त्या दिवशी कॅस्ट्रोंनी फक्त इंदिराजींनाच नाही तर एका मराठी पत्रकारालासुद्धा मिठी मारली.

एक छोटासा देश जगातल्या सर्वोच्च महासत्तेच्या नाकावर टिच्चून उभा राहतो, भल्याभल्यांना गुडघ्यावर आणून एक क्रांतिकारक त्या देशावर जवळपास पन्नासवर्षे अनभिषिक्तपणे राज्य करतो, अखेरच्या श्वासापर्यंत युरोपपासून ते आफ्रिकेपर्यंत अनेक तरुणांना क्रांतिकारी विद्रोहाचा रोंमँटिक प्रतिक बनतो हे सगळ एखाद्या परीकथेप्रमाणे आहे.

पण असा हाडामांसाचा माणूस क्युबा मध्ये होऊन गेला. त्याच नाव फिडेल कॅस्ट्रो.

जगाशी पंगा घेणारा हा वाघ मात्र भारताचा मित्र होता. याला एक कारण म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. जेव्हा क्युबा हा देश स्वतंत्र झाला तेव्हा फिडेल कॅस्ट्रोला व त्याच्या क्रांतीला पाठींबा देणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये नेहरूंचा समावेश होता.

स्वातंत्र्यानंतर लगेचच फिडेलचा साथीदार व क्रांतीची धगधगती मशाल असलेला चे गव्हेरा क्युबाचा प्रतिनिधी म्हणून भारत दौऱ्यावर येऊन गेला होता. या दौऱ्याविषयी सांगताना चे म्हणाला होता की

“नेहरुंना आमच कौतुक होतं. त्यांच्या मनात आमच्याबद्दल वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे माया होती.”

खुद्द फिडेल कॅस्ट्रो १९६० साली संयुक्त राष्ट्र सभेच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त न्युयोर्कला आला होता. तेव्हा कॅस्ट्रोवरील द्वेषामुळे अमेरिकेने त्याला राहायला हॉटेलदेखील दिले नव्हते. अशावेळी त्याच्या पाठीशी राहणारे पंडीत नेहरूच होते.

जेव्हा इतर देशाचे नेते फिडेल पासून अंतर राखत होते तेव्हा नेहरूंनी या तरुण नेत्याची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याचा आत्मविश्वास वाढवला. ही गोष्ट फिडेलच्या मनात घर करून गेली. तेव्हा तो फक्त ३४ वर्षांचा होता. त्याने नेहरूंना वडिलांच्या जागी मानले आणि भारताला आपले घर.

पुढे जेव्हा इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनल्या तेव्हा आपली मोठी बहिण पंतप्रधान बनल्याप्रमाणे त्यांना आनंद झाला.

इंदिराजींच्याच काळात तो दोन वेळा भारत भेटीला येऊन गेला. १९८३ साली जेव्हा नाम देशांची परिषद भारतात आयोजित केली तेव्हा कॅस्ट्रो दिल्लीला येणार याची हवा झाली. तो पर्यंत कॅस्ट्रो बऱ्यापैकी फेमस झाला होता. अमेरिकी गुप्तहेर संघटना त्याला मारण्यासाठी जंग जंग पछांडत होत्या. यामुळे कॅस्ट्रोसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. त्याच्यासोबत टायचे तीन चार डमीसुद्धा होते. विमानतळावर सुद्धा क्युबा वरून तीन विमाने आली, कॅस्ट्रो नेमका कोणत्या विमानात आहेत हे देखील कोणाला ठाऊक नव्हते.

पत्रकारांना या सगळ्या पासून दूर ठेवण्यात आले होते.

तेव्हाचे महाराष्ट्र टाईम्सचे दिल्लीचे प्रतिनिधी म्हणून पत्रकार अशोक जैन हे होते. ते अरुण साधू यांच ‘फिडेल, चे आणि क्रांती’ हे पुस्तक वाचून प्रचंड प्रभावित झालेले होते. त्यांना कॅस्ट्रोला भेटायची इच्छा होती पण त्याच्याभोवती असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे त्याचे दुरून दर्शन देखील झाले नाही.

पुढे दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या विज्ञान भवनात नाम परिषदेचा प्रारंभ झाला. यापूर्वीची नाम परिषद हवाना येथे झाली होती त्यामुळे पूर्वीचे अध्यक्ष या नात्याने फिडेल कॅस्ट्रो यांनी इंदिरा गांधी यांच्या हातात परिषदेचे मानचिन्ह असलेला गेव्हल सोपवायचा होता. तो देत असताना फिडेल कॅस्ट्रो म्हणाले,

माझ्या थोरल्या बहिणीच्या इंदिरा गांधीच्या हाती ही परिषद सोपवताना मला फक्त आनंदच नाही तर गर्व वाटत आहे.

इंदिराजीनी हात पुढे केला पण कॅस्ट्रो यांनी तो गेव्हल दिलाच नाही.

इंदिराजींना कळलेच नाही नेमक काय झाले आहे. त्यांनी दुसऱ्यांदा हात पुढे केला पण कॅस्ट्रो मिश्कील हसत उभेच राहिले. इतर देशाचे राष्ट्रप्रमुख हजर होते. कोणालाही काही कळेना की नेमक काय झाल आहे. इंदिराजींनी जेव्हा तिसऱ्यांदा हात पुढे केला तेव्हा धिप्पाड कॅस्ट्रो हसत हसत पुढे आले आणि गेव्हल देण्याआधी त्यांनी इंदिरा गांधी यांना मिठी मारली.

dc Cover 7n6ghtm7igg94fg6greuhcdus3 20161127033703.Medi 1

सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्राध्यक्षाचे प्रोटोकॉल मोडून कॅस्ट्रो यांनी केलेली ही कृती म्हणजे फक्त फिडेल व इंदिरा गांधी यांच्या नात्याच द्योतक होती अस नाही तर भारत व क्युबा यांच्यातील मैत्रीचे संबंध किती घट्ट आहेत हे दर्शवत होती. हे पाहणारा प्रत्येक जण हेलावून गेला.

नाम परिषद संपन्न झाली. इंदिरा गांधीनी यशस्वी आयोजन करून दाखवून दिले होते की अजूनही भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात विकसनशील देशांचे समर्थपणे नेतृत्व करत आहे.

परिषद संपल्यावर सगळे राष्ट्राध्यक्ष परत जायला निघाले तेव्हा विज्ञान भवनच्या दाराशी इंदिरा गांधी प्रत्येक पाहुण्यांना आभार व्यक्त करण्यासाठी उभ्या होत्या. त्यांच्या सोबत काही अधिकारी व मंत्री सुद्धा होते.

CwERd8AUMAE9CVm

इकडे आपले मराठी पत्रकार अशोक जैन यांना अजूनही फिडेल कॅस्ट्रो यांचे जवळून दर्शन घेण्याची इच्छा अपुरी राहिली होती.

ते व इंद्रजीत नावाचे हिंदी पत्रकार सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून निघाले व इंदिरा गांधी यांच्या ओळीत सर्वात शेवटला जाऊन उभे राहिले. कोणाच्याही हे लक्षात आले नाही.

एकएक राष्ट्राध्यक्ष सभागृहातून बाहेर पडत होते, इंदिरा गांधी यांना हस्तांदोलन करून निघत होते. सगळ्यात शेवटी पाकिस्तानचे लष्करशहा झिया उल हक व फिडेल कॅस्ट्रो निघाले. झिया हे हसतमुखाने हस्तांदोलन करत करत इंद्रजीत व अशोक जैन यांच्या पर्यंत पोहचले. त्यांनी त्यांना ओळखल नाही मात्र त्यांच्या हातात हात दिला. त्यावेळी इंद्रजीत त्यांना म्हणाले,

“सर मैने आपका इस्लामाबाद मे इंटरव्ह्यू लिया था.”

झिया यांना काही आठवल नाही मात्र प्रत्यक्षात आपली जुनी ओळख असल्याप्रमाणे त्यांना दृढ आलिंगन दिले व उद्या आज रात्री पाकिस्तानी दुतावासात पार्टी आहे व अवश्य या अस सांगितलं. शेजारीच उभ्या असलेल्या अशोक जैन यांना देखील मिठी मारली व पार्टीच निमंत्रण दिल.

त्यांच्या पाठोपाठ कॅस्ट्रो होते. अशोक जैन आपल्या राजधानीतून या पुस्तकात सांगतात,

त्यांचं ताडमाड व्यक्तिमत्व माझ्या नजरेत मावत नव्हत. त्यांनी हस्तांदोलन केलं, एवढच नव्हे तर घट्ट मिठी मारली. माझ्या लक्षात राहिलेली ही एकमेव मिठी.

कॅस्ट्रो यांनी फक्त पंतप्रधानच नाही तर सर्वसामान्य भारतीय नागरिक देखील आपला मित्र आहे आहे हे यातून दाखवल होतं. इंदिराजींच्या नंतरही पुढच्या पंतप्रधानांनी क्युबा व भारताची मैत्री टिकवली व आजही क्युबा भारताचा सर्वात विश्वासू सहकारी आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Arvind Desai says

    Raktapipasu communist netyanche mahimamandan karne thambva ata ekdache! Baher yaa tya ghanerdya hangovermadhun! Communist “ichyarvanta” asa bhram pasravinyacha ajunahi prayatna kartahet ki janu kahi communism hee ek kayankari vicharsarani hoti. Fact is, tee ek raktapipasu vicharsarni hoti jichyamule Russia, Cheen, Vietnam, Kampuchea ani Koreamadhye karodo karodo lokanche bali gele. Bhanavar yaa ata jara!!!

Leave A Reply

Your email address will not be published.