माजी लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ एकदा म्हणाले होते कि,

एखादा माणूस म्हणेल की त्याला मरणाची भीती वाटत नाही तर तो खोटे बोलत आहे किंवा तो गोरखा आहे 

खुद्द हिटलरला देखील हे योद्धे आपल्या सैन्यात असते तर जिंकता येईल असं वाटलं होतं.इतक्या वर्षानंतर देखील त्यांची शूरता आणि पराक्रम जगात सर्वोत्कृष्ट मानला जातो. त्यांचं उदाहरण आपल्या सैन्याच्या प्रशिक्षणावेळी दिल जात अशी ही जगातली सर्वात जाबाज रेजिमेंट भारताचा अभिमान आहे.

नटवरसिंग यांना कॅस्ट्रोना हि माहिती सांगताना गर्वाने फुलून अली होती. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी या घटनेचा उल्लेख केलेला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.